पाणचट शैक्षणिक ‘गुण’वत्ता!

0
दहावी परीक्षेचे निकाल एकदाचे जाहीर झाले. त्यात सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुणी ठरवण्याचा विनोद शिक्षण मंडळाने केला आहे. त्यातील काहींना तर एकशे दोन टक्के गुणसुद्धा मिळाले आहेत. ते कसे हे विद्वान माध्यमिक शिक्षण मंडळच जाणे! सामान्य मराठी माणसाला हे कोडे कसे उलगडणार?

गेली काही वर्षे एसएससी परीक्षा मंडळाचे विद्यार्थी इतर परीक्षा मंडळांच्या तुलनेत मागे पडत आहेत. ‘देता किती घेशील दो कराने’ या न्यायाने सढळ हाताने गुण देऊन कदाचित तो मागासलेपणा दूर करण्याची ही सोपी पळवाट परीक्षा मंडळाकडून शोधली गेली असावी का? त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सढळपणे गुण देण्याची स्पर्धा सर्वच परीक्षा मंडळांमध्ये सुरू झाली आहे.

‘बेस्ट ऑफ फाईव्ह’सारखी बिनशेंडा-बुडखी पद्धत निव्वळ गुणवाढीसाठी शोधली गेली का? अशा बेगडी उपायांनी परीक्षा सोपी करण्याचा किंवा नसलेले गुण वाढवून दाखवण्याचा इलाज सामान्य पालकांच्या बुद्धिमत्तेला कसा झेपणार? ८०-९० टक्के गुण मिळवूनही पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल की नाही या साशंकतेने अनेकांच्या झोपा आताच उडाल्या असतील. मग ६०-६५ टक्के गुणी विद्यार्थ्यांनी तर महाविद्यालय प्रवेशाचा विचार न केलेला बरा!

अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने निकाल जाहीर होण्यापूर्वी आत्महत्या केलेल्या नाशिकच्या एका विद्यार्थ्याला ६९ टक्के गुण मिळाल्याचे जाहीर झाले आहे. एवढे गुण मिळवण्याची क्षमता असणार्‍या विद्यार्थ्यालासुद्धा अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने इतके नाउमेद करावे हा शिक्षणाचा पराभव नाही का?

शैक्षणिक धोरणातील या धरसोडवृत्तीने अनेक विद्यार्थी नैराश्यग्रस्त का होतात हा विचार कोणत्याही शिक्षणमहर्षींना सुचू नये? सढळ हातांनी गुणांची उधळण सुरू असतानाही पालिका शाळांच्या निकालाचा टक्का मात्र घसरताच राहिला आहे. पालिका शाळांकडे नकारात्मक दृष्टीने का पाहिले जाते हे यावरून लक्षात यावे. शिक्षणाने उदरनिर्वाहाचे साधन मिळवणे सोपे होते असे मानले जाते.

तथापि सध्याच्या विनोदी पद्धतीने गुणांची मुक्त उधळण सुरू राहिल्यास हजारो ‘गुणी’ विद्यार्थी आपला आत्मविश्‍वास गमावून बसले तर तो दोष भरपूर गुण देण्याची पद्धत शोधणारे विद्वान मान्य करतील का? या परीक्षांमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे तरी पुढे नेमके काय होते? गुणवत्तेचा आलेख भविष्यातही चढताच राहतो का? प्रचंड गुण प्राप्त करूनही देशातील बहुसंख्य अभियंते नोकरी मिळवण्यात अपात्र ठरत आहेत. ते का? याचा विचार ‘यंव केले आणि त्यंव केले’ अशी शेखी मिरवण्यातच धन्यता मानणार्‍यांच्या युगात कोण करणार?

LEAVE A REPLY

*