परीक्षा केंद्रावरील उपद्रव रोखा अन्यथा पर्यवेक्षकांवर कारवाई – अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे

अपर जिल्हाधिकार्‍यांंनी शिक्षण विभागाला सुनावले

0

नाशिक | दि. ८ प्रतिनिधी- जिल्ह्यात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. यामुळे जिल्ह्याची बदनामी होत असून परीक्षा केंद्रावरील उपद्रव रोखा अन्यथा केंद्रावरील पर्यवेक्षकांवर कारवाईसह शिक्षणाधिकार्‍यांंची चौकशी करण्याचा इशारा देत अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी शिक्षण विभागाला चांगलेच धारेवर धरले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या अपयशामुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. अनेक केंद्रांवर भिंतीवर चढून कॉपी पुरवली जाते. पालक, शिक्षकांचा मास लेव्हलवर सहभाग असेल तर अशा केंद्रावर त्वरित कारवाई करा.

पोलिसांची जादा कुमक घ्या. १६ बदनाम केंद्रांसाठी पोलीस अधीक्षकांनी ९ पथके नेमावी असे सांगून शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास जिल्हा यंत्रणा शासनाकडे प्रस्ताव पाठवून अशा बदनाम केंद्रांचे परीक्षा केंद्र रद्द करेल, असा इशाराही बगाटे यांनी दिला.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू असून दहावी परीक्षेसाठी विभागात २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. नाशिकमधील १८८ केंद्रांवर ९६ हजार ७३० विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार वाढल्याची बाब समोर आली आहे. भिंतीवर चढून कॉप्या पुरवण्याचे प्रकार घडत असून यामुळे जिल्ह्याची बदनामी हात आहे. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून यासंदर्भात आज बैठकीत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात होणार्‍या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतील गैरप्रकार टाळण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तीस फिरण्यास, अनधिकृत वाहनास प्रवेश, सेल्युलर फोन, कॉडलेस फोन, मोबाईल फोन अथवा वायरलेस सेट नेण्यास तसेच परीक्षा केंद्र परिसरात झेरॉक्स मशीन, फॅक्स, लॅपटॉप अथवा तत्सम साधने,

अग्निशस्त्र, घातक शस्त्रे बाळगण्यास किंवा घेऊन जाण्यास बंदी केली आहे. आदेशाचा भंग करणार्‍या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलमनुसार कारवाई करण्यात येईल. सदर आदेश परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग, पोलीस अधिकारी व कर्मचारी, विभागीय मंडळ, नाशिक व परीक्षा दक्षता पथक यांना लागू असणार नाही.  मात्र याव्यतिरिक्त बाहेरील व्यक्ती केंद्रावर आढळून आल्यास पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

केंद्र रद्द करू
माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाच्या परीक्षा सुरू असून या परीक्षा केंद्रांवर कॉपींचे प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील उपद्रव रोखण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच केंद्रावर परीक्षार्थी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्ती आढळून आल्यास संबंधित केंद्राच्या पर्यवेक्षकावर कारवाई केली जाईल. तसेच शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास केंद्र रद्द केले जाईल.
कान्हुराज बगाटे, अपर जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

*