नेवाशात ओढ्याच्या पाण्यात तरुण गेला वाहून

0

रात्री उशिरापर्यंत शोध  तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस

 

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा येथे ओढ्याला आलेल्या पाण्यात तरुण वाहून गेल्याची घटना काल सायंकाळी घडली असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला जात होता.

 

 
नेवासा येथील मारुतीनगर प्रभाग क्र. 17 मध्ये राहणारा अक्षय अशोक गवळी (वय 22) हा बांधकाम मजूर युवक काम संपल्यावर सायंकाळी 7 च्या सुमारास घराकडे परतत असताना नेवाशातील चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला खंडाळे वस्तीजवळ असलेल्या ओढ्यातून जात असताना ओढ्याला अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पडून तो वाहून गेला.

 

 

त्याच्या बरोबरचे अन्य दोघे साथीदार पाण्यातून पलिकडे जाण्यात यशस्वी ठरले. घटनेनंतर नायब तहसीलदार प्रदीप पाठक यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केली. सदर ओढा खुपटीकडून येतो व मधमेश्‍वर बंधार्‍याला मिळतो. त्यामुळे मधमेश्‍वर बंधार्‍यामध्ये शोध घ्यावा लागणार असून उद्या शनिवारी दिवसा शोधकार्य वेगाने हाती घेतले जाण्याची शक्यता आहे.

 

 

सदर ओढ्याच्या पुलाची उंची रस्त्यापेक्षाही कमी असल्याने ओढ्याला पाणी असताना सर्व पाणी पुलावरुनच वाहत असते. याआधीही याचठिकाणी पाण्यात पडून वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या असून आतातरी या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

 

 

पेरण्या होणार सुरु
नेवासा तालुक्यातील उस्थळदुमाला, वडाळा, घोडेगाव, भेंडा, कुकाणा चांदा, देडगाव परिसरात काल सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला असून आधी पडलेल्या पावसामुळे येथे पेरणीयोग्य ओल झाली असून पेरण्या सुरू होणार आहेत.

 

 
नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाणा, देडगाव, चांदा, फत्तेपूर, रस्तापूर, देवगाव, वडाळा, घोडेगाव परिसरात याआधी वादळासह जोरदार पाऊस झाला होता. काही ठिकाणी चांगल्या पावसामुळे कपाशी लागवडीस सुरुवातही झालेली आहे. आता काल पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने या भागात पेरणीयोग्य ओल झाली असून दोन दिवसात पेरण्या सुरु होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या उर्वरीत भागात मात्र अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे.

LEAVE A REPLY

*