पालीवाल समाजाच्या १२व्या महाकुंभमेळ्याचे १ ते ६ एप्रिल दरम्यान आयोजन

0

जळगांव (प्रतिनिधी) – श्रध्दा, भक्ती व शक्ती यांचा महासंगम मानला गेलेल्या पालीवाल महाकुंभ २०१७ साठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सदरच्या महाकुंभास पालीवाल समाजातील १० हजारावर पालीवाल दररोज उपस्थिती देणार असल्याची माहिती पालीवाल महाकुंभ व सामाजिक सेवा समितीचे राजेंद्र झाडोत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अखिल पालीवाल समाजातील समाज बांधवांचा हा १२ वा महाकुंभ मेळा असून, दिनांक १ ते ६ एप्रिल २०१७ दरम्यान संपन्न होणाऱ्या या महाकुंभात विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंगळवार दि. २८ मार्च २०१७ पासून महाकुंभ महोत्सवास प्रारंभ झाला असून, प्रथम दिवसी घटस्थापना होऊन शतचंडी महायज्ञासही सुरूवात झाली आहे. दि. १ एप्रिल २०१७ रोजी चेचट येथील पंडित श्री. मधुसूदनजी आचार्य यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी आ. मुरलीधरजी पाटीदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

समाज प्रगतीवर चर्चासत्रांचे आयोजन

पालिवाल महाकुंभमध्ये प्रतिदिवस प्रभात फेरी, गरबा नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, ड्रॉर्इंग, मेहंदी, मिमिक्री, उत्सव गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, सदरच्या स्पर्धांसाठी नाव नोंदणी सुरू आहे.

सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत दि. १ एप्रिल ते ६ एप्रिलदरम्यान समाजात युवकांचा सहभाग सामजिक कुरितींवर आधारित चर्चा, अखिल भारतीय स्तरावर विवाह इच्छूक युवक-युवतींचे परिचय संमेलन, नियोजित माँ आशापूर्णा धाम तीर्थस्थळाच्या मास्टर प्लॅनवर आधारित चर्चा, त्याचप्रमाणे संघटन मजबुती व समसामायिक विषयांवर चर्चा संपन्न होणार आहे.

सोबतच समाजातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तींचा तसेच प्रतिभावंतांचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे राजेंद्रजी झाडोत यांनी सांगीतले. सदरच्या कार्यक्रमास समाज बांधवांनी पूर्णवेळ उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाकुंभ समितीचे अध्यक्ष मदनलालजी चौधरी, महामंत्री राजेंद्र झाडोत, महाराष्ट्र प्रभारी अनिलकुमार पालीवाल आदींनी केले आहे.

मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

दि. ६ एप्रिल रोजी समारोप प्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज‌िंसग चौहान यांचे प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार तसेच मार्गदर्शन संपन्न होणार असून, याप्रसंगी चोपडा येथून माँ आशापूर्णा धाम येथील कुंभमेळ्यास पदयात्रेद्वारा गेलेल्या अशोक भानुदास पालीवाल व रमेश (राम) नारायण पालीवाल यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

संत प्रवचनाअंतर्गत श्री १००८ श्री जगद्गुरू स्वामी श्री रामदयालजी महाराज यांचे प्रवचन दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत आयोजित केले असून आर्ट ऑफ लिव्हींग अंतर्गत प्रतिदिवस सकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान योग शिबीराचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री ना. सुरेंद्र पटवा, मध्यप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सितासरनजी शर्मा तसेच पशुपालन, ग्रामोद्योग, पर्यावरण मंत्री ना. अंतरसिंहजी आर्य, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह तसेच भारतीय किसन संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभाकर केळकर, क्षेत्रीय संगठन मंत्री शिवकांत दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*