नोटबंदीनंतर जळगाव जिल्हा बँकेतून ७३ लाख ३२ हजारांच्या नोटांची अदलाबदली -कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चोपडा येथील शाखेत ७३ लाख रूपयांच्या नोटबदली प्रकरणात आज सीबीआयकडुन जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक, शाखा व्यवस्थापक आणि रोखपाल यांच्याविरूध्द कटकारस्थान रचुन सरकारी कामात गैरव्यवहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केल्यानंतर सर्वत्र नोटबदलीची प्रक्रिया सुरु झाली. या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जिल्हा बँकांना नोटबदलीबाबत निर्बंध लावले. असे असतांनाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा येथील शाखेतून ७३ लाख ३२ हजार रुपयांच्या १०० च्या नोटा कटकारस्थान व संगनमत करुन, खोटे दस्तावेज बनवून, हिशोबात खाडाखोड करुन बदलविण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या तपासणीतून समोर आली.

सीबीआयच्या पथकाने याबाबत आज चोपडा आणि जळगाव येथील मुख्य शाखेतील आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली. या चौकशीत चोपडा येथील प्रकरणात तथ्य आढळून आल्याने जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, चोपडा शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर पाटील आणि रोखपाल रविशंकर गुजराथी यांच्याविरुध्द सीबीआय पथकाने भा.दं.वि. कलम १२० ब, ४२०, ४६८, ४७१, ४७७ अ आणि १३ (२), १२ (१) (ड) याप्रमाणे तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

दप्तरही ताब्यात

सीबीआयच्या पथकाने तपासणीवेळी चोपडा शाखा आणि जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेतील व्यवहारांची माहिती घेवून दप्तर ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.तसेच या प्रकरणात आणखी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सीबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शाखा व्यवस्थापकांच्या घराची तपासणी

सीबीआयच्या पथकाने बँकेच्या शाखेची तपासणी करण्याआधी शाखा व्यवस्थापकांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते.

जिल्हा बँक अध्यक्षा नॉटरिचेबल…

जिल्हा बँकेवर माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. सीबीआयने केलेल्या या तपासणी आणि दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता, त्या नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात आले.

ही रक्कम कुणाची?

नोटबंदी काळात रिझर्व्ह बँकेने नोटबदलीवर निर्बंध लावलेले असतांनाही जिल्हा बँकेच्या शाखांमार्फत नोटा बदली करण्यात आल्या. ७३ लाख ३२ हजार रुपये एवढ्या रकमेच्या १०० च्या नोटा नेमक्या कुणाच्या? याविषयी जिल्हाभरात चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

*