पांगरमल दारूकांड प्रकरणी 20 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

0
सुरजितसिंग गंभीरचा आरोपींमध्ये समावेश
2 हजार 396 पानांचे दोषारोप पत्र
163 जणांची नोंदवली साक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधुमीत नगरसह राज्यात खळबळ उडवून देणार्‍या नगर तालुक्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणी गुरुवारी (दि.11) सीआयडीकडून नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात 20 आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश मोरे यांनी हे दोषारोप दाखल केले आहे. पांगरमल दारूकांडात 9 जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी झाले होते. यात दोघांना अंधत्व आले असून एकाला पक्षाघात झाला आहे. हे दारूकांड 12 फेब्रुवारीला पांगरमल (ता. नगर) येथे घडले होते.
घटना घडल्यानंतर नगरच्या पोलिसांनी या दारूकांडाचा तपास केला होता. मात्र, सरकारच्या आदेशानुसार 19 एप्रिलला हा तपास कोल्हापूर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. नगरच्या पोलिसांकडून या दारूकांडाच्या तपासात राहिलेल्या त्रुटी दूर करत सीआयडीने आरोपी विरोधात पुरावे जमा केले आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील साईभूषण उपहारगृहाचा करार ज्या व्यक्तींच्या नावे होता. त्याला नगरच्या पोलिसांनी आरोपी केले नव्हते. मात्र, सीआयडीने आपल्या तपासात उपहारगृहाचा करार असणार्‍या सुरजीतसिंग भगतसिंग गंभीरला या दारूकांडामध्ये 20 वा आरोपी केले आहे.
गंभीर हा तारकपूर येथील सिंग रेसीडेन्सीचा मालक असून तो अद्याप फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मोरे यांनी दिली.
सीआयडीच्यावतीने नगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र तब्बल 2 हजार 396 पानांचे आहे. आरोपपत्र तयार करताना सीआयडीने 163 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. यात नगरच्या पोलिसांचाही समावेश आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे आणि गंभीर अद्याप फरार आहेत.
तर राजू बुगेचा अपघाती मृत्यू झाला आहे. पोलिसांनी 17 आरोपींना अटक केलेली आहे. फरार आरोपींच्या अटकेनंतर पुरवणी आरोपपत्र दाखल होणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ही तपास सुरुच राहणार आहेत. दारूकांडातील 17 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दारूकांडातील आरोपींवर भादवी 304 सदोष मनुष्यवध, 328 विषारी पदार्थ अथवा घातक रसायने माहित असून त्याचा वापर करून मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नगरच्या पोलिसांनी या प्रकरणात दारूबंदी कायद्याची कलम लावले नव्हते. मात्र, सीआयडीने ते कलम लावले असल्याचे मोरे यांनी सांगितले.
सायंकाळी 5 नंतर जिल्हा सत्र न्यायालयात 20 आरोपीं विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडण्यात आली. सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हे आहेत मयत
पोपट रंगनाथ आव्हाड (वय 40), पांगरमल.
दिलीप रंगनाथ आव्हाड (वय 45), पांगरमल.
राजेंद्र खंडू आंधळे (वय 45), पांगरमल.
प्रभाकर शिवाजी पेटारे (वय 45 ), दत्ताचे शिंगवे (पाथर्डी).
राजेंद्र भानुदास आव्हाड (वय 43), पांगरमल.
सुरेश बाबूराव वाकडे (वय 45), पांगरमल.
शाहादेव भाऊराव आव्हाड (वय 60), पांगरमल.
उध्दव मुरलीधर आव्हाड (वय 32), आव्हाडवाडी.
भास्कर बन्सी आव्हाड (वय 45), पांगरमल.

दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतरही सीआरपीसी कायदा कलम 173 (8) नुसार दारूकांडाचा तपास सुरू राहणार आहे. यात समोर येणार्‍या बाबी आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयात आरोपी दाखल करण्यात येतील. आरोपींशी पोलिसांची असणारी सलगी, त्यांच्या फोन कॉलचे डिटेल तपासण्यात येत असल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले.

