पाण्याचा संघर्ष संपुष्ठात आणणे जीवनाचे ध्येय

0
 ना. विखे यांचे प्रतिपादन
लोणी (वार्ताहर)- पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आयुष्यभर कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी लढा दिला. तोच वारसा आपण पुढे चालवीत असून निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करून जिरायत भागाला पाणी देणे व पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणून पाण्याचा संघर्ष संपुष्टात आणणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
प्रवरानगर येथे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अन्न सुरक्षा व अंत्योदय अन्नधान्य पुरवठा योजना,]प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, हवामान आधारित डाळिंब पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे, सभापती हिराबाई कातोरे, नगराध्यक्षा योगिता शेळके, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, सभापती बापूसाहेब आहेर, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव लाटे, डॉ. भास्कर खर्डे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, विकास अधिकारी यू. के. गुळवे, तहसीलदार माणिकराव आहेर, तहसीलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कांचन मांढरे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
ना. विखे म्हणाले की, शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. म्हणूनच राज्यात सर्वाधिक लाभार्थी शिर्डी मतदारसंघातील आहेत. सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळेच समाजात विश्‍वासाचे वातावरण तयार झाले आहे. पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी समाजात विश्‍वासाची इमारत उभी केली असून तोच वारसा आपण पुढे चालवत आहोत. निळवंडे धरणाच्या कालव्यांबाबत ते म्हणाले की, आपण प्रयत्न करून साई संस्थांकडून 500 कोटी रुपये मिळविले आहेत. त्याचे भूमिपूजन कोण करते याला महत्त्व नाही.
तर कुणामुळे पैसे मिळाले हे जनतेला माहीत आहे. जुन्या ठेकेदाराला यातील एक रुपयाही न देता संपूर्ण रक्कम कालव्यांसाठी खर्च करावी व कमी पडणारी रक्कम गोदावरी महामंडळाकडून द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून केल्याचे त्यांनी सांगितले. निळवंडे धरण व कालवे यांच्यासाठी पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी लढा दिला. पण त्यांची विरोधकांनी बदनामी केली. निळवंडेचे पाणी जिरायती भागाला मिळावे हे खासदार साहेबांचे स्वप्न होते. पश्चिमेकडे डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणण्याचे खासदार साहेबांचे स्वप्न होते. त्याशिवाय गोदावरी खोर्‍यातील पाणी संघर्ष थांबणार नाही. आपण यासाठी पाठपुरावा करणार असून शासनाने कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, किती टप्प्यांत पाणी आणण्यात येईल हे जाहीर करावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, गरिबांची नावे अन्न सुरक्षा योजनेत नसल्याच्या खूप तक्रारी होत्या, आपण नवे समाविष्ट करू असा शब्द दिला होता व तो पूर्ण करून दाखविला आहे. अजूनही काही नावे समाविष्ट करावयाची आहेत. लाभार्थी संख्या शिर्डी मतदारसंघात एक लाख 74 हजार झाली आहे. यापूर्वी फक्त 22 हजार लाभार्थी होते. याद्या दुरुस्त करण्याचे धोरण आपण घ्यायला लावले. ज्यांची नावे नाहीत त्यांची आगामी सहा महिन्यांत समाविष्ट करू असे त्यांनी सांगितले.
यावेळी अण्णासाहेब म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. या समारंभात लाभार्थीना धनादेश व अन्नधान्याचे वितरण ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुजय विखे यांचे थेट
पंतप्रधान मोदींना आव्हान!
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरगरिबांचे कामे करतो असे फक्त भासवतात; पण काहीच करीत नाहीत. ज्या योजना सुरू आहेत, त्या सर्व काँग्रेसच्या काळातील आहेत. काहींची फक्त नावे बदलण्यात अली आहेत. भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. आज कोणत्याच शेतमालाला भाव नाही. नोटाबंदीमुळे आम्हाला काहीच फरक पडला नाही. मरण फक्त गरिबांचे झाले. त्यांचेच पैसे त्यांना मिळत नाहीत. नोटाबंदीमुळे देशाला काय फायदा झाला हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले पाहिजे. ते स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा परखड शब्दांत डॉ. सुजय विखे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढविला.

 

LEAVE A REPLY

*