पर्यावरणदिनी वृक्षारोपण करून चढले बोहल्यावर!

0

मनमाड| प्रतिनिधी:-जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात एका वधू-वर जोडप्याने बोहल्यावर चढण्या अगोदर वृक्षारोपण करून एका प्रकारे आपले कर्तव्य बजावले असून वधू वराने पर्यावरणा बाबत दाखविलेल्या जागरूकतेमुळे हा लग्न सोहळा आगळा वेगळा आणि चर्चेचा विषय ठरला.

येथील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख व सर्व पक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष बळीद यांची भाची पूजा व शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील प्रसाद भालेराव यांचा आज ५ जून रोजी विवाह होता.

आज जागतिक पर्यावरण दिन असल्याने पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पूजा व प्रसाद या वधू वरांनी बोहाल्यावर चढण्या अगोदर वृक्षारोपण करण्याचा मानस दोन्ही कुटुंबीयाकडे व्यक्त केल्या नंतर सर्वांना नवदाम्पत्यांची ही संकल्पना आवडली व त्यांनी या चांगल्या उपक्रमाला आपली संमती दिली.

वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे तयार करून वेगवेगळ्या झाडांची रोपे आणण्यात आली. लग्न विधी होण्या अगोदर वर्‍हाडी मंडळीच्या साक्षीने वधू वरांच्या हस्ते सुमारे १०० ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्यासह वधू वरांचे आई-वडिलांनी देखील वृक्ष रोपण केले.

लग्न सोहळे अनेक होतात मात्र सामाजिक जाणीव व बांधिलकी जपणारे लग्न सोहळे फार कमी होतात त्यात पूजा आणि प्रसाद यांच्या विवाह सोहळ्याची नोंद झाली असल्याचे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

*