Type to search

नंदुरबार

पावसासाठी मंदाणेकरांनी पाळला कडकडीत बंद, गावाबाहेर जाऊन घेतले सामूहिक भोजन

Share

मंदाणे । वार्ताहर – मंदाणे ग्रामस्थांच्या वतीने वरुण राजाच्या आळवणीसाठी ‘उजणे’ कार्यक्रमाचे आयोजन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. गावकर्‍यांनी गावाबाहेर ठिकठिकाणी कुटुंबासह जाऊन सामूहिक जेवणाचा कार्यक्रम केला. तत्पूर्वी अष्टभुजा मातेसह अन्य देवी-देवतांच्या मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवून पावसासाठी साकडे घातले.

मंदाणे (ता.शहादा) परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने भीषण दुष्काळाचा फटका सर्वांनाच बसला. संपूर्ण दुष्काळाचे वर्ष कसेबसे तोंड देत पार केले. यंदा मान्सूनपूर्व शेती मशागत करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले असताना यंदाही सुरुवातीलाच वरुण राजाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. तुटपुंजा पावसावर शेतकर्‍यांनी कर्जाचा डोंगर उभा करून महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली. पिकांनी जमिनीतून जेमतेम डोकी वर काढली. मात्र, गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून दमदार पाऊस न झाल्याने ही पेरणीही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशाप्रसंगी पावसाच्या आळवणीसाठी ‘उजणे’ कार्यक्रम करून गावाबाहेर घराला कुलूप लावून एका दिवसासाठी कुटुंबासह बिर्‍हाड थाटून भोजनाचा कार्यक्रम उरकला जातो. अशी एक प्रथा फार जुन्या काळापासून चालत आलेली आहे. यंदाही पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जोरदार पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी भगवंताला साकडे घालून उजनेचा कार्यक्रम ठेवून आराधना केली जाते.

आराधना करण्यासाठी ग्रामस्थांनी एकमुखाने ‘उजणे’कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यानिमित्ताने ग्रामस्थांनी आपापली दैनंदिन कामे बाजूला ठेवून गावाबाहेर शेतात ठिकठिकाणी कुटुंबासह बिर्‍हाड थाटले. त्याच जागी स्वयंपाक करून सामूहिक भोजन करण्यात आले.

‘उजणे’ कार्यक्रमाचे आयोजन झाल्यामुळे मंदाणे गावात संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले. सकाळपासूनच लहान मोठ्या व्यावसायिकांनीही आपापली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या उजणे कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे बाहेर गावाहून बाजार हाटसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. तसेच गाव कडकडीत बंद असल्यामुळे व परिवारासह उजणे कार्यक्रमासाठी इतरत्र गावाबाहेर गेल्याने शाळकरी मुलांनीही शाळेकडे पाठ फिरवली. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, कृषी विद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!