Type to search

क्रीडा

पात्रता फेरीतून सुमितने मारली मुख्य फेरीत धडक

Share

न्यूयॉर्क| सोमदेव देववर्मन, युकी भांबरी, साकेत मायनेनी व प्रज्ञेश गुणेश्वरन या खेळाडूंनंतर आता ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करण्याचा मान भारताच्या सुमित नागलला मिळाला आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळायला मिळणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. सुमितने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश करून ते स्वप्न पूर्ण केले आहेच; पण त्याला थेट २० ग्रँडस्लॅम जिंकणार्‍या महान टेनिसपटू रॉजर फेडररशी सामना करावा लागेल.

पात्रता फेरीत ब्राझिलच्या जोआओ मेनेझेसविरुद्धच्या लढतीत त्याने पहिला सेट ५-७ गमावला तेव्हा त्याचे मुख्य फेरीच्या प्रवेशाचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशीच शक्यता होती; पण सुमितने पुढील दोन सेट ६-४, ६-३ असे जिंकून २ तास २७ मिनिटांच्या या लढतीत विजय मिळविला आणि मुख्य फेरीत धडक मारली. अशी कामगिरी करणारा तो गेल्या दशकभरातील भारतातील पाचवा खेळाडू ठरला आहे. २०१५मध्ये सुमितने व्हिएतनामच्या नाम होआंगसह दुहेरीत खेळताना विम्बल्डनचे ज्युनियर ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय खेळाडू ठरला होता. सुमितबरोबरच भारताचा प्रज्ञेशही अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळतो आहे. भारताचे दोन खेळाडू एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीत खेळण्याची ही भारताची १९९८नंतरची पहिलीच वेळ आहे. त्यावेळी महेश भूपती आणि लिअँडर पेस हे विम्बल्डनमध्ये खेळले होते. प्रज्ञेश गुणेश्वरनची सलामीची लढत सिनसिनाटी मास्टर्सचा विजेता आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला डॅनिल मेदवेदेव याच्याशी होणार आहे. त्या स्पर्धेत मेदवेदेवने नोव्हाक जोकोविचवर मात केली होती. क्ले कोर्टच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्‍या सुमितीने अमेरिकन ओपनच्या पात्रता स्पर्धेतही आत्मविश्वासपूर्ण खेळ केला. चॅलेंजर स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याला पहिल्या २०० खेळाडूंत स्थान मिळाले आहे. कारकीर्दीत प्रथमच त्याला अशी कामगिरी करता आली आहे. यावर्षी तो पहिल्या ३५० खेळाडूंतही नव्हता पण दुखापतींवर मात करत त्याने संघर्षपूर्ण प्रवास केला आणि ही मजल मारली आहे. भारताचा डेव्हिस चषक स्पर्धेतील न खेळणारा कर्णधार आणि माजी खेळाडू महेश भूपतीने सुमितमधील गुणवत्ता हेरली होती. त्याने २२ वर्षीय सुमितच्या या कामगिरीचे कौतुक केले. खूप मेहनत घेऊन ही मजल मारलेली आहे.

अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत खेळायला मिळणे आणि सलामीलाच फेडररसारख्या खेळाडूचा सामना करण्याची संधी मिळणे हे कुणाचेही स्वप्न असेल. त्याच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. आता फेडररविरुद्ध खेळताना त्याने त्या लढतीचा मनमुराद आनंद घ्यावा आणि आपल्या नेहमीच्या शैलीत खेळावे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!