नोट बदलीप्रकरणाचे जि.प.च्या सामान्य प्रशासनातही कनेक्शन – सीबीआयच्या रडारवर वाणी

0

जळगाव | प्रतिनिधी :  नोट बदली प्रकरणात सीबीआयच्या चौकशीचा फास आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी आवळला जात आहे. आज सीबीआयच्या पथकाने जिल्हा परिषदेत येवून श्री.वाणी यांचे दालन तसेच बंद घराची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत ही चौकशी सुरूच होती. दरम्यान, बाहेरगावी गेलेले नंदकुमार वाणी रात्री १०.०५ मिनीटांनी घरी परतले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.

नोट बदली प्रकरणात सीबीआय पथकाकडून जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकासह चोपडा शाखा व्यवस्थापक व रोखपाल यांच्या गुन्हा दाखल आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने दोन आठवडयापूर्वी जिल्हा परिषदेतील सुनिल सुर्यवंशी, नंदू पवार, भुषण तायडे यांची चौकशी करण्यात आली होती.

त्यानंतर या तिघांना चोैकशीसाठी मुंबई येथे देखील बोलविण्यात आले होते. तेव्हापासून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी सीबीआयच्या रडारवर होते. आज दुपारी सीबीआयच्या पथकाने जिल्हा परिषदेत येवून सीईओ अस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून वाणी यांच्या दालनाच्या तपासणीची परवानगी घेतली.

सीबीआयचे पथक ४.०५ वाजता जि.प.त दाखल

नंदकुमार वाणी यांच्या दालनाची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या पथकाने सीईओ पाण्डेय यांची भेट घेत, नंदकुमार वाणी यांच्या विरुध्द अमळनेर न्यायालयाचे सर्च वॉरंट असल्याचे सांगितले. त्यानंतर सीबीआयचे पथक सामान्य प्रशासन विभागात दाखल झाले.

नंदु वाणी २० दिवसापासून रजेवर

नंदकुमार वाणी यांच्या मुलाचा दि.५ मार्च रोजी विवाह राहिल्याने ते दि. १ मार्चपासून रजेवर होते. याकालावधीत जि.प.तील तिन्ही अधिकार्‍यांची सीबीआय चौकशी झाल्याने वाणी यांनी त्यांची रजा वाढवून घेतली. दरम्यान, वाणी रजेवर असल्याने सामान्य प्रशासन विभागाचा पदभार डेप्युटी सीईओ राजन पाटील यांच्याकडे असल्याने सीबीआयच्या पथकाने राजन पाटील यांना त्याठिकाणी बोलवून त्यांच्या समक्ष नंदू वाणी यांच्या दालनाची दुपारी ४.१० ते ६.०५ वाजेपर्यंत तपासणी केली.

सीबीआयच्या पथकाने त्यांच्या दालनातील फाईली व कागदपत्रांची तपासणी केली . तसेच काही दस्तऐवज ताब्यात घेवून सीबीआयचे पथक सायंकाळी ६.०५ वाजता जिल्हा परिषदेतून बाहेर पडले.

वाणी नॉटरिचेबल

नंदकुमार वाणी यांनी मुलांच्या विवाहानंतर रजा वाढविली असून ते दि.२४ पर्यंत रुजू झालेले नव्हते . दरम्यान पुन्हा रजा वाढविली असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून समजते. दरम्यान त्यांच्याशी संपर्क साधाला असता, ते नॉटरिचेबल होते.

वाणीच्या वकीलाकडून सर्च वॉरंटची मागणी

रात्री ७.४५ वाजता. नंदकुमार वाणी यांचे वकील ऍड. भुषण देव यांनी वाणी यांच्या घरी येवून सीबीआयच्या पथकाला सर्च वॉरंटीची मागणी केली. सीबीआयच्या पथकाने अमळनेर न्यायालयाचे सर्च वॉरंट दाखविले.

रात्री १०.०५ मिनिटांनी वाणी गावाहून परतले

वाणी हे गावी गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. सायंकाळी ६.३५ वाजेपासून सीबीआयच्या पथकाकडून वाणी यांच्या बंगल्याची तपासणी सुरु होती. त्यानंतर रात्री १०.०५ मिनिटांनी वाणी घरी परतले. त्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु असल्याचे समजते.

रात्री १० वाजता नंदकुमार वाणी घरी दाखल

नंदकुमार वाणी बडोदा येथे मुलीकडे खाजगी कामानिमित्त दि.२१ पासून गेले होते. आज दुपारी १.३० वाजता ते बडोद्याहून जळगावकडे येण्यास निघाले असता, दुपारी त्यांना नवापूर येथे असतांना सीबीआयच्या पथकाचा फोन आला होता. त्यानंतर ते रात्री १०.०५ वाजता एम.एच. १९ सीएफ ५८९९ इनोव्हा कारने त्यांच्या घरी दाखल झाले.

कल्पेश वाणीच्या कार्यालयाची तपासणी

मध्यरात्री १२.०५ वाजता पथकाने नंदू वाणी यांचा मुलगा कल्पेश वाणी यांच्या कार्यालयाची तपासणी केली. घरापासून कल्पेशचे कार्यालय जवळच आहे. तपासणी सुरू असतांनाच १२.२० वाजता सीबीआय पथकातील काही जणांनी बाहेर उभी असलेल्या कल्पेशच्या डिझायर कारची (क्रमांक एमएच-१९/एपी-१२१३) झाडाझडती घेतली.

LEAVE A REPLY

*