पराभवाला अजित पवारच जबाबदार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पैठणकर यांचा आरोप

0

येवला । दि. 13 प्रतिनिधी –

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांविरोधात जिल्ह्यात येऊन केलेल्या वक्तव्यामुळेच भुजबळ समर्थक मतदारांनी राष्ट्रवादीविरोधात मतदान केले आणि त्यामुळेच पक्षाच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी पराभव झाला, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील पैठणकर यांनी केला आहे.

पैठणकर हे भुजबळांचे खंदे समर्थक समजले जातात.

राज्यात भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे, नोटबंदी तसेच शेतमालाचे कोसळलेले भाव या सर्वच बाबींमुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर चिड निर्माण झाली होती.

शेतकरी, शेतमजुरांसह ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसला एक समर्थ पर्याय म्हणून बघत असताना ऐनवेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका समोर असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविषयी पक्षातील भुजबळांची सद्दी संपली अशाप्रकारचे जाहीर सभेतून वक्तव्य केले.

अजित पवारांचे हे वक्तव्य भुजबळांविषयी अवमानकारक होते. हे वक्तव्य शिवसेना-भाजप या पक्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आणि भुजबळ समर्थक मतदारांमध्ये गैरसमज पसरवून शिवसेना-भाजपने या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये संपूर्ण जिल्हाभरात अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात नाराजीचा सूर उमटत होता.

एकीकडे छगन भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांविषयी आदर बाळगून असताना अजित पवारांनी भुजबळांविषयीची घुसमट जाहीर भाषणातून व्यक्त केली.

यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात भुजबळ समर्थक एकवटून विरोधात गेले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे व आ. पंकज भुजबळ यांनी जिल्ह्यात सभा घेऊन मतदारांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

यामुळे काही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. या यशाचे श्रेय निश्चितपणे खा. सुळे यांच्याकडे जाते, असेही सुनील पैठणकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*