पाईपलाईनची दारू हायवेवर!

0

होम डिलेव्हरीचा फंडा हॉटेल सम्राटाचा नवा उद्योग

अहमदनगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हायवेवरील बारमधील दारुचे प्याले रिकामे दिसत असले तरी त्यात नगर शहरातील पाईप’लाईन’ने भर घातली आहे. पाईपलाईन रस्त्यावरील वाईनशॉममधून सर्रासपणे हायवेवरील हॉटेलात मद्य पोहच केले जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखा पोलिसांच्या छाप्यानंतर समोर येऊ लागला आहे.
हॉटेल व्यावसायात ‘दिवे’ लावलेल्या हॉटेलसम्राटाने हा नवा उद्योग सुरू केला आहे. हायवेवरील हॉटेल व्यावसायिकांनी बंदीनंतर आता होम डिलेव्हरी सुरू केली असून त्याच धर्तीवर बाटल्यांचीही ‘होम डिलेव्हरी’ सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

‘सुप्रीम कोर्टा’च्या आदेशानंतर हायवेलगतची बार बंद झाले आहेत. आता तेथे फक्त जेवण मिळत आहे. काही हॉटेलचे शटर कायमचे बंद झाले आहे. मात्र जी काही हॉटेल सुरू आहेत. तेथेही चोरी छुपके दारू विक्री होत आहे. बंदी नसलेल्या ठिकाणच्या वाईन शॉपमधून दारू विकत न्यायची अन् ती चढ्या भावाने चोरी छुपके विक्री करण्याचा नवा फंडा हायवेवरील हॉटेलचालकांनी अंमलात आणला आहे.

या हॉटेलचालकांना ‘होम डिलेव्हरी’ची सेवाही मिळू लागली आहे. हायवेवरील बहुतांश हॉटेलमध्ये पाईप‘लाईन’ पोहचली आहे. भल्या सकाळीच सुरू झालेली पाईप‘लाईन’ रात्री उशिरापर्यंत जोराने वाहत असल्याचे दिसून येते. सुप्रीमच्या बंदीनंतर पाईप‘लाईन’ला सुकाळ आला असून ‘होम डिलेव्हरी’चा नवा फंडाही सुरू होण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हा पोलिसांनी बंदीनंतर हायेवरील अनेक हॉटेलात दारू पकडली आहे. कोतवाली पोलिसांनी बायपास रस्त्यावरील अनुजा हॉटेलवर छापा टाकून अडीच हजार रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र जगन्नाथ जगताप यास ताब्यात घेतले आहे.

दुसरा छापा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावर मंगळवारी दुपारीनंतर टाकला. त्यात फॉर्च्युनर या अलिशान चारचाकी वाहनातून देशी-विदेशी दारूची बेकायदा वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीसह 25 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

पाईपलाईन रस्त्यावरील संदीप वाईन्समधून ही दारू सोनईच्या मधुबन हॉटेलमध्ये विक्रीत जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पोलिसांनी चंदन बबनराव नलावडे, भगवंत गुलाबराव गडाख (दोघेही रा. सोनई) तसेच संदीप वसंत बोरुडे (अहमदनगर) यांच्यविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

  पाईप‘लाईन’मधील वाईन खिशात टाकून मोकळ्या पटांगणात ढोसणार्‍यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळेच रात्री-अपरात्री नगर शहरातील मोकळ्या मैदानात टोळके बसल्याचे दृश्य नजरेस पडते. पोलिसांच्या गस्तीपथकाला हे टोळके नजरेस पडते मात्र कारवाईऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोकळ्या मैदानावर सकाळी बाटल्यांचा पडलेला खच हा पुरावा त्यासाठी पुरेसा ठरावा. 

  सुप्रीमच्या बंदीनंतरही हायेवरील हॉटेलमधील प्याल्यामध्ये सुकाळ असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. हावयेवरील प्याल्यातून हॉटेलचालक मद्यशौकिनांचा खिसा रिकामा करून ‘कमाई’ करत आहे. अर्थात त्यालाही अनेक ‘वाटेकरी’ आहेत. हे वाटेकरी कोण हे न समजण्याइतपत जनता आता खुळी राहिलेली नाही. पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करून हायवेवरील हॉटेलातील प्याल्यातील दारू रिकामी करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. 

LEAVE A REPLY

*