Type to search

ब्लॉग

पर्याय ‘सीड बॉल’चा..!

Share

सुंदर देश ज्या पृथ्वीचा एक भाग आहे ती नितांत सुंदर आहे, परंतु प्रदूषणाचे आक्रमण या पृथ्वीवर झाले आहे. आपण 24 तास अखंडपणे श्वास घेत असतो. वायुप्रदूषण हेच आपल्यापुढील सर्वात मोठे संकट आहे. गेल्यावर्षी वायुप्रदूषणामुळे उत्तर भारतातील शाळांना सुट्या द्याव्या लागल्या होत्या, ही अत्यंत नामुष्कीजनक गोष्ट होय. हवा आणि त्यातील घटकांचे आकलन करण्यासाठी वापरला जाणारा निकष म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांक अनेक शहरांमध्ये अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये भारतातील सात शहरांचा समावेश आहे. एका अहवालानुसार, दिल्लीत राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे सरासरी आयुर्मान केवळ वायुप्रदूषणामुळे दहा वर्षांनी घटले आहे. सातत्याने बिघडत असलेल्या स्थितीला सर्वाधिक जबाबदार आहे ती जंगलतोड. याबरोबरच वाढते शहरीकरण, वाढती कारखानदारी,

वाहनांमधून होणारे उत्सर्जन, नागरिकांमध्ये जागरुकतेचा अभाव आणि पिकाचे अवशेष जाळून टाकण्याची प्रथा ही कारणेही प्रदूषण वाढवत आहेत.जगातील सर्व सजीव ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साईड सोडतात, मात्र झाडे कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, हा धडा जीवशास्त्रात आपल्याला शिकवला जातो. याचाच अर्थ आपले जगणे वृक्ष-वेलींच्या जगण्याशी कायमस्वरुपी बांधले गेले आहे. जर आपल्याला अधिक काळ जगायचे असेल तर एकमेव उपाय म्हणजे अधिकाधिक झाडे लावणे. झाडे लावणे ही राष्ट्रीय सवय बनली पाहिजे. वृक्षलागवड आपल्याला आता युद्धपातळीवरच करावी लागणार आहे. जंगलतोड आणि शहरांमधील वृक्षतोड इतक्या वेगाने झाली आहे की, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी युद्धपातळीवर काम, हाच उपाय शिल्लक आहे. त्यासाठी ‘सीड बॉल’ हा एक प्रभावी पर्याय आहे. सोप्या शब्दांत ‘सीड बॉल’ची व्याख्या सांगायची झाल्यास मातीच्या गोळ्यांमध्ये बिया समूहाने रुजवून त्या चेंडूसारख्या फेकता येतील, असा आकार तयार करणे आणि फेकणे. यालाच ‘अर्थ बॉल’ म्हणजेच पृथ्वीचा गोल असेही म्हणतात. बियांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले कोकोपिटसारखे घटक मातीच्या चेंडूतच समाविष्ट करण्यात येतात. बिया आणि माती दोन्ही ओले असतानाच सीड बॉल तयार केले जातात. लाडू वळल्याप्रमाणे त्याला चेंडूसारखा गोल आकार दिला जातो. या मातीच्या गोळ्यातून बिया अंकुरण्याची क्षमता प्राप्त करतात. बिया खाणार्‍या जीवजंतूंपासून बियांचे रक्षणही हा मातीचा गोळाच करतो.

फेकलेल्या गोळ्यातून उगवलेले अंकुर कोणत्याही मानवी प्रयत्नांशिवाय जगण्यासाठी मार्ग शोधतो. जेव्हा हे गोळे फेकले जातात तेव्हा त्याला ‘सीड बॉम्ब’ असेही म्हटले जाते. ‘सीड बॉल’ हे एक पुरातन आणि तितकेच काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले तंत्र आहे. झाडे लावण्याच्या या पद्धतीचा वापर प्राचीन संस्कृती जपणार्‍या देशांमध्ये यशस्वीरीत्या केला जातो. जपानमध्ये हे तंत्र ‘तास्ची डांगो’ म्हणजे ‘अर्थ डंपिंग’ या नावाने ओळखले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानमधील मसानोबू फुकुओका यांनी या पद्धतीला पुनरुज्जीवित केले आणि ती शेतीकामात प्रचलित केली. अमेरिकेत ‘एरिअल सीड बॉम्बिंग’चा वापर केला जातो. म्हणजेच दुर्गम भागात विमानांमधून बॉम्ब वर्षाव केल्याप्रमाणे हे मातीचे गोळे फेकण्यात येतात. सीड बॉल हा वृक्षारोपणाचा अत्यंत सोपा आणि सरळ मार्ग आहे. हे बॉल तयार करण्यास अत्यंत सोपे असतात. त्यासाठी बागकामाचे कौशल्य असलेच पाहिजे असे नाही. हे सीड बॉल डोंगरांवर तसेच नद्या आणि अन्य जलस्रोतांजवळ फेकले जातात. अशा ठिकाणी बियांचे अंकुरण सहजगत्या होते. बीजरोपणाच्या पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ही पद्धत अधिक प्रभावी ठरू शकते. या तंत्राचा वापर मोठ्याप्रमाणावर रोपणासाठी करता येतो, हा फायदा आहेच शिवाय नांगरट किंवा रोपांसाठी खड्डे खणणे अशा बाबींसाठी श्रम करण्याचीही असत गरज नाही. कोणत्याही प्रकारची यंत्रसामुग्री लागत नाही. सीड बॉलची किंमत बियांच्या किमतीवरच अवलंबून असते. याखेरीज सीड बॉलचा यशस्वीतेचा दरही बीजारोपणाच्या किंवा वृक्षारोपणाच्या अन्य पद्धतींच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.

या पद्धतीत वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा समूह तयार केला जातो. परागीकरण आणि कीड नियंत्रण करणारे घटक सीड बॉलमध्ये वापरण्यात येणार्‍या मातीतच असतात. त्यामुळे या पद्धतीद्वारे वृक्षारोपण केल्यास अंकुरण आणि झाडे तयार होण्याच्या प्रक्रियेतील यशस्वीता इतर पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत अधिक असते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान लुधियानामध्ये नुकतेच हे सीड बॉल देवाचा प्रसाद म्हणून वाटण्यात आले. हे तंत्र घरोघरी पोहोचावे, हा त्यामागील हेतू होता आणि तो साध्यही झाला. लुधियानाच्या रथयात्रेत उभारण्यात आलेल्या 250 स्टॉल्सवरून सुमारे दीड लाखांहून अधिक सीड बॉल वितरीत करण्यात आले. या तंत्राचा वेगाने प्रसार झाल्यास आपण देशातील हिरवाई वाढवू शकतो आणि त्यायोगे आपल्या वसुंधरेवर येऊ घातलेल्या अनेक संकटांचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतो.
नवनाथ वारे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!