पावसाने ओढ दिल्याने चार्‍याचे भाव वाढले

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुमारे दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. अशातच त्यांना चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. घास, मका आणि गवताचे भाव वाढल्याने अर्थिक झळ बसू लागली आहे. त्यात पाणी नसल्याने आणि भाव चांगला मिळत असल्याने अनेक शेतकरी ऊस विक्रीसाठी आणत आहेत. त्याला भावही प्रति टन 2000 ते 2500 रुपये मिळत आहे. हे चित्र श्रीगोंदा, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, पाथर्डी, नगर व अन्य भागात पहावयास मिळत आहे.

 

 

सुरुवातीला जिल्ह्याच्या काही भागात बर्‍यापैकी पाऊस झाला. त्यानंतर वरुण राजाने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली. पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने मुळा वगळता अन्य धरणं ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे नद्या दुथडी झाल्या. पण लाभक्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाणी नसल्याने चार्‍याचे संकट उभे राहिले आहे.

 

 

पाणी नसल्याने व कारखान्यांपेक्षा चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी ऊस विक्रीस आणत आहेत. त्याला दूध उत्पादकांकडून मागणी होत आहे. पाथर्डी व तिसगाव उपबाजार, श्रीरामपुरात अशोकनगर फाटा, राहुरीत टाकळीमिया, नेवाशात नेवासा फाटा, कुकाणानजीक नगर बाजार समिती आवार, पारनेर बाजार समिती तसेच अन्य ठिकाणी उसाची खरेदी-विक्री जोरात सुरू आहे.

 

 

उसाला 2000 ते 2500
रुपयांचा भाव
नगर जिल्ह्यात खासगी व सहकारी असे 22 साखर कारखाने आहेत. त्यात यंदा उसाचे उत्पादन काहिसे कमी झाले आहे. पावसाने दगा दिल्याने काही भागात उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ऊस चार्‍यासाठी येत आहे. त्या उसाला 2000 ते 2500 चा भाव मिळत असल्याने गळीतासाठी काही कारखान्यांना मुबलक ऊस मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*