पाईपमोरीने दिला धोक्याचा इशारा !

0
धुळे / पावसाळा सुरू झाला आणि पहिल्याच पावसात पांझरेला आलेल्या पाण्याने कालिका माता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या पाईपमोरीची परिक्षा घेतली.
नदीला मोठा पूर आला तर परिस्थिती काय राहील, याची जाणीव या पाण्याने करून दिली. एकंदरीत पावसाळ्यात ही पाईपमोरी वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते आणि नदीच्या प्रवाहात वाहून येणार्‍या झाडाझुडपांमुळे या पुलातून पाणी वाहणे कठीण होऊ शकते, याचा इशाराच पहिल्या पावसाने दिला आहे.

शहराच्या देवपूर भागातील नागरीकांना थेट सिव्हील हॉस्पीटलपर्यंत येणे सोईचे ठरावे, यासाठी बांधकाम विभागाने कालिका माता मंदिराशेजारी नदीपात्रात पाईपमोरीचे बांधकाम काही दिवसांपुर्वी पुर्ण केले.

त्यानंतर या पाईपमोरीवरून वाहतूक सुरूदेखील झाली. येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोईचा असल्याने या रस्त्यावरून साहजिकच वाहतूक वाढली.

उन्हाळ्यात वाहतुकीला कोणतीही अडचण आली नाही. मात्र पावसाळा सुरू झाला आणि नदीला पहिल्याच पावसात पाणी आले. यावेळी या पाईपमोरीवरील वाहतूक पोलिसांना बंद करावी लागली.

मोरीवरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने पोलिस यंत्रणा आणि आपत्ती विभागाने आवश्यक ती खबरदारी घेतली.

पाणी ओसरल्यानंतर पाईपांमध्ये मोठ्या प्रमाणावर केरकचरा अडकल्याचे दिसून आले. जेसीबीच्या सहाय्याने नंतर हा केरकचरा हटविण्यात आला.

एका दिवसात पाईपमोरीची ही अवस्था झाली. पांझरेला ज्या-ज्या वेळी पूर येईल किंवा अक्कलपाड्यातून पाणी सोडले जाईल, त्या-त्या वेळी या पाईप मोरीबाबत खबरदारी घ्यावी लागेल, वाहतूक बंद करावी लागेल आणि वाहून आलेला केरकचरा पूर ओसरल्यावर काढत रहावा लागेल. पाईपमोरीचा उद्देश चांगला असला तरी पावसाळ्यात या मोरीवरून वाहतूक करताना नागरीकांना काळजी घ्यावी लागेल.

अतिवृष्टीच्या काळात पांझरेला पूर आला की वाहतूक बंद ठेवावी लागेल. यासाठी आपत्ती विभाग आणि पोलिस यंत्रणेला सतर्क रहावे लागेल.

त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी वाहतूक कायम सुरळीत राहीलच याची खात्री नसल्याचा इशारा या पहिल्याच पावसाने दिला आहे.

LEAVE A REPLY

*