Type to search

पवारांची माघारी गृहकलहामुळे?

ब्लॉग

पवारांची माघारी गृहकलहामुळे?

Share
आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या धक्कादायक निर्णयामुळे माढा आणि मावळ हे दोन लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्वत: पवारांनीच जाहीर केले होते. पण त्यानंतर काही दिवसातच ‘यूटर्न’ घेत लोकसभा लढवणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी माघारही घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

एका घरात तिघांना उमेदवारी नको आणि नव्या पिढीला संधी देण्यासाठी माढ्यातून माघार घेत असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले असले तरी पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेण्यामागे पवार कुटुंबातील गृहकलह हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. वरवर शांतता वाटत असली तरी कुठेतरी ठिणगी पडल्याचे गेल्या काही दिवसांतील पवारांच्या वक्तव्यावरून जाणवते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कौटुंबिक गृहकलह नवीन नाही. कोणी काहीही म्हटले तरी गृहकलहामुळेच ठाकरे आणि मुंडे कुटुंबाची घरे फुटली आणि आजही ती एकत्र येऊ शकलेली नाहीत.

हाच राजकीय गृहकलह आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा कायमच केंद्रबिंदू असलेल्या शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवारचा मावळ भागात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू झाला होता. पवार घराण्यातील फक्त शरद पवार आणि सुप्रिया सुळे निवडणूक लढवतील असे पवार यांनी जाहीर केल्यानंतरही पार्थचा प्रचार सुरूच होता. त्यामुळे थेट पवारांनाच आव्हान दिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर दुसरीकडे पार्थला मावळची उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पवारांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्यासाठी वेगवेगळ्या मध्यस्थांना विनवणी केली जात होती. पार्थच्या उमेदवारीवरून सुरू झालेला कौटुंबिक संघर्ष थेट चव्हाट्यावर येऊ नये यासाठी पवारांनी सावध पवित्रा घेतला. अशातच माढ्यातून निवडणूक लढवण्याबाबत पवारांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी कुटुंबातील दोघेच निवडणूक लढवणार असल्याचे कारण देत माघार घेतली. मात्र या सगळ्या घडामोडीत पवार कुटुंबातील राजकीय गृहकलह चव्हाट्यावर आला.

शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित पवार आधीपासूनच पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असून पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार हे पवार कुटुंबात पितृस्थानी होते. त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता. पण अजित पवार आधीच सक्रिय असल्याने त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती अ‍ॅग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला. पण राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित यांना राजकारणात रस आहे. ते 31 वर्षांचे आहेत. पुण्याच्या मगरपट्टा सिटीचे सर्वेसर्वा सतीश मगर यांचे ते जावई आहेत आणि सध्या ते महाराष्ट्रभर फिरून जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना विधानसभा लढवण्यात रस आहे. त्यामुळेच हडपसर किंवा कर्जत-जामखेडची चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे बोलले जातेय.

भविष्यात रोहित पवारांचा वारसा चालवणार असल्याची चर्चा होती. यामुळे अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ अस्वस्थ झाले होते. बहुधा त्यामुळेच पार्थ यांना मावळ मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली होती. हे सुरू असतानाच पवार यांनी माढ्यातून आपली उमेदवारी जाहीर केली. आपली उमेदवारी जाहीर करतानाच या लोकसभा निवडणुकीत आपण आणि आपल्या कन्या सुप्रिया सुळे हे दोनच पवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, असे सांगण्यासही पवार विसरले नव्हते. साहजिकच पार्थ यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच अडचणीत आल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये पसरली होती.

या ना त्या मार्गाने अजित पवारांनी आपली ताकद दाखवून दिली असतानाच पवारांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी ‘साहेबांनी फेरविचार करावा’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून शरद पवार यांनी केलेल्या राजकारणाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा आम्ही आदर करतो. पण आदराच्या पुढेही एक प्रेम असते. त्या प्रेमाखातर माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना वाटते की निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा भावना व्यक्त केल्या.

एकीकडे अजित पवारांकडून दबाव आलेला असताना दुसरीकडे रोहित पवारांनी फेरविचार करण्याचा दिलेला सल्ला पाहता पवार कुटुंबात एकवाक्यता नसल्याचे दिसते. शरद पवारांच्या निर्णयाला कुटुंबातील राजकीय वर्चस्वाच्या वादाचीही किनार दिसते. रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट त्याचेच द्योतक आहे. मावळ मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे हे लक्षात घेऊन शेकाप नेत्यांच्या तोंडून पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करून किंवा तशी मागणी करून अजित पवारांनी शरद पवारांवर एकप्रकारे दबाव आणला. यापूर्वी दोन वेळा आझम पानसरे, राहुल नार्वेकर हे उमेदवार फसल्यावर आता घरचा उमेदवार देण्यासाठी अजित पवारांनी दबाव निर्माण केला. या कौटुंबिक दबावापुढे पवारांना नमते घ्यावे लागले, हेच यातून दिसून येते.

ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा शब्द अंतिम मानला जातो त्याच पक्षाच्या घड्याळाला आता कोण चावी देणार याचेही चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!