Type to search

ब्लॉग

परिस्थितीमुळे लढती रंगतदार

Share
बहुतेक मतदारसंघ ठराविक पक्षाचे किंवा नेत्यांचे बालेकिल्ले असतात. त्यांना तिथे चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यांची ठळक अशी ओळख बनलेली असते. पण काही मतदारसंघ बदलत्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीमुळे चर्चेत येतात. अचानकच तिथली राजकीय समिकरणे बदलतात आणि त्या बदलत्या गणितांमुळे हे मतदारसंघ चुरशीच्या लढतीचे साक्षीदार बनतात. असेच काहीसे घडत आहे. बेगुसराय आणि भोपाळ मतदारसंघांबाबत.

बदलती राजकीय परिस्थिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये गहिरे रंग भरत आहे. सर्वसाधारणपणे बहुतेक मतदारसंघ ठराविक पक्षाचे किंवा नेत्यांचे बालेकिल्ले असतात. त्यांना तिथे चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यांची ठळक अशी ओळख बनलेली असते. पण काही मतदारसंघ बदलत्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीमुळे चर्चेत येतात. अचानकच तिथली राजकीय समिकरणे बदलतात आणि त्या बदलत्या गणितांमुळे हे मतदारसंघ चुरशीच्या लढतीचे साक्षीदार बनतात. असेच काहीसे घडत आहे. बेगुसराय आणि भोपाळ मतदारसंघांबाबत. सध्या या मतदारसंघातली लढाई देशाचे लक्ष वेधून घेत आहे.

बिहारमधल्ल्या बेगुसराय या मतदारसंघाचे आतापर्यंतचे निवडणूक निकाल पाहिले, तर गेल्या वेळचा अपवाद वगळता इथे कायम धर्मनिरपेक्ष पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिल्याचे दिसते. डाव्यांचे उमेदवारही इथून निव़डून आले होते. पण फार काळ एका पक्षाला संधी देण्याची या मतदारसंघातल्या नागरिकांची मानसिकता नाही. संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, भाजप, काँग्रेस, कम्युनिष्ठ अशा सर्वांनाच या मतदारसंघातून कधी ना कधी संधी मिळाली आहे. मागच्या वेळी डॉ. भोलासिंह या मतदारसंघातून निवडून गेले. तेव्हाच्या तिरंगी लढतीचा त्यांना फायदा झाला. देशभर डाव्या विचारांचा नेता आणि कट्टर मोदी विरोधक म्हणून ज्याचे नाव पुढे आले, तो कन्हैयाकुमार बेगुसराय मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहे.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून त्याच्या नावाची चर्चा होती. संसद हल्ल्याचा मुख्य आरोपी अफजल गुरू याच्या समर्थनार्थ मेळावा घेतल्याचा आणि देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. भाजपने देशद्रोही म्हणून संभावना केली असली, तरी त्याच्याविरोधातले आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्याला बिहारच्या बेगूसरायमधून मैदानात उतरवले आहे. बिहारमध्ये महाआघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे; मात्र त्यात सीपीआयला एकही जागा देण्यात आली नाही. त्यानंतर सीपीआयने कन्हैयाकुमारची उमेदवारी घोषित केली.

या मतदारसंघातून एनडीएकडून भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गिरीराज सिंह हे वादग्रस्त खासदार आहेत. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपला वारंवार तोंडघशी पडावे लागले आहे. महाआघाडीने बिहारमधल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला वीस जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यातली एक जागा राजद सीपीआयला (एमएल) देणार आहे. सीपीआय (एमएल)कडून राजू यादव यांना उमेदवारी मिळू शकते. सीपीआयला महाआघाडीत जागा न दिल्याने पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कन्हैयाकुमार बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातल्या बरौनी प्रखंडअंतर्गत येणार्‍या बिहट पंचायत क्षेत्रातला रहिवासी आहे. त्यांची आई अंगणवाडी सेविका तर वडील शेतकरी आहेत. एके काळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या बेगुसरायमध्ये सध्या भाजपचे वरिष्ठ नेते भोला सिंह खासदार होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तनवीर हसन तर सीपीआयचे राजेंद्रप्रसाद सिंह संयुक्त जनता दलाच्या पाठिंब्यावर तिसर्‍या क्रमांकावर होते. आता कन्हैयाकुमार राष्ट्रीय राजकारणात नशीब आजमावत आहे. बेगुसरायमधून कन्हैयाकुमारने निवडणूक लढवावी,

