Type to search

ब्लॉग

पन्नास वर्षांतील पहिला पराभव

Share

पार्थ पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांचा विरोध होता. पार्थच्या पराभवामुळे तो विरोध योग्य होता, हे सिद्ध झाले, अशी चर्चा आता सुरू आहे. पवार घराणे गेली 50 वर्षे राजकारणात आहे. त्या घराण्याचा पन्नास वर्षांतील हा पहिला पराभव आहे.

राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा तब्बल 2 लाख मतांनी पराभव झाला. पार्थ यांच्या पराभवाने पवार घराण्याची विजयी होण्याची 50 वर्षांची परंपरा मोडली आहे.

पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबीयांतील ‘गृहकलह’ समोर आला होता. पार्थच्या उमेदवारीमुळे एका घरातील तीन जण नको म्हणून खुद्द शरद पवार यांनी माघार घेतल्याचे बोलले जात होते. पार्थच्या उमेदवारीला शरद पवार यांचा विरोध होता, याचीही चर्चा होती. पार्थला सल्ला देणार नाही, ठेच लागल्यावर तो आपोआप शहाणा होईल, असे सूचक वक्तव्यही पवार यांनी केले होते. मग पार्थचा पराभव म्हणजेच ठेच समजायची का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शरद पवारांनी त्यांच्या नातवासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पार्थ पवार यांच्याबाबतच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रचारादरम्यान पार्थने केलेल्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवली गेली. शरद पवारांना जेव्हा याबाबत विचारण्यात आले तेव्हा मुलांना सल्ला द्यायचा नसतो, ठेच लागली की ते शिकतात आणि शहाणे होतात, असे सूचक वक्तव्य केले होते.

मावळ मतदार संघात पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यात लढत झाली. अजित पवार यांची ही राजकीय कर्मभूमी. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांना इच्छा नसूनही या ठिकाणी त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात भाग पाडले. मुलाला खासदार करून अजित पवार यांना मुलाचा राज्याभिषेक करायचा होता. म्हणून यंदाची मावळ येथील लढाई ही पवार कुटुंबीय विरुद्ध श्रीरंग बारणे अशी बनली होती. अर्थात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना शिवसेना-भाजपनेही वार्‍यावर सोडले नाही. त्यांच्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. महायुतीची इतरही नेतेमंडळी बारणे यांच्या प्रचारासाठी सक्रिय होती. एकेकाळचे अजित पवार यांचा उजवा हात समजले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपमध्ये जाऊन आमदार झाले आहेत. सध्या ते पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष आहेत. त्यांचे आणि बारणेंचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जुना मित्र म्हणून लक्ष्मण जगताप यांच्यावर अजितदादांची मोठी भिस्त होती. मात्र, श्रीरंग बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात समेट घडविण्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना यश आले. यानंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनोमिलन झाल्याचे स्पष्ट केले. बारणे आणि जगताप यांच्यात ‘समेट’ झाल्याने पार्थ पवार यांच्या अडचणीत भर पडली होती. पार्थ यांच्यासाठी सुरुवातीपासूनच ही निवडणूक अवघड मानली जात होती. मात्र, काहीही करून अजित पावर हे पार्थसाठी विजय खेचून आणतील, असे राजकीय निरीक्षक सांगत होते. पवार कुटुंबाचे वलय आणि त्यासाठीची सर्व व्यूहरचनाही करण्यात आली होती. पवार कुटुंबाचे वलय, राष्ट्रवादीने त्यांच्यामागे उभी केलेली ताकद यामुळे काहीही झाले तरी पार्थ निवडून येतील, हा राजकीय तज्ञांचा अंदाज मात्र चुकला.

या निवडणुकीच्या निमित्ताने पवार घराण्यातील व्यक्तीचा महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पराभव झाल्याने त्याची चर्चा राज्यभर सुरू होती. शरद पवार यांचा पार्थ यांच्या उमेदवारील पहिल्यापासून विरोध होता. पार्थ यांच्या पराभवामुळे शरद पवार यांनी सुरुवातीला उमेदवारी नाकारण्याचा निर्णय योग्यच होता हे मात्र स्पष्ट झाले आहे.

गेल्या 50 वर्षांपासून शरद पवार सक्रिय राजकारणात आहेत. मागील 50 वर्षांपासून पवार निवडणुकांत विजयी होत असल्याचा दाखला राष्ट्रवादी नेत्यांकडून दिला जातो. पवारांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी देखील आजवर सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र दुसरीकडे पवार घराण्यातील तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधी असणारे पार्थ यांना सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राजेंद्र पाटील, 9822753219

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!