सीआयडीने दाखल केलेले दोषारोप पत्र हे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्याचे आहे. बनावट दारूचे आणखी काही गुन्हे नगरच्या पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल केलेले आहेत. त्याचा तपास सुरू असून सरकार भविष्यात हे सर्व गुन्हे सीआयडीकडे वर्ग करून एकत्रित तपास करू शकते. मात्र, सध्यातरी सीआयडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

ज्या ठिकाणी या दारूकांडातील विषारी दारू तयार करून ती वितरित करण्यात येत होती, त्या जिल्हा सरकारी रुग्णालयातील साईभूषण उपहारगृहाचा करार 2014 संपला होता. मात्र, तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यावेळी गंभीरला पत्र देऊन जोपर्यंत नव्याने करार होत नाही, तोपर्यंत त्याठिकाणी उपहारगृह चालवण्याचे परवानगीचे पत्र गंभीरला दिले होते. यामुळे गंभीरच्या ताब्यात हे उपहारगृह होते.

 सीआयडीच्या अधिकर्‍यांना या दारूकांडाचा तपास करण्यासाठी महिनाभराचाही कालावधी मिळाला नव्हता. नगरच्या पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक तांत्रिक चुका राहिल्या होत्या. या चुका सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दूर केल्या. आरोपींना लावण्यात आलेल्या भादंवी कलम 304 मध्ये जन्मठेप आणि कलम 328 मध्ये 10 वर्षे ते जन्मठेप या शिक्षेची तरतूद आहे. 

हे आहेत गंभीर आजारी
अंबादास दशरथ आव्हाड (वय 40) पांगरमल (अंध).
आजीनाथ विठोबा आव्हाड (वय 43) पांगरमल (अंध)
विनोद ऊर्फ प्रभाकर रामभाऊ शेलार (वय 35)
केशव शिंगवे
हिराजी नाना वाकडे (वय 70) पांगरमल.
नामदेव योहान ठोकळ (वय 55) पांगरमल.
बाबासाहेब उत्तम आव्हाड (वय 37) पांगरमल.
आसाराम निवृत्ती आव्हाड (वय 30) पांगरमल.
भगवान किसन आव्हाड (वय 40) पांगरमल.
आजीनाथ पाटीबा आव्हाड (वय 24) पांगरमल.
बाबासाहेब सांत्वन वाकडे (वय 40) पांगरमल.
हरिभाऊ ज्ञानदेव आव्हाड पांगरमल.
महादेव गंगाराम आव्हाड पांगरमल.
रावसाहेब भानुदास आव्हाड (वय 54) पांगरमल.
आरोपींची नावे
भाग्यश्री गोविंद मोकाटे इमामपूर (फरार)
सुरजितसिंग भगतसिंग गंभीर तारकपूर (फरार)
मंगल महादेव आव्हाड (वय 42) पांगरमल (अटक)
गोंविद खंडू मोकाटे (वय 43) इमारपूर (अटक)
भिमराज गेणू आव्हाड (वय 52) पांगरमल (अटक)
रावसाहेब गेणू आव्हाड (वय 55) पांगरमल (अटक)
महादेव किसन आव्हाड (वय 50) पांगरमल (अटक)
मोहन श्रीराम दुग्गल (वय 63) सावेडी (अटक)
जगजीतसिंग किसानसिंग गंभीर (वय 43)
तारकपूर (अटक)
जाकिर कादर शेख (वय 49) मुकूंदनगर (अटक)
हमिद अली शेख (वय 26) तारकपूर (अटक)
संदीप मोहन दुग्गल (वय 28) सावेडी (अटक)
शेखर जयसिंग जाधव (वय 30)
पाईपलाईन रोड (अटक)
भरत रमेश जोशी (वय 48) सिव्हील हडको (अटक)
अजित गुलराज सेवानी (वय 28) तवले नगर (अटक)
याकुब युनिस शेख (वय 40) कल्याण रोड (अटक)
प्रवीण भालचंद्र वाणी (वय 49) धुळे (अटक)
नवनाथ बबन धाडगे (वय 40) भिंगार (अटक)
अमित वासूमन मोतीवाणी (वय 29) सावेडीगाव (अटक)
राजेंद्र बबन बुगे शिवाजीनगर नालेगाव अटकेपूर्वी (मयत)

 

LEAVE A REPLY

*