Type to search

ब्लॉग

नॉक नॉक मोबाईल वापर!

Share

नाशिकमध्ये नुकताच महाकवी कालिदास सभागृहात ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ हा नाट्यप्रयोग झाला. प्रयोग अतिशय सुंदर रंगला होता. क्षिती जोग आणि सुमित राघवन यांनी आपल्या भूमिका अगदी पुरेपूर वठवल्या होत्या. त्यांच्या कसदार भूमिका बघण्याचा आनंद आम्ही घेत असताना रसभंग घडवणार्‍या काही गोष्टी प्रेक्षागृहात घडत होत्या.

दुसर्‍या अंकामध्ये सुमित राघवन आपल्या भूमिकेमध्ये एकदम रंगून गेले होते आणि तेव्हा एका व्यक्तीचा मोबाईल सारखा वाजत होता. एक बाईपण मोबाईलवर बोलण्यासाठी सारख्या दाराजवळ येत होत्या.एका व्यक्तीला दार उघडून बाहेर जावे लागले. दाराचा जोरात आवाज झाला. हे सारे प्रसंग प्रेक्षकांना खूप विचलित करत होते. दरम्यान, एका ज्येष्ठ गृहस्थांचा मोबाईल वाजू लागला आणि तो मोबाईल कसा बंद करावा किंवा सायलेंटवर कसा टाकावा हे तंत्र त्यांना अवगत नसल्याने ते मोबाईल बंदही करू शकले नाही. तेव्हा मात्र सुमित राघवन यांची पण सहनशक्ती संपुष्टात आली आणि त्यांनी उद्वेगाने म्हटले,‘ खरोखरच खूप खेदजनक असा हा प्रसंग आहे. आम्ही कलाकार भूमिकेमध्ये रमून गेलेलो असतो आणि आम्हाला असा आवाजांचा त्रास होत असतो.. खूप वाईट वाटत आहे की कलाकारांना कुणी समजून का नाही घेत?’ असे म्हणून ते उद्वेगाने विंगेत निघून गेले. प्रेक्षागृहात एकच गोंधळ उडाला. त्या वृद्ध व्यक्तीला लोक वाटेल तसे बोलले. लोकांनी अगदी शिवीगाळदेखील केली. त्या व्यक्तीला खरोखरच आपल्या मोबाईलचे तंत्र माहीत नसल्याने अशी घोडचूक घडली होती.

सुमितजी आत निघून गेल्याने एकदम गोंधळ झाला. सगळेच त्यांना सॉरी म्हणू लागले आणि तेही मोठ्या मनाने पुन्हा स्टेजवर आले तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते म्हणाले, ‘मी प्रयोग संपल्यावर मुंबईला निघून जाईन पण तुम्हालाच खंत वाटत राहील की आपण अशा रसभंगाच्या वातावरणात नाटक पाहिले.’ एखाद्या पट्टीच्या गायकाला गाणे रंगात आल्यावर रसभंग रुचत नाही अगदी तसेच नाट्यकलाकारांचेदेखील असते. भूमिकेत शिरताना त्यांना लक्ष केंद्रित करावे लागते. जणू काही त्यांचा कायापालट होत असतो. भूमिकेशी तादात्म्य पावताना अभिनयाचा कस लागत असतो. मायबाप प्रेक्षकांच्या काळजापर्यंत त्यांना पोहोचायचे असते. त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. हे सारे त्यांच्यासाठी मेंदू पिळवटून टाकणारे असते. त्यामुळे समोर शांतता असणे नक्कीच अनिवार्य ठरते. पण असा एखादा कटू अनुभव आपल्या गावाची प्रतिमा मलिन करून टाकतो आणि आपण काहीच करू शकत नाही. नवीन माध्यमे वापरायची तर तंत्रज्ञान माहीत असले पाहिजे पण ते गंभीरतेने घेतले जात नाही. तात्पर्य मोबाईल साक्षरता गरजेची आहे. कारण प्रेक्षक तिकीट काढून, आपला अमूल्य वेळ खर्च करून नाटकाला आलेले असतात. त्यांना निष्कारण मनःस्ताप होतो.
– स्वाती पाचपांडे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!