यावर सर्व डाव्या संघटनांचे एकमत झाले होते. काही दिवसांपूर्वी कन्हैयाकुमारने म्हटले होते की, संविधान हाच आमचा चेहरा असून हाच चेहरा घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवून भाजपसारख्या मनुवादी पक्षाला हरवू. पंतप्रधान निवडणे म्हणजे वर्गाचा मॉनिटर निवडण्यासारखे नाही. त्यामुळे चेहर्‍याच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही, असे त्याने स्पष्ट केले होते. आरक्षणाच्या मुद्यावर तो म्हणतो की, पाच हजार वर्षांपासून आर्थिक निकषावरच आरक्षण चालू आहे. धनाढ्याच्या मुलाला त्याच्या संपत्तीसाठी वेगळा अर्ज थोडाच करावा लागतो? ती संपत्ती दुसर्‍याला थोडीच मिळते? ती त्यालाच मिळते. हे आरक्षणच आहे. दारिद्य्ररेषेखालील लोकांना रेशन दिले जाते, हे ही एक प्रकारचे आरक्षणच आहे. नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री नव्हे, तर प्रचारमंत्री आहेत, असा आरोप त्याने केला होता. देश-विदेशात जाऊनही मोदी प्रचाराचे काम चालू ठेवतात. कुठल्याही योजना जमिनीशी जोडल्या गेलेल्या असाव्यात आणि त्याचे केवळ श्रेयासाठी मार्केटिंगही व्हायला नको; पण मोदी सतत मार्केटिंगमध्येच व्यस्त असतात. आज देशात गरीब-श्रीमंतांदरम्यानची दरी वाढत आहे. श्रीमंत श्रीमंतच होत चालला आहे. यावर मोदी कधी काही बोलत नाहीत, अशी टीका तो करतो.

कन्हैयाकुमार हे आता वलंयाकित व्यक्तिमत्त्व झाले आहे. त्यांच्यामुळे बेगुसराय हा मतदारसंघ अवघ्या देशात चर्चिला जात आहे. दोन वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांमधल्या लढतीमुळेही देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. इथे भाजपच्या गिरीराज सिंग यांना चांगला प्रतिसाद मिळत असला तरी कन्हैयाकुमारची जादू आणि स्थानिक जनतेचे एकाच उमेदवाराला पुन्हा संधी न देणे कितपत महत्त्वाचे ठरते, हे पहायचे. बदलत्या राजकीय समीकरणामुळे रंगतदार ठरणारा आणखी एक मतदारसंघ म्हणजे भोपाळ. भोपाळ हे मध्य प्रदेशच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखले जात असले, तरी 1984 मध्ये झालेल्या वायूकांडामुळे भोपाळ जगात ओळखले जायला लागले. वायू प्रदूषणामुळे एवढे बळी जाऊनही त्या कंपनीला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप अजूनही काँग्रेसजनांची पाठ सोडायला तयार नाही. नुकसानभरपाई मिळाली असली, तरी अजूनही या वायूकांडाच्या आठवणी अंगावर शहारे आणतात. अशा या राजधानीच्या शहरात गेली तीन दशके सातत्याने कमळच फुलत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अगोदर करिना कपूरचे नाव चर्चेत होते. नंतर अन्य नावे पुढे आली.

भाजपमधूनही अगोदर माजी उपपंतप्रधान अडवाणी यांचे नाव पुढे आले होते; परंतु नंतर त्यांना भाजपने सक्तीची विश्रांती दिली. काँग्रेसने 15 वर्षांनंतर मध्य प्रदेशची सत्ता काबीज केल्यानंतर आता लोकसभेतही दिग्गजांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणातून काहीशा दूर गेलेल्या दिग्विजय सिंह यांना काँग्रेसने इथून उमेदवारी दिली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने दिग्गीराजाला मैदानात उतरवले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपनेदेखील या मतदारसंघातून तगडा उमेदवार द्यायचे ठरवले आहे. विशेष म्हणजे 1989 पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यामुळे यंदादेखील विजय मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. अर्थात विदिशा मतदारसंघातून त्यांना संधी मिळाली नाही तर दोन माजी मुख्यमंत्र्यांमधील लढतीमुळे रंगत येईल. काँग्रेसने दिग्विजय सिंह यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला आणि भाजपने संधी दिल्यास भोपाळमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे म्हटले. 18 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात चार लाखांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. त्यातले बहुसंख्य मुस्लीम मतदार चौहान यांना पाठिंबा देतात.

गेल्या तीन दशकांपासून भाजपचा गड असलेला हा मतदारसंघ या वेळीदेखील भाजपने राखावा, यासाठी पक्ष शिवराज यांच्या नावाचा विचार करत असल्याचे समजते. दिग्विजय यांना यंदा त्यांच्या स्वत:च्या म्हणजेच राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती; पण कमलनाथ यांनी त्यांना भोपाळ मतदारसंघ दिला. दिग्विजय सिंह यांनी राजगड येथून 1984 आणि 1991 मध्ये विजय मिळवला होता. भोपाळ मतदारसंघात विधानसभेच्या आठ जागा येतात. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या आठपैकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर पाच जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. भोपाळमधून काँग्रेसनं 1984 मध्ये विजय मिळवला होता. मात्र 1989 पासून आतापर्यंत झालेल्या आठ निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. 2014 च्या निवडणुकीत विद्यमान खासदार आलोक संजर यांनी इथून 3.70 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
– अजय तिवारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!