Type to search

पवार कुटुंबियांची दमछाक!

ब्लॉग

पवार कुटुंबियांची दमछाक!

Share

बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 12 लोकसभा मतदारसंघांतील लढती प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियांची चांगलीच दमछाक होते आहे.

जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघांत लोकसभेसाठी 23 आणि 29 एप्रिल या दोन तारखांना मतदान होईल. त्यामुळे राजकीय रणधुमाळीला वेग आला आहे. बारामती, मावळ या दोन मतदारसंघांत घरातलेच उमेदवार असल्याने आणि माढा, शिरूर, नगर, सातारा आणि कोल्हापूर या मतदारसंघांतही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कुटुंबाची दमछाक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बारामती आणि मावळ मतदारसंघात सत्ताधार्‍यांच्या व्यूहरचनेमुळे ही दमछाक चांगलीच वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील चारपैकी बारामती, मावळ आणि शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांत तुल्यबळ लढत होत आहे. राष्ट्रवादीचा पारंपरिक गड मानल्या गेलेल्या बारामती मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरशीची ठरेल. 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात धनगर समाजाचे नेते महादेव जानकर उभे राहिले होते. तेव्हा सुप्रिया सुळेंचे मताधिक्क्य प्रचंड घसरले होते. यंदा भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कुल या सुप्रिया सुळेंप्रमाणेच तालेवार मराठा कुटुंबातील आहेत. कुल कुटुंबाचे सासवड-बारामती भागात वर्चस्व आहे. लोकसभेसाठी कांचन कुल प्रत्येक गावा-खेड्यात जाऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना घरच्या मैदानावरच आव्हान मिळाले आहे. बारामतीमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी बारामतीकडे अधिक लक्ष दिलेय. मंत्री चंद्रकांत पाटलांनी तर थेट बारामतीत घर भाड्याने घेऊन बस्तान मांडलेय. बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील 10 जागा जिंकण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.

महाराष्ट्रात शरद पवार सोडले तर त्यांच्याइतका ताकदीचा मातब्बर नेता दुसरा कोणी राहिलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही वर्धा येथील सभेत पवार कुटुंबियांना टार्गेट केले गेले. मागच्या वेळी जानकर कमळ चिन्हावर निवडणूक लढले नव्हते. यावेळी कांचन कुल कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. पवारांच्या कन्येचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव करायचा आणि पवारांचे मानसिक आणि राजकीय खच्चीकरण करायचे, असा चंगच भाजपने बांधला आहे. भाजपने टार्गेट नंबर-वन बनवल्याने सुप्रिया सुळे यांची दमछाक सुरू आहे. बारामतीची जागा पवारांनी आपल्या मुलीसाठी रिकामी केली तेव्हापासून तेथे सुप्रिया यांनी दोन निवडणुका जिंकल्या आहेत. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत महादेव जानकरांनी त्यांना भंडावून सोडले होते. अवघ्या 70 हजार मतांनी सुप्रिया निवडून आल्या होत्या. यावेळी नवा चेहरा देऊन भाजपने बारामतीच्या किल्ल्याला धडका देणे सुरू केले आहे. सुप्रिया सुळेंनी खूप आधीपासूनच मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. त्यांचे रोजचे दौरे बघता त्या कुठलीही कसूर सोडायला तयार नाहीत. बारामतीत याअगोदर एक उपचार म्हणून पवार कुटुंबियांच्या विरुद्ध कोणाला तरी उमेदवारी दिली जायची. आता मात्र भाजपच्या आणि चंद्रकांत पाटलांच्या व्यूहरचनेमुळे हा समज दूर झाला आहे. निवडणुकीत काय होईल हे काही सांगता येत नाही अशी स्थिती आहे म्हणून स्वत: सुप्रिया सुळे, थोरले बंधू आणि थोरले पवार हेही डोळ्यात तेल घालून या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. बारामती मतदारसंघातील नाराजांची नाराजी दूर करण्यातच त्यांची दमछाक होत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये बारामती आणि इंदापूर राष्ट्रवादीकडे, पुरंदर शिवसेनेकडे, भोर काँग्रेसकडे तर दौंड भाजपचा मित्रपक्ष रासपकडे आहे. मात्र पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप तर इंदापुरातून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचे बोलले जातेय. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे पवार कुटुंबाशी जुने राजकीय वैर आहे. या निवडणुकीशी विधानसभेची गणिते निगडीत असल्यामुळे मध्यंतरी हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी या सर्वांची मनोमिलनासाठी बैठक झाली होती. त्यामध्ये विधानसभेला राहुल गांधी आणि शरद पवार जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असे सांगण्यात आले. मात्र तरीही हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे, संजय जगताप यांची नाराजी दूर झाल्याशिवाय ते सक्रिय काम करणार नाहीत, असे दिसते. त्यांची मनधरणी पवार कशी करतात यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.

दुसरीकडे मावळमध्ये पार्थ पवार आणि युतीतर्फे शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. मुलासाठी अजितदादांना उन्हाच्या तडाख्यात मतांचा जोगवा मागावा लागतोय. मावळमध्ये अजित पवार यांचा उजवा हात समजले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपवासी झाले आहेत. सध्या ते भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. त्यांचे आणि बारणेंचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जुना मित्र म्हणून लक्ष्मण जगताप यांच्यावर अजितदादांची मोठी भिस्त होती. मात्र श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात समेट घडवण्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलन झाल्याचे स्पष्ट केले. यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ कोकणमध्ये येतात. त्या ठिकाणी पार्थ पवारांची शेकापवर भिस्त आहे. कारण घाटाखालील या तीनही मतदारसंघांत शेतकरी कामगार पक्षाचे चांगलेच वर्चस्व आहे. मात्र शेतकरी कामगार पक्षाचे नेते के.के. म्हात्रे यांच्यासह तीन नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ यांचे धाकटे बंधू जय पवार हेही त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व एकूण 12 लोकसभा मतदारसंघांत अटीतटीच्या लढती सुरू आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला या भागातील फक्त 4 जागा जिंकता आल्या. माढाची जागाही शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेतल्याने चर्चेत आहे. यासंदर्भात झालेल्या राजकीय चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी माढा मतदारसंघ पवारांसाठी प्रतिष्ठेचा आहे. शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेंमुळे युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी या मतदारसंघात थोरले आणि धाकले पवार यांनी कंबर कसली आहे. सातारा आणि कोल्हापूर येथे महायुती आणि दोन काँग्रेसची आघाडी यांच्यात प्रतिष्ठेच्या लढती आहेत. नगरची जागाही विखे- पवार यांच्या वादामुळे राष्ट्रवादीच्या दृष्टीने प्रतिष्ठेची झाली आहे. सांगलीमध्ये वसंतदादांचे नातू विशाल पाटील काँग्रेस सोडून आखाड्यात उतरले आहेत.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!