पाटपाण्यात वाहून गेलेल्या शोएबचा मृतदेह 18 तासांनी मिळाला

0

चांदा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील चांदा येथील पाटात वाहून गेलेल्या शोएब आय्यूब तांबोळी या बालकाचा मृतदेह युवकांच्या अथक प्रयत्नांनंतर 18 तासांनी सकाळी 7 च्या सुमारास सापडला. शोएबचा मृतदेह पाहताच त्याच्या आईने फोडलेला हंबरडा अनेकांचे काळीज चिरत गेला. शोएबच्या पार्थिवाचा शोकाकूल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
मुळा उजवा कालव्याच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत शोएब पाटावर गेला होता.

 

त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. गावातील शेकडो युवक त्याला शोधत होते. युवकांनी पाण्यात साखळी करून दोन किलोमीटरपर्यंत त्याला शोधले. कालव्याच्या दोन्ही बाजूंनी युवक त्याचा शोध घेत होते. मात्र अंधार पडल्यानंतर शोधकार्यात अडथळे येऊ लागले. त्यासाठी घटनास्थळापासून पुढे काही अंतरापर्यंत उजेडासाठी विद्युत बल्ब लावण्यात आले होते. रात्रभर लोक दोन्ही पुलाजवळ थांबून होते. पण त्याचा शोध लागला नाही. सकाळी पुन्हा युवकांनी पाण्यात उडी घेऊन शोधकार्य चालू केले. घटना घडली त्या ठिकाणापासून एक किलोमीटरच्या आत एका झुडूपाला शोएबचा मृतदेह अडकल्याचे युवकांच्या लक्षात आल्यावर त्याला बाहेर काढण्यात आले.

 
पाटबंधारे अधिकार्‍यांनी तत्परता दाखवत पाणी कमी केल्याने शोधकार्यास मदत झाली. पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी मृतदेह मिळाल्याची खबर सोनई पोलिसांना दिली. नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

 
माजी सभापती कारभारी जावळे, माजी सरपंच अनिल अडसुरे, भाजपाचे उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, माजी सरपंच कैलास अभिनव, प्रकाश कटारीया आदींनी नेवासा येथे जाऊन रुग्णालयात तातडीने उत्तरीय तपासणीकामी आवश्यक त्या सूचना केल्या. दुपारी अडीच वाजता मयत शोएबच्या पार्थिवाचे चांदा येथील दफनभूमीत दफनविधी करण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 13 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने चांदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*