पराभूत उमेदवारांकडून नाशिकमध्ये इव्हीएमची अंत्ययात्रा ; ईव्हीएम हटवाच्या घोषणा

0

नाशिक : ईव्हीएम मशीन हटवा, बॅलेटपेपरद्वारे मतदान सुरू करा, अशा घोषणा देत नाशिक शहरात आज पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जुन्या नाशिक भागातील चौक मंडईपासून सुरू केलेल्या या अंत्ययात्रेचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला. यात पराभूत उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जुन्या नाशिक भागातील चौक मंडई परिसरात दुपारी एकच्या सुमारास ही अंत्ययात्रा निघाली. त्यात परंपरागत बांबूची तिरडी तयार करण्यात आली. त्यानंतर या तिरडीवर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले. हातात मडके, त्यात जळणार्‍या गौवर्‍या, अत्तर, पांढरा कपडा अशी सर्वच जय्यत तयारी करण्यात आली होती.

या अंत्ययात्रेत एकच पर्व बहुजन सर्व या आशयाचे झेंडे घेत नाराज उमेदवार सहभागी झाले होते. त्यात मुस्लीम बांधवांची संख्याही मोठी होती. यावेळी या अंत्ययात्रेचे आयोजन करणारे छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रात म्हटले आहे की राज्य निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा अभ्यास केला असता असे दिसते की जाणून बुजून मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ करण्यात आला आहे.

मतदारांची नावे गहाळ करणे, इव्हीएम मशीनव्दारे घेण्यात आलेले मतदान व प्रत्यक्ष निवडीच्या वेळी झालेले मतदान यात मोठा फरक दिसून आला आहे. यामुळे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभाविषयी भारतीयांच्या मनात या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकशाहीलाही धोका आहे.म्हणून ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा मतपत्रिकांवर शिक्के मारण्याची पध्दत अवलंबिण्यात यावी ही प्रमुख मागणीही या प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आली.

निवडणूक आयोगसारखी स्वतंत्र संस्था असूनही शेवटी राज्य कर्मचारीच ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्था सांभाळतात त्यामुळे अशा वेळेला या कर्मचार्‍यांवर दबाव असणे नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार संशयास्पद असून यात सुधारणा करण्याची अपेक्षा छत्रपती शिवाजी ब्रिगेड मुस्लीम संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी पराभूत उमेदवारांकडून काही मागण्या करण्यात आल्या.

निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र अशी यंत्रणा असावी, संशयास्पद असलेल्या ईव्हीएम मशीन बंद करण्यात याव्यात, पुन्हा बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात याव्यात तसेच मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून मतदारांची नावे मतदार यादीत योग्य ठिकाणी समाविष्ट करण्यात यावी. या अंत्ययात्रेत सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी पराभूत उमेदवारांपैकी अजिज पठाण, योगेश निसाळ, अ‍ॅड सुजाता चौद्रते, हप्पाळ अबोंरे, इब्राहीम अत्तार, राजाभाऊ जाधव, बशीर शेख, विराज दाणी, रफीक साबीर, सचिन बिडकर, शिवराज जाधचक, राहुल बोराडे, आकाश गायकर, किरण माणके, सिध्दार्थ गायकवाड, आकाश वाषमारे, सिध्दार्थ ठेंगळे, अमर गांगुर्डे, योगेश पिंगळे, रवी पाटील, यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

*