पालकांनी शहाणे होणे बरे!

0
अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. पालकच आपल्या अल्पवयीन अपत्यांच्या हाती चौचाकी व दुचाकी वाहने सोपवत आहेत. मुले सगळे नियम धाब्यावर बसवत वाहन सुसाट वेगात चालवतात. साहजिकच अपघात वाढले आहेत.

अशा अपघातांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या पोलिसांनी अल्पवयीनांच्या हाती वाहन देणार्‍या पालकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिकमध्ये प्रथमच तीन अल्पवयीन मुलांचे पालक व गाडी मालकाविरुद्ध बाल न्याय मंडळात तक्रार दाखल केली आहे. न्याय मंडळाने दोन वाहनचालकांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई केली. तिसर्‍या वाहनचालकावरील तक्रारीवर सुनावणी बाकी आहे. अशा कारवाईचा स्वतंत्र अहवाल बनवला जाईल.

ज्या वाहन मालकाविरुद्ध तीनपेक्षा अधिक वेळा तक्रार नोंदवली जाईल त्याचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला जाणार आहे. अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात वाहने आणू नयेत, अशी सूचना महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुलांचे जीवन धावपळीचे बनले आहे. अनेक मुलांना एका दिवसात तीन-चार शिकवण्यांना जावे लागते.

त्यामुळे मुलांना गाडी घेऊन देणे अपरिहार्य आहे, असे समर्थन अनेक पालक करतात. ते कितपत योग्य समजावे? पालकच गाडी घेऊन देत असल्यामुळे मुलांचेही धाडस वाढते. मग ही मुले बेजबाबदारपणे गाडी चालवतात. स्वत:चा आणि दुसर्‍यांचाही जीव धोक्यात घालतात. कोणतेही नियम पाळले नाहीत तरी चालते, अशी त्या मुलांची धारणा आढळते. पोलिसांनी कारवाई केली तर पालकांपर्यंत न पोहोचता आपण परिस्थिती हाताळू शकतो हा समजही बळावतो.

अपघात झाला तर अनेक मुले पालकांच्या आणि पोलिसांच्या भीतीने अपघातस्थळी थांबत नाहीत. पौगंडावस्था ही एक नाजूक अवस्था आहे. वाढीच्या या टप्प्यावर मुलांना अनेक प्रश्न पडतात; पण त्यांना घरातून योग्य मार्गदर्शन मात्र मिळत नाही. त्यामुळे मुले त्या प्रश्नांची उत्तरे घराबाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात.

याचे विपरित परिणाम आता जाणवत आहेत. हा सगळा अनर्थ पालकांच्या बेजबाबदारपणामुळे वाढतो असे म्हटलेले कदाचित अनेकांना पटणार नाही. तथापि रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेसाठी अल्पवयीन मुलांच्या पालकांना ‘शहाणे’ करण्याचा नाशिक पोलिसांचा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे.

या प्रयत्नांना नेते आणि त्यांचे तथाकथित भाई, दादा व आप्पा खीळ तर घालणार नाहीत ना? अन्यथा ‘आपल्या त्या बाब्यावर’ कारवाई का केली याचा जाब पोलिसांनाच द्यावा लागला तर नवे प्रश्न मात्र निर्माण होतील.

LEAVE A REPLY

*