पाणी चोरी प्रकरणी 25 जणांवर गुन्हा

0

धुळे / तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून पाणी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनगीर शिवारात बाभळे पंपींग स्टेशन ते धुळे शहरापर्यंत तापी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

सदर पाईपलाईनला अडीच इंच व्यासाचे छिद्र पाडून त्या ठिकाणी कनेक्शन घेण्यासाठी तीन इंची पाईपचा तुकडा वेंल्डींग करुन त्यातून अनधिकृतरित्या पाणी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी इब्राहीम नावाच्या व्यक्तीसह इतर 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पाईपलाईनला छिद्र पाडल्यामुळे सुमारे 50 हजार रुपयांचे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले.

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता नरेंद्र काशिनाथ बागूल यांनी या प्रकरणी सोनगिरी पोलिसात फिर्याद दिली.

विवाहितेस जाळले- अंगावर रॉकेल टाकून विवाहितेला जिवे ठार मारण्यात आले. यात शंभर टक्के जळाली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथे ही घटना घडली.
प्रमिला रमेश जाधव (वय30) यांच्या अंगावर रमेश हरी जाधव याने रॉकेल ओतून जाळली. यात विवाहिता शंभर टक्के जळाली. त्यामुळे प्रमिलाबाईचा मृत्यू झाला. रमेश जाधव याच्यावर थाळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाचतांना धक्का लागल्याने मारहाण- घराच्या अंगणात नाचत असतांना धक्का लागल्याने झालेल्या वादातून एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुरुकृपा नगरमध्ये ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर निंबा पवार रा. गुरुकृपा नगर यांची पत्नी अंगणात नाचत असतांना कृष्णा अहिरे याचा धक्का लागला. त्याबाबत बोलल्याचा राग आल्याने कृष्णा जगन अहिरे, सागर साहेबराव पवार, अजय किसन हिरे, रवी किसन शिरसाठ, राकेश शिवा अहिरे, विनोद शंकर शिरसाठ रा. गुरुकृपा नगर चितोड रोड, धुळे या सर्वांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच ज्ञानेश्वर पवार यांच्या आईसह नरेश ठाकरे यांनाही मारहाण करुन दमदाटी केली. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोत लंपास- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे 25 हजार रुपयांची गळ्यातील पोत चोरट्याने लंपास केली. देवपूर भागातील जयहिंद कॉलनी परिसरात ही घटना घडली. सौ. अर्चना वसंतराव जाधव रा. जयहिंद कॉलनी देवपूर धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकाला मारहाण- शिरपूर तालुक्यातील हाडाखेडा येथे सिमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेला सुरक्षा रक्षक योगेश देवीदास देशमुख यास गाडी पास करु दिली नाही या कारणावरुन दिनेश संजय पाटील रा. हाडाखेड याने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे.

जमिनीच्या वादातून मारहाण- शेतजमीन विकत घेण्याच्या वादातून कैलास सुकलाल भदाणे, रा. जैताणे, ता. साक्री यांना मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे भदाणे यांचा भाचा राजेश बागूल याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून भगवान गंगाराम कुवर रा. जैताणे, ता. साक्री याच्यावर निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेवणाच्या वादातून मारहाण- वेळेवर जेवण दिले नाही या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हॉटेल नालंदा समोर ही घटना घडली.
हॉटेल मॅनेजर कुणाल बन्सीलाल करनकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाना साळवे, अरुण भोई, वाल्मिक हळद, विजय अहिरे रा. सर्व धुळे यांनी रात्रीपाळीतील वाचमन सुधाकर चौधरी यांना मारहाण केली. त्याच प्रमाणे हॉटेल नालंदाचे मालक हेमंत सूर्यवंशी यांच्या घरासमोर जावून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी कुणाल करनकाळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला वरील चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनामी करत असल्याच्या संशयातून मारहाण- गावात बदनामी करत असल्याच्या संशयातून राहूल पुंडलिक पाटील रा. जुने भामपूर, ता. शिरपूर यास रितेश विश्वास देसले, मुकेश विश्वास देसले, ज्ञानेश्वर विश्वास देवरे, भिमराव बाळू पाटील, तुषार बाळू पाटील, पप्पू बाळासाहेब चंद्रकांत पाटील, संदीप गजानन पाटील रा. जुने भामपूर यांनी मारहाण केली. तसेच खोलीत बंद करुन ठेवले. या कारणातून वरील सात जणांवर शिरपूर शहर पोलिसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू- शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील सुनिल कुंदन नेतलेकर (वय30) यांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. दोंडाईचा-विखरण दरम्यान ही घटना घडली. याबाबत दोंडाईचा पोलिसात राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

*