पाणी वीज प्रश्‍नांवरून अकोले, श्रीगोंद्यात आंदोलने

0

आंबेवंगण ग्रामपंचायतीला ठोकले टाळे, महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा, कौठ्यात रास्ता रोको

अकोले/श्रीगोंदा (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यात पाणी व वीज प्रश्‍न गंभीर बनला असून तालुक्यातील आंबेवंगण येथील महिलांनी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. अकोले तालुक्यात विजेचाही प्रश्‍न गंभीर बनत चालला असून कमी दाबाने व वेळीअवेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावामध्येही विजेचा प्रश्‍न गंभीर बनला असून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नागरिकांनी कौठा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

 

अकोले तालुक्यातील आंबेवंगण गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टिटवी धरणातून या गावाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पाईप लाईन करण्यात आली आहे. मात्र ही पाईप लाईन गेल्या दोन वर्षापासून नादुरुस्त आहे. ग्रामस्थांनी पाईप लाईन दुरुस्त करावी यासाठी वारंवार मागणी केली. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी येथील वाड्या वस्त्यांच्या शेकडो महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.
आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. ग्रामसेवक रणखांब यांनी फोन वरून आंदोलकांशी चर्चा केली व आपण पाण्याचे ट्रॅकर घेऊन येत असल्याचे सांगितले. सायंकाळी 5 वाजता पाण्याचे ट्रॅकर घेऊन ग्रामसेवक गावात आले. शेकडो महिला व युवक तोपर्यंत ग्रामपंचायतीला घेराव टाकून बसले होते.
यावेळी गावाला पाणी पुरविणारी टिटवी धरणाची पाईप लाईन त्वरित दुरुस्त करावी, पोफळे वस्ती, तोरणमाळ व टोपेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, वाड्या वस्त्यांवरील विजेचा प्रश्न सोडवावा, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात एसएफआयचे आकाश धांडे, हरीश धोंगडे, उत्तम धांडे, संपत धांडे, मारुती पोफळे, गणेश धांडे, जनवादी महिला संघटनेच्या लक्ष्मी धांडे, चिंधूबाई धांडे, सुमन धराडे, काळाबाई धराडे, मंदा बांबेरे, हिराबाई धांडे आदी सहभागी झाले होते.

 

 सकाळी दहा वाजता शेकडो महिला व गावातील युवकांनी डोक्यावर रिकामे हंडे घेत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांना आंदोलनाची पूर्व कल्पना देऊनही यापैकी मोर्चास कोणीच सामोरे आले नाही. महिला व युवकांचा संताप यामुळे आणखी वाढला. आंदोलकांनी पंचायत समिती सदस्य सामेरे व जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांच्याशी संपर्क केला मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आंदोलकांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत कार्यालयासमोर ठिय्या दिला.

 

अकोले तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून चार दिवसांत वीज प्रश्न न सुटल्यास तालुका बंद करून निळवंडेचे पाणी रोखण्याचा इशारा देण्यात आला.
तालुक्यातील भारनियमन व कमी दाबाने होत असलेला वीज पुरवठा सुरळीत करावा, कुंभेफळ येथील 33 के. व्ही. ए. उपकेंद्राचे काम त्वरित पूर्ण करावे, शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करावे, प्रलंबित असलेले घरगुती व पंपाचे वीज कनेक्शन द्यावे. मंजूर ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावे, जळालेले ट्रान्सफार्मर दुरुस्त करावेत. या मागण्यांसाठी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला होता. प्रारंभी बसस्थानक चौकात रस्ता रोको करण्यात आला. तेथून आंदोलक घोषणा देत महावितरण कार्यालयावर धडकले. मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. यावेळी अनेक वक्त्यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर कडक शब्दांत टीका केली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष गिरजा जाधव, शहराध्यक्ष संपत नाईकवाडी, नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, माधवराव भोर, भानुदास डोंगरे, मुन्ना चासकर यांनी विजेच्या प्रश्नी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.
सूत्रसंचालन अमृतसागर दूध संघाचे संचालक बाळा नवले यांनी केले. वीज वितरण कंपनीचे प्रभारी सहायक अभियंता जी. वाय. ठोबंरे यांनी विजेच्या बाबतीत उदभवणार्‍या अडचणी सांगितल्या. तहसीलदार मनोज देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
आंदोलनात जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, जि. प. सदस्य रमेश देशमुख, पं. स. सदस्या माधवी जगधने, सीताबाई गोंदके, राष्ट्रवादीचे सरचिटणीस यशवंत आभाळे, युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, अगस्ती कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे, सुरेश गडाख, सुनील दातीर, भाऊसाहेब देशमुख, जे. डी. आंबरे, खजिनदार एस. पी. देशमुख, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, नगरसेवक बाळासाहेब वडजे, नामदेव पिचड, परशुराम शेळके, सचिन शेटे, नगरसेविका स्वाती शेणकर, निशिगंधा नाईकवाडी, बाळासाहेब भोर, शरद चौधरी, प्रवीण धुमाळ, प्रताप देशमुख, गणेश पापळ, विकास शेटे, सुधीर शेळके, मारुती लांडे, आनंद वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, मारुती भांगरे, कविराज भांगरे, भाऊसाहेब काळे, डॉ. अशोक भांगरे, कैलास जाधव, राकेश देशमुख, राहुल देशमुख, प्रा. भूषण जाधव, प्रा. सचिन चासकर, निलेश चौधरी, भाऊसाहेब खरात, निवृत्ती कोटकर, भरत देशमाने, बाबासाहेब वाकचौरे, राजेंद्र देशमुख, राहुल दराडे, नवनाथ गायकवाड, सोमनाथ मेंगाळ, संतोष देशमुख, सुनील कोटकर, बबन वाळुंज आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
वीज प्रश्‍नावर महावितरण कार्यालयावर राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार वैभव पिचड, कैलास वाकचौरे, अ‍ॅड. के. डी. धुमाळ व आदी कार्यकर्ते. (छाया ः गोरक्ष घोडके)
आमदार वैभव पिचड म्हणाले, शेतीमालाला भाव नाही, पाणी आहे तर वीज नाही. रात्री बे रात्री वीज पंप सुरु करण्यासाठी शेतकर्‍यांना जावे लागते. विजेच्या बाबतीत सरकारचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. ते लोण तालुक्यात पसरायला सुरुवात होत आहे. मोठे वीज केंद्र उद्योगपतीच्या घशात घालण्याचे काम सुरुरू आहे. येत्या चार दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

महावितरणच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ग्रामस्थ.

श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी काठच्या कौठा, गार, अनगर, आर्वी या गावातील ग्रामस्थांनी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा, पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा, या मागण्यासाठी कौठा येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी दररोज किमान आठ तास विना खंडित वीज पुरवठा देण्याचे लेखी आश्‍वासन महावितरणचे अभियंता दीपक गांगुर्डे यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व कौठा येथील गणपत परकाळे यांनी केले. यावेळी श्रीकांत मगर, अशोक मचाले, शाम मोरे, कल्याण सूर्यवंशी, धनंजय ढवळे, रमेश परकाळे, बाळासाहेब माने, हरीचंद्र शिपलकर, किसनराव खैरे, दत्ता जामले, कांतिलाल जठार, शरद जठार, माऊली खरात, सुनील मगर, एकनाथ सुपेकर, ज्ञानेश्वर पवार, अशोक भापकर, उमेश परकाळे, संजय सांडभोर, उत्तम परकाळे, दत्तात्रय खोरे, हनुमंत थोरात, वसंत सूर्यवंशी, चंद्रकांत शिपलकर, नीलेश खैरे, पवन निंबाळकर, संतोष मगर, उत्तम सुपेकर, लक्ष्मण गवळी, राहुल परकाळे, विठ्ठल भापकर, कांतीलाल भापकर, महेश कड यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*