Type to search

ब्लॉग

पश्चिम महाराष्ट्रातील गणिते का बदलली?

Share

पश्चिम महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित आघाडीचा फटका बसल्याने अनेकजण विजयापासून ‘वंचित’ राहिले. काही ठिकाणी राजकीय नाट्य कामाला आले.

महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांतील निकाल आश्चर्यकारक लागले असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मतविभाजनाचा फटका महाआघाडीच्या उमेदवारांना बसला. मनसेना नेते राज ठाकरे यांच्या या क्षेत्रात झालेल्या चार सभांचा परिणाम मात्र मतदानात दिसून आला नाही.

2014 च्या निवडणुकीत भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 4 आणि स्वाभिमानी संघटना 1 असे राजकीय बलाबल होते. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या संख्येत वाढ झाली असून राष्ट्रवादीने नव्याने 2 जागांवर विजय मिळवून या निवडणुकीत 3 जागा राखल्या आहेत. त्यांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एका जागेची घट झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांतील जागांमध्ये भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 3 असा निकाल आला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे गिरीश बापट यांनी विजय प्राप्त केला. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी देऊन एकतर्फी निवडणूक करण्यास चालना दिल्याने चुरशीशिवाय निवडणूक पाहावयास मिळाली, तर बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपने आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीविरोधी वातावरण निर्माण करून बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. धनगर समाज भाजपवर नाराज असल्याने त्याचादेखील लाभ राष्ट्रवादीला बारामती मतदारसंघात मिळाला आहे.

मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचा दारूण पराभव झाला. हा पवार घराण्यातील पहिला पराभव मानला जात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे शरद पवार या मतदारसंघात तळ ठोकून होते. अजित पवार व त्यांच्या पदाधिकार्‍यांचे या मतदारसंघाकडे पूर्ण लक्ष होते. मात्र त्याचा फारसा परिणाम निकालात दिसून आला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हेेंच्या रूपाने नवा उमेदवार देऊन सलग तीनवेळा निवडून आलेले सेनेचे आढळराव पाटील यांना पराभवाची धूळ चारली. कोल्हे शिवसेनेत काहीकाळ पदाधिकारी राहिले आहेत. छत्रपती संभाजीराजे भूमिकेद्वारे चाहत्यांच्या मनात व घरात पोहोचले आहेत. त्यांची जात काढून नाराजी ओढवून घेतल्याने आढळराव पाटील यांना फटका बसल्याचे मानले जाते. मतदारांना गृहीत धरून तीनवेळा मिळालेल्या यशामुळे निर्माण झालेला अहंकार पराभवास कारणीभूत ठरला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे झाला असल्याचे निकालावरून दिसते. आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभाजनाचा भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना लाभ झाला, तर माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची बंडखोरी यामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भाजपकडून अनेक नावांचा विचार झाला. राष्ट्रवादीला उमेदवार निवडण्यात झालेला विलंब आणि राजकीय डावपेच भाजपला अनुकूल ठरले. यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्रसिंह निंबाळकर-पाटील यांना लाभ झाला, तर संजयमामा शिंदे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

सातारा लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने कसरत करून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखले. त्यासाठी खुद्द शरद पवार यांची शिष्टाई कमी आली. त्यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना त्या कालावधीत सोबत ठेवले. त्यांच्या स्टाईल व लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सफल झाला. त्यांच्या विरोधात भाजपने कामगार नेते नरेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवले होते. मात्र तुल्यबळ लढत देण्यात त्यांना यश आले नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा भाजप घरोबा आणि ‘आमचेही तुमच्या आधी ठरले आहे’, असे अभियान राबवून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी बाजी मारली. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आणले. महाआघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघातील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातवाला निवडून आणण्याचा दिलासा दिला आणि त्याला पक्षत्याग करण्यास भाग पाडून काँग्रेसचे पानिपत करण्याचा प्रयत्न सफल झाला. राजू शेट्टी यांच्या नकारात्मकतेचा फटका त्यांना बसला असून पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत विरोधाचा फटकादेखील बसला आहे. येथून भाजपचे संजयकाका पाटील यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यश मिळाले आणि त्याचे मतात रूपांतर झाल्याने विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाआघाडीतील सदस्याच्या पराभवापेक्षा स्वपक्षीय व्यक्तींना संपुष्टात आणल्याचा आनंद राष्ट्रवादी व काँग्रेस स्थानिक पदाधिकार्‍यांना जास्त झालेला असल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ समजल्या जाणार्‍या हातकणंगलेची निवडणूक यावेळी चुरशीची ठरली. या मतदारसंघात प्रारंभापासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव करून या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रथमच यश मिळवले होते. त्यानंतर युतीबरोबर सलगी करून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा यश मिळवले. मात्र दरम्यानच्या काळात सहकारी सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपद मिळाल्याने त्यांच्याबरोबर झालेला दुरावा आणि कार्यकर्त्यांच्या दुफळीमुळे साहजिकच त्यांच्या ताकदीचे खच्चीकरण झाले. याचे विरोधी वातावरणात रूपांतर होऊन त्यांनी युतीतून फारकत घेतली आणि ज्यांना शेतकरी हितासाठी शिव्यांची लाखोली वाहिली त्यांचा घेतलेला आश्रय जनतेला रुचला नाही. नकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. शिवसेनेचे नवोदित उमेदवार धैर्यशील माने यांनी शेट्टीविरोधकांची मोट बांधली आणि त्याचे यशात रूपांतर झाले.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!