पवार, पगार यांच्या चौकशीचे आदेश थेट दिल्लीहून

करोडोंच्या भ्रष्टाचारबाबतच्या तक्रारींची दखल : आयुक्तांना पत्र

0
नाशिक | दि.१७ प्रतिनिधी- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांत भ्रष्टाचार करून महापालिका शहर अभियंता यु. बी. पवार व अधीक्षक अभियंता जी. एम. पगारे यांनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली असून त्यांची ऍन्टी करप्शन ब्युरो आणि आयकर विभागामार्फत चौकशी करावी, अशा एका तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत नाशिक महापालिका आयुक्त यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या कथित भ्रष्टाचार चौकशीच्या पत्रामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमधील रहिवासी असलेले नाईक नामक भाजप कार्यकर्त्याने शहर अभियंता पवार व अधि. अभियंता पगारे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये गोळा केले आहे, अशा स्वरुपाची तक्रार २४ मे २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांच्या कार्यालयाकडे केली आहे.

या पत्राची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने २९ मे २०१७ रोजी या तक्रारीची दखल घेत संबंधीत अधिकार्‍यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशी व्हावी म्हणून ही तक्रार नाशिक महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडुन आलेले पत्र नाशिक महापालिका आस्थापना विभागाला १४ जून २०१७ रोजी प्राप्त झाले आहे. या पत्रावर संबंधीत सहा. आयुक्तांकडुन संबंधीत तक्रार पत्राचे अवलोक होऊन पुढील आदेश करावेत, अशी टिप्पणी लिहून आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

थेट पंतप्रधानांकडे करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीत तक्रारकर्त्याने संबंधीत अधिकार्‍यांच्या मालमत्तेची माहिती नमूद केली आहे. यात सध्या भुमिगत गटार विभागाचे प्रमुख असलेले गौतम पगारे यांनी नवीन नाशिक विभागातील त्रिमूर्ती चौकात व सपना थिएटरजवळ दोन बंगले घेतले आहे. तसेच त्यांनी प्लॉट, शेअर्स व सोने गुंतवणूक केली असल्याचे म्हटले आहे.

तर शहर अभियंता उत्तम बी. पवार यांचे देखील शहरातील उच्चभ्रु वस्तीत प्लॉट असेही यात म्हटले आहे. या दोन्ही अधिकार्‍यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व आयकर विभागाकडुन चौकशी करावी अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे. महापालिकेत अलिकडच्या काळात काही अधिकार्‍यांची विभागीय चौकशी करण्यासंदर्भातील ठराव मंजूर झाला असून काही अधिकार्‍यांची चौकशी सुरू आहे.

यातच स्वेच्छा निवृत्ती अर्ज करणार्‍यांची अगोदर खातेनिहाय चौकशी केली जाईल, नंतर संबंधितांच्या अर्जाचा विचार केला जाईल, असे अलिकडेच आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता थेट पंतप्रधान कार्यालयाकडून पवार व पगारे यांच्या चौकशीसंदर्भातील पत्र मिळाल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या तक्रारीसंदर्भात आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

सिंहस्थ सेलप्रमुख होते अधिकारी
सिंहस्थ कुंभमेळा काळात यु. बी. पवार यांच्याकडे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाची जबाबदारी होती. तर पगारे यांच्याकडे याच विभागाचे कार्य. अभियंता हे पद होते. त्यांच्याकडून साधुग्राम मधील पाणी व्यवस्था, गटार व निवास व्यवस्थेची जबाबदारी होती. तसेच त्यांकडे सिंहस्थ सेलची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी पत्र्यांचे शेड टाकण्याचे काम ठराविक एजन्सीला दिल्याचे आणि याकरिता निवारा शेडची खराब पत्रे व शौचालयाची भांडी वापरल्याचा आरोप उभय अधिकार्‍यांवर झाला होता. या संपूर्ण कामातून संबंधितांनी भ्रष्टाचार केल्याबाबत त्यांच्यावर संशयाची सुई फिरत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*