Type to search

ब्लॉग

पाटलांसमोर कोल्हेंचे आव्हान!

Share

शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जात असला तरी यंदा शिवसेनेच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने तगडे आव्हान उभे केले आहे.

जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तसतसे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वारे बदलताना दिसत आहेत. भाजप-सेना युतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. डॉ. कोल्हे हे आढळराव पाटलांना आव्हान देऊ शकणार नाहीत, असे राजकीय निरीक्षकांना वाटत होते. प्रत्यक्षात कोल्हे यांनी आढळराव पाटलांसमोर तगडे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे.

शिवसेनेसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानल्या गेलेल्या शिरूरमध्ये सेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची सीट धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या प्रचारात शिवसैनिकही फारसे सक्रिय नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील 12 गावांनी पाण्याच्या मुद्यावरून मतदानच न करण्याचा निर्णय घेतल्याने पाटलांचे चौथ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ कोणता असा प्रश्न विचारल्यास शिरूर मतदारसंघाचा उल्लेख होतो. या मतदारसंघात पाटील यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला आहे. यापूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघाचेही त्यांनी एकदा लोकप्रतिनिधित्व केले आहे. कधीकाळी शरद पवार आणि पवार कुटुंबातील कोणीही शिरूर मतदारसंघातून उभे राहून निवडून यावे, असे उघड आव्हान आढळराव पाटील द्यायचे. त्यामुळे शिरूर मतदारसंघातून आढळराव पाटील हे चौथ्यांदा सहज खासदार होतील, असा सर्वांना विश्वास वाटायचा.

सध्याचा शिरूर म्हणजेच पूर्वीचा खेड मतदारसंघ. प्रा. रामकृष्ण मोरे यांनी 1980 आणि 1984 मध्ये सलग दोनदा येथून विजय मिळवला. मात्र 1989 मध्ये जनता दलाच्या किसनराव बाणखेले यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या विदुरा नवले यांनी 1991 मध्ये बाणखेले यांचा पराभव करत ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. बाणखेले यांनी 1996 मधील निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली. मात्र निवृत्ती शेरकर यांनी त्यांचा पराभव केला. 1998 मध्ये काँग्रेसच्या अशोक मोहोळ यांनी शिवसेनेच्या नाना बलकवडे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अशोक मोहोळ राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी सेनेच्या बाणखेलेंचा पराभव केला. 2004 मध्ये आढळराव शिवसेनेत गेले आणि त्यांनी मोहोळ यांचा पराभव करत या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा विजय मिळवला. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा शिरूर मतदारसंघ झाला आणि 2009 व 2014 या दोन्ही निवडणुकीत आढळराव यांनी घोडदौड कायम ठेवली आहे. या मतदारसंघातील मतदारांची वर्गवारी 60 टक्के ग्रामीण आणि 40 टक्के शहरी अशी आहे. त्यात शिरूर, खेड-आळंदी, जुन्नर, आंबेगाव, भोसरी, हडपसर या मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. आढळराव यांनी 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा तब्बल 1 लाख 78 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये मोदी लाट होती. त्यावेळी ‘शिरूरमधून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी’ असा आग्रह धरला जात होता. परंतु त्यांनी नकार दिल्याने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली. निकम यांचा आढळरावांनी तब्बल 3 लाख 1 हजार मताधिक्क्यांनी पराभव केला. आता विजयाचा चौकार मारण्यासाठी आढळराव निवडणुकीला उभे आहेत.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांमुळे जेवढे आव्हान निर्माण झाले नव्हते ते आता डॉ. अमोल कोल्हे यांच्या रूपाने निर्माण झाले आहे. त्यामुळेच यंदाची लढत अटीतटीची असल्याचे चित्र आहे. दोन्ही उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. शिरूरमधील निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. ‘पंधरा वर्षांत अपेक्षेएवढी विकासकामे केली नाहीत. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे अपूर्ण काम असून मार्गावरील 40 गावे का वगळण्यात आली? त्यामुळे विकास खुंटला. तीनदा खासदार होऊनही नेमके केले काय? असे सवाल करत हे विकासाचे मुद्दे बाजूला ठेऊन माझ्यावर टीका केली जात आहे,’ असा आरोपही डॉ. कोल्हे करीत आहेत. कोल्हे यांनी विमानतळाच्या मुद्यावरूनही आढळरावांवर तोफ डागली. आढळराव अद्यापही कात्रज परिसरात फिरकले नसल्याने ‘त्यांना आपण पाहिलंत का?’ असा फलकही झळकावण्यात आल्याने चर्चा सुरू झाली आहे. ‘आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीमार्फत शास्तीकर लादण्याचे पाप करण्यात आले’ असा आरोप शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे. आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात आहेत. डॉ. कोल्हे यांना मी केलेली विकासकामे माहिती नसतील तर हा त्यांचा बालिशपणा आहे. मतदासंघात बेरोजगारी असल्याचा आरोप खोटा आहे. माझ्या मतदारसंघात सर्वाधिक रोजगार मिळाला आहे. याबाबत त्यांना अपूर्ण ज्ञान आहे,’ या शब्दांमध्ये आढळराव यांनी आरोपांना उत्तर दिले आहे.

भाजपशी संबंधित एका संघटनेने शिरूर मतदारसंघातील प्रचाराचा अहवाल तयार केल्याचे बोलले जाते. हा अहवाल ‘मातोश्री’ आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही पाठवण्यात आला आहे. या अहवालानुसार, शिरूर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये प्रचारात मरगळ असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते. त्याचप्रमाणे आढळरावांसाठी प्रचार करणारे अनेकजण आतून डॉ. कोल्हे यांच्यासाठी काम करत असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेच्या एका आमदाराच्या भावाकडून कोल्हे यांचा प्रचार सुरू असल्याचा मुद्दाही गाजत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 12 गावे पाण्यापासून वंचित आहेत. या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत दिले जाते. प्रत्यक्षात निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेला एकही नेता या गावांकडे फिरकत नाही. त्यामुळे या गावांनी पाणी नाही, तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे. त्याचाही फटका आढळराव पाटलांना बसणार आहे. एकंदरीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेचा हमखास विजय हा सोपा नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!