नॅनो तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडतील – डॉ.पाटील

0

भुसावळ |  प्रतिनिधी : तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर विविध बदल बघावयास मिळत आहे. सदरचे संशोधन हे ग्रामिण भागात देखील घडणे अवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीकडे विद्यार्थ्यानी संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. नॅनो तंत्रज्ञानामुळे भविष्यात विविध क्षेत्रात नोकर्‍यांची देखील संधी उपलब्ध होणार आहे. हे फक्त शक्य आहे ते नॅनो तंत्रज्ञानामुळे. यामुळेच येत्या दहा वर्षात मोठे बदल होणार असल्याचे प्रतिपादन नॅनो तंत्रज्ञानाचे संशोधन करणारे अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एल.ए. पाटील यांनी केले.

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रृपच्या सचिव संगीता बियाणी अध्यक्षस्थानी होत्या.

गटशिक्षणाधिकारी विजय पवार, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सुनिल वानखेडे, बी.बी.जोगी, प्राचार्य डी.एम. पाटील, भुसावळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे तुषार बाविस्कर, रूद्रसेन गंठीया आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण व मामा बियाणी यांच्या प्रतिमेचे पुजन करून येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविकात प्राचार्य डी.एम. पाटील यांनी शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या संशोधनाची माहिती सांगुन राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याबाबत ध्येय उद्दीष्ट सांगीतले.

यावेळी बोलताना डॉ.पाटील म्हणाले की, नॅनो तंत्रज्ञान फार पुरातनच आहे. संशोधन असे असले पाहिजे की, ते सर्वसामान्य नागरीकांना वाजवी दरात मिळाले पाहिजे. ते फक्त नॅनो तंत्रज्ञानामुळेच शक्य आहे. डोळ्यांनी दिसणारे व न दिसणारे असे विज्ञानाचे दोन भाग म्हणता येवू शकतात.

डोळ्यांनी न दिसणार्‍या या तंत्रज्ञानाला नॅनो