Type to search

ब्लॉग

पवारांचे भाकित

Share

भाजप तीनशेपेक्षा जास्त जागा जिंकेल असे भाकित केले जात असताना शरद पवारांनी मात्र मोदी सरकार सत्तेत आले तरी ते 13 दिवसांत पडेल, असे भाकित केले आहे. ते कशाच्या आधारे?

सरकार सत्तेत आले तरी ते 13 दिवसांत पडेल’, असे भाकित शरद पवारांनी केले आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघे 13 किंवा 15 दिवस टिकेल, असा दावा शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी केला आहे. शरद पवार यांची भाकिते अनेकवेळा खरी ठरतात, असे सांगितले जाते.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्व नेते यावेळी भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा करत असताना पवारांनी हे भाकित कशाच्या आधारे केले याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा निवडणुकीचे 6 टप्पे पार पडल्यानंतर आणि केवळ एकच टप्पा शिल्लक असताना भाजप किंवा कोणताच राजकीय पक्ष काहीही करू शकत नाही. पण आगामी राजकारणाची तयारी मात्र केली जाऊ शकते.

गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे अनेक राज्यांत भाजपला जबरदस्त यश मिळाले होते; पण ते यश यावेळी टिकणे शक्य आहे का? भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत वर्तवलेल्या अंदाजावरही पवारांनी भाष्य केले आहे. ‘भाजपचे गणित चुकतेय. भाजपला 500 जागा मिळतील. आठ महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्ये हातातून गेली, यातून लोकांचा ट्रेंड काय आहे, ते कळते. असे असताना हे 500-300 सांगतात, याला अर्थ नसल्याचे’ही पवार यावेळी म्हणाले. यंदाचे सरकार त्रिशंकू नसेल. भाजपच्या हातात सत्ता जाणार नाही. बाकीचे पक्ष एकत्र बसून स्थिर सरकार देतील. अटलजींसारखे नेते असताना आणि कुणाचे नेतृत्व न देता आम्ही 2004 ला सरकार स्थापन केले. 10 वर्षे कारभार केला. आताही आम्ही वेगळे लढलो तरी मतमोजणीआधी आम्ही दिल्लीत बसून स्थिर सरकार देऊ, असे पवार सांगत आहेत. ‘यूपीए’ म्हणा किंवा काही म्हणा, 21 तारखेला आम्ही समविचारी पक्षांचे प्रमुख एकत्र ही प्रक्रिया सुरू करायला बैठक घेत आहोत. सगळे पक्ष एकत्र बसून एक पर्याय देण्याचा विचार करतील. पुढील पाच वर्षे देशाला स्थिर सरकार देण्याची काळजी घेतील. एकत्रिकरण करायला हातभार लावण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पवारांनी वर्तवलेल्या भाकितामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील चौथा आणि अंतिम टप्पा होण्याआधी बरोबर आदल्या दिवशी पवारांनी मायावती, ममता आणि चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान होऊ शकतात, असे विधान करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले. मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी, विरोधकांचा मुख्य चेहरा असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अनुल्लेखाने मारत काँग्रेसच्या पोटात गोळा आणला. गंमत म्हणजे स्वतःचे कुठेही नाव येऊ दिले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांच्या नथीमधून तीर मारत त्रिशंकू परिस्थितीत पंतप्रधानपदी शरद पवार हेच योग्य उमेदवार कसे आहेत, हे वदवून घेतले. पवारांच्या या खेळाला खरी रंगत येईल ती निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा अद्याप बाकी असला तरी पवार यांच्याप्रमाणेच सर्वच राष्ट्रीय पक्षांनी संभाव्य निकालांवर सरकार बनवण्याची बेरीज-वजाबाकी सुरू केली आहे. जर या निवडणुकीत एनडीएला सरकार स्थापनेसाठी आवश्यक जागा मिळाल्या नाहीत आणि काँग्रेसही कुठला चमत्कार करू शकली नाही तर तिसरी आघाडी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळवेल आणि सत्तेवर येईल, असा एक पर्याय समोर येत आहे. तिसर्‍या आघाडीचा हा प्रयत्न सुरू करणार्‍या तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सरकारसाठी काँग्रेसचे समर्थन घेण्यास तयार आहेत; पण त्यांची अट इतकीच आहे की, काँग्रेसने ड्रायव्हरच्या सीटवर बसण्याची म्हणजेच पंतप्रधान होण्याची मागणी करायची नाही. तिसरी आघाडी ही विनाकाँग्रेस, विनाभाजप अशी प्रादेशिक पक्षांची मोट असल्याने पवार यांच्या भाकिताप्रमाणे खरोखरच मोदी सरकार पडले तर हा एक पर्याय समोर येऊ शकतो का? आणि सध्या काँग्रेसशी आघाडी केलेल्या पवार यांना हा पर्याय पसंत पडेल का? हा महत्त्वाचा विषय आहे.

भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही समान अंतरावर ठेवण्याची इच्छा असलेल्या ममता, मायावती, केजरीवाल, चंद्राबाबू या सर्वच नेत्यांची महत्त्वाकांक्षा जबरदस्त आहे. त्यामुळे मोदी सरकार पडल्यावर पर्याय समोर येणे वाटते तितके सोपे नाही. पवार यांच्यासह सर्वच नेत्यांना आपली राज्यातील सत्ता राखणे किंवा मिळवणे महत्त्वाचे असल्याने मोदी सरकारला पर्याय देताना अनेक अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे गेली पाच वर्षे सत्ता भोगलेले मोदी आणि अमित शहा सहजासहजी सत्ता गमावतील, असे वाटत नाही. बहुमत मिळाले नसतानाही अनेक राज्यांत सत्ता मिळवण्याचा चमत्कार अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षांत करून दाखवला आहे. लोकसभेसाठीही त्यांनी अशीच तयारी केली असेल. साहजिकच आगामी काळ भारतीय राजकारणासाठी अत्यंत कसोटीचा काळ ठरणार का? असा प्रश्न मोदी सरकार न टिकण्याच्या पवार यांनी व्यक्त केलेल्या भाकितामुळे प्रथमदर्शनी पडतो.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!