Type to search

नंदुरबार

पाण्याची बचत न केल्यास मालमत्ता करात 5 टक्के वाढ करा: जिल्हाधिकारी

Share

नंदुरबार । ज्या ठिकाणी पाण्याची बचत होत नसेल त्या नगरपालिकांनी मालमत्ता करात 5 टक्के वाढ करावी जेणेकरुन लोकांमध्ये पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती होईल, अशा सुचना नुतन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधीत पालिकांना दिल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी मतदान करतील असा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

डॉ.भारुड म्हणाले, सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी शासन, प्रशासनातर्फे उपाययोजना तर होतीलच. मात्र, ज्या भागामध्ये पाण्याची नासाडी होत असेल, विनाकारण पाण्याचा गैरवापर होत असेल अशा भागातील नगरपालिकांनी मालमत्ता करात पाच टक्के वाढ केल्यास त्या भितीने का असेना नागरिक पाण्याची बचत करतील, अशा सुचना आपण संबंधीत नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पत्रकारांनी माझी प्रसिद्धी केली नाही तरी चालेल मात्र, आम्ही जिल्हयासाठी जे धोरणात्मक निर्णय घेवू, जनतेसाठी ज्या गोष्टी करु त्याला हमखास प्रसिद्धी द्यावी, कारण पत्रकार म्हणजे प्रशासनाचे कान, नाक, डोळे आहेत, असेही ते म्हणाले.

डॉ.भारुड म्हणाले, माझे शिक्षण नंदुरबारातच झाले आहे, अक्कलकुव्याच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण झाले असल्याने मला या जिल्हयाबाबत आत्मीयता आहेच. म्हणून या जिल्हयासाठी जे जे चांगले करता येईल, ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आरोग्य केंद्र, शाळा, शासकीय कार्यालयांमध्ये गतिमान प्रशासनाला आपले प्राधान्य राहील. जिल्हयात गैरकारभार चालत असतील तर त्याचा बिमोड करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली असून त्याबाबत दि. 30 जुलैपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. दि.20, 21, 27 व 28 जुलै रोजी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. दि.16 ऑगस्टपर्यंत उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादी निरीक्षकांद्वारे मतदार यादीची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असेही डॉ.भारुड यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!