पारदर्शक कारभार न झाल्यास राजीनामा घेणार पालकमंत्र्यांची नगरसेवक, पदाधिकार्‍यांना तंबी

0

नाशिक | दि.१४ प्रतिनिधी- महापालिकेच्या कारभारात भाजपचा पारदर्शकता हा अजेंडा असून कामात पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. या पद्धतीने कामकाज न झाल्यास घेतलेल्या राजीनाम्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे आज पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वांना सुनावले. तुमचे राजीनामे आमच्या खिशात असल्याचे पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या आधोरेखित केले.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी स्वामीनारायण मंदिरात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आपल्याला महापालिकेत पारदर्शकता ठेवून कारभार करायचा असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पारदर्शक कारभारात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

आता महापौर, उपमहापौर पदानंतर लवकरच स्थायीसह इतर विविध समित्यांची जबाबदारी नव्या-जुन्यांचा विचार करून त्यांच्यात समन्वय साधून त्या नगरसेवकांंवर सोपवली जाणार आहे. पारदर्शकतेच्या मुद्यावर पक्षाने सर्वांचे राजीनामे आधीच घेतले असून यामार्गे योग्य पद्धतीने कामकाज व्हावे हा उद्देश आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याच्या केलेल्या आवाहनास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशाप्रकारे भाजपला एकहाती सत्ता दिली आहे. नगरसेवक म्हणून सर्वांनी वर्तणूक चांगली राखताना पारदर्शी कारभारासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे सांगत त्यांनी सर्वांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. महापालिकेच्या कारभाराबाबत प्रशिक्षण देण्यासाठी म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसीय चिंतन अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या मतदानाविषयी मार्गदर्शनार्थ घेण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर काही मिनिटात ही बैठक संपवण्यात आली. याप्रसंगी भाजप प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, विभागीय संघटनमंत्री रवी काळकर, शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*