पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप

0

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस ठार मारणार्‍या दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथील पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

संपत नामदेव टोंगारे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. 15 जानेवारी 2015 रोजी ही घटना घडली होती. येथील संपत टोंगारे हा पत्नी लताबाई (22) हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन नेहमी तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता.

15 जानेवारी रोजी दुपारी याच कारणातून टोंगारे दाम्पत्यात वाद झाला. यावेळी संतप्त संपतने कुर्‍हाडीच्या लाकडी दांडक्याने पत्नी लताबाईला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला.

ही घटना लक्षात येताच भेदरलेल्या संपतने पत्नीचा मृतदेह शेजारील शेतकर्‍याच्या विहिरीजवळ टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल होऊन संपत टोंगारेला अटक करण्यात आली होती. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. न्यायालयाने संपतला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात प्रत्यक्ष साक्षीदार नसताना घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी वकील संजय पाटील (गुरुळे) यांनी सात साक्षीदार तपासले.

LEAVE A REPLY

*