पंचवटीला पाचव्यांदा महापौर पदाचा बहुमान

0

पंचवटी । दि. 14 प्रतिनिधी
नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत नाशिक महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. सत्ता मिळवल्यानंतर महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या नाशिककरांचे लक्ष लागून असताना या पदावर पंचवटी विभागातून सलग पाचव्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका रंजना भानसी यांची वर्णी लागली. महापौर पदावर नियुक्तीची केवळ औपचारिकता बाकी असताना आज रंजना भानसी यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे पुन्हा एकदा पंचवटी विभागाला महापौर पदाचा बहुमान मिळाला असून या माध्यमातून पंचवटीला पाचव्यांदा महापौर पदाची संधी प्राप्त झाली आहे.

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यापासून अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली. मात्र महापौर पदाच्या बाबतीत पंचवटी विभाग इतर विभागांच्या तुलनेत नशीबवान राहिला आहे. पंचवटीतून यापूर्वी स्व.अ‍ॅड.उत्तमराव ढिकले, माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, विद्यमान आ.बाळासाहेब सानप, अशोक मुर्तडक आदींना पंचवटी विभागाचे प्रतिनिधित्व करीत असताना महापौर पदावर काम करण्याचा योग आला होता.

यावेळी प्रथमच नाशिक मनपावर भाजपने एकहाती सत्ता प्राप्त करीत झेंडा फडकवला. यातच महापालिकेत महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने या आरक्षणातून निवडून आलेल्या कोणत्या नगरसेवकास महापौर पदाची संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना सलग पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रंजना भानसी यांची महापौर पदावर वर्णी लावण्यात आली. रंजना भानसी प्रथम 1997 मध्ये म्हसरूळ वॉर्ड क्र.1 मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यां. यावेळी वॉर्ड क्र.1 आदिवासी महिला गटासाठी राखीव होता.

यानंतर भानसी यांनी राजकारणात कधीही पराभव बघितला नाही. 1997-2017 या कार्यकाळात भानसी यांनी महापालिकेत पंचवटी प्रभाग सभापती, तीनवेळा स्थायी समिती सदस्य या पदांवर काम केले. सलग दोन दशकांपासून महापालिकेत काम करीत असल्याने भानसी यांना कामाचा दांडागा अनुभव असल्याने व पक्षात ज्येष्ठ असल्याने पक्षाने त्यांना महापौर पदाची संधी दिली.

भानसी यांच्या माध्यमातून पंचवटी विभागाला पुन्हा एकदा महापौर पदाचा बहुमान मिळाल्याने पंचवटीकरदेखील आंनदोत्सव साजरा करीत आहेत. त्यातच पंचवटीकरांनादेखील त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा राहितील यात कुठलीही साशंकता नसून महापौर पदाच्या कार्यकाळात पंचवटी परिसराचा अधिक गतीने विकास होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

महापौर रंजना भानसी यांचा परिचय
नवनिर्वाचित महापौर रंजना पोपट भानसी यांचा जन्म पंचवटी परिसरात 1964 साली झाला. शालेय शिक्षण एस.एस.सी. पर्यंत झाले असून पंचवटीतील श्रीराम विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले.

रंजना भानसी या माजी खासदार स्व. कचरूभाऊ राऊत यांच्या कन्या असल्याने शालेय शिक्षण घेत असतानाच वडील राजकारणात असल्याने घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. स्व. कचरूभाऊ राऊत सन 1962-67 व 1972-78 या काळात आमदार झाले. नंतर 1997 साली भाजपकडून मालेगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तर आई गंगूबाई राऊत या गृहिणी होत्या.

भानसी यांचे पती पोपटराव बुधा भानसी आदिवासी विकास महामंडळात उपप्रादेशिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली.

रंजना भानसी यांना तीन भाऊ आहेत. यात विजय राऊत दिंडोरी येथील निगडोळ वि.का.सोसायटीचे चेअरमन आहेत. दुसरे बंधू शांताराम राऊत एस.टी.महामंडळात मॅकेनिक तर तिसरे बंधू दिलीप राऊत हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता असताना सेवानिवृत्ती घेतली आहे. तसेच भाजप शहर उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

रंजना भानसी यांना अतुल भानसी हा एक मुलगा तर नीलिमा महाले, पूनम चौधरी या दोन मुली आहेत.

LEAVE A REPLY

*