Type to search

ब्लॉग

पाकिस्तानचा डाव

Share

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याची गुपचूप मुक्तता करणे हा पाकिस्तानचा मोठ्या षडयंत्राचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. मसूद अझहरला दहशतवादी हल्ल्यांचा वीस वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकरवी पाकिस्तान भारतात पुलवामासारखा एखादा मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतो. आणखी काही दिवसांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेची वार्षिक बैठक होणार आहे. त्याचीही पार्श्‍वभूमी पाकिस्तानच्या या हालचालींना आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

काश्मीर प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याच्या प्रयत्नांबरोबर पाकिस्तान भारताला सीमापार दहशतवाद्यांच्या माध्यमातून त्रास देण्यासाठीही जबरदस्त प्रयत्न करत आहे. अलीकडेच पाकिस्तानने पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागचा मास्टरमाईंड, २००१ मध्ये भारतीय संसदेवरचा, पठाणकोटमधला अशा अनेक दहशतवादी हल्ल्यांचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याची गुपचूप सुटका केली आहे.

काही महिन्यांपूर्वी मसूद अजहरला ताब्यात घेतले असे पाकिस्तानने सांगितले होते. मात्र त्याचवेळी या अटकेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ही अटक म्हणजे धूळङ्गेक आहे, पाकिस्तानने मसूद अजहरला ताब्यातच घेतले नव्हते, असेही म्हटले गेले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक वक्तव्य केले होते की, मसूद अजहर आजारी असून तो रुग्णालयात आहे. याचाच अर्थ त्यांनी अजहर पाकिस्तानात आहे, हे मान्य केले होते. कारण त्यापूर्वी पाकिस्तानने ही बाब कधीच मान्य केली नव्हती. पण नंतर मात्र मसूदला नजरकैदेत ठेवले आहे, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाचे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचे हे प्रयत्न होते.

आता मात्र पाकिस्तानने मसूदला नजरकैदेतून मुक्त केले आहे. हा निर्णय पाकिस्तानने सहज घेतलेला नाही. या निर्णयामागे खूप मोठ्या व्यापक कटाचा भाग आहे. भारतासाठी ही धोक्याची आणि सावधगिरी बाळगण्याची सूचना आहे. कारण मसूद अजहरला भारतविरोधात दहशतवादी हल्ला करण्याचा वीस वर्षांचा अनुभव आहे. त्याचे संपर्क जाळेही अत्यंत मजबूत आहे. बालाकोटसारख्या ठिकाणी तो प्रशिक्षण केंद्रे चालवतो. त्याच्या अंतर्गत जे दहशतवादी आहेत ते कसलेले जिहादी आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितल्यानुसार, २२५ पाकिस्तानी दहशतवादी सीमापार करून आपल्याकडे येण्याच्या तयारीत आहेत आणि त्यातील बहुतांश दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानने मसूदला सोडण्यामागे मोठे षडयंत्र आहे. भारतावर पुन्हा एकदा पुलवामासारखा एखादा भीषण हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने मसूद अजहरला जाणीवपूर्वक मुक्त केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सियालकोट, काश्मीर आणि पंजाब, राजस्थानपर्यंतच्या सर्व भागांपैकी कुठेतरी मोठा दहशतवादी हल्ला भारतावर घडवून आणायचा, याची जबाबदारी मसूदला देण्यात आली आहे. आताच्या स्थितीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यामागे एक मोठी रणनीती आहे. असा हल्ला झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारत त्याविरोधात कठोरातील कठोर पाऊल उचलण्याचा प्रयत्न करेल. कारण पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याबाबत सरकारवर लोकांचा दबाव वाढेल. भारत अशा स्वरुपाने उत्तर देईल हे गृहीत धरून पाकिस्तानने आधीच सीमेवर अडीच हजार सैन्य तैनात ठेवले आहे. २००१ मध्ये ज्यावेळी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता तेव्हाही भारत-पाकिस्तानदरम्यान अशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांनी खूप मोठ्या प्रमाणावर सीमेवर सैन्य तैनात (ट्रुप मोबिलायझेशन) केले होते. त्यानंतर १९ वर्षांनी पुन्हा एकदा तसेच केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सप्टेंबर महिन्याचा मुहूर्त साधून सीमेवर ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जात आहे. कारण सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे वार्षिक अधिवेशन होत असते. या अधिवेशनामध्ये भारताचे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान दोघेही आंतरराष्ट्रीय समुदायाला संबोधित करत असतात. २४ सप्टेंबरला हे संमेलन होणार आहे. यासाठी केवळ काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्या बैठकीत काश्मीरचा प्रश्‍न जाणूनबुजून उपस्थित व्हावा, आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष त्याकडे आकर्षित व्हावे यासाठी पाकिस्तानचा हा खटाटोप आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून अत्यंत स्ङ्गोटक विधाने केली जात आहेत. भारताने प्रतिक्रिया दिली तर पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, आम्ही शांत बसणार नाही, काश्मीरप्रश्‍नी कोणतेही पाऊल उचलण्याची आमची तयारी आहे, टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे, इथपर्यंतची स्ङ्गोटक वक्तव्ये इम्रान खान करत आहेत. ही वक्तव्ये आणि होऊ घातलेली संयुक्त राष्ट्रांची आमसभा या पार्श्‍वभूमीवर मसूदला जाणीवपूर्वक मुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तान केवळ भारतासाठीच ही धूळफेक करतो आहे असे नाही तर ङ्गायनान्शिअल ऍक्शन टास्क ङ्गोर्ससाठीही हे सर्व प्रयास सुरू आहेत. कारण एङ्गएटीएङ्गनेदेखील जैश-ए-मोहम्मद आणि मसूद अजहरविरोधात तत्काळ कारवाई करावी, असे पाकिस्तानला बजावले आहे. या संस्थेने पाकिस्तानला आगामी काळात करावयाच्या गोष्टींमध्ये २० मुद्दे नमूद आहेत. ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत त्यांची पूर्तता पाकिस्तानला करावी लागणार आहे. पण तरीही जाणीवपूर्वक पाकिस्तान हे धाडस करतो आहे. कारण या गोष्टी पाकिस्तानला जाणीवपूर्वक घडवून आणायच्या आहेत.

भारतासाठी ही अत्यंत धोक्याची सूचना आहे. म्हणूनच भारताने या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. आपल्याकडील गुप्तहेर स्रोत अधिक कार्यशील करावे लागणार आहेत. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणतात, आपण काश्मीरमध्ये जी संचारबंदी लावली आहे ती कधी शिथिल करायची ते पाकिस्तानच्या वर्तणुकीवर ठरवायचे आहे. पाकिस्तानने पुन्हा असे हल्ले केले, काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर जमावबंदी शिथिल करणे शक्य नाही. डोवाल यांच्या वक्तव्यावरूनही हे स्पष्ट होते की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच संपूर्ण भारताला याबाबत अत्यंत दक्ष आणि चोख राहावे लागणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आपण सैन्याची कुमक याआधीच वाढवल्यामुळे पाकिस्तानला जम्मूू-काश्मीरमध्ये हल्ला करणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा हल्ला हा पंजाबमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यंत सावध राहावे लागेल. अर्थात, सावधगिरीबरोबरच भारताला संयम बाळगणे गरजेचे आहे. कारण पाकिस्तान भारताला मुद्दामून चिथावणी देत आहे, हल्ला करण्यास उद्युक्त करतो आहे. भारताने लष्करी प्रत्युत्तर दिल्यास दोन्ही देशांतील सीमारेषा तणावग्रस्त आहे, असा जगाचा समज होणार आहे. या प्रश्‍नावरून दोन्ही देशांमध्ये आण्विक युद्ध होऊ शकते, असे वातावरण तयार करून संयुक्त राष्ट्रांचा किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाचा हस्तक्षेप घडवून आणणे, हेच पाकिस्तानचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पाकिस्तानची ही चाल लक्षात घेता दहशतवादी हल्ला झाला तरीही त्याचे प्रत्युत्तर भारताला अत्यंत संयमाने द्यावे लागणार आहे. याचे रूपांतर भारत-पाकिस्तान संघर्षात होणार नाही, याची काळजीही भारताला घ्यावी लागणार आहे. अन्यथा काश्मीरप्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा पाकिस्तानचा डाव सङ्गल होणार आहे. तसे झाले तर चीन किंवा इतर इस्लामिक राष्ट्रे याप्रश्‍नी हस्तक्षेप करू शकतात. म्हणूनच भारताला याबाबतीत सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.
डॉ.शैलेन्द्र देवळाणकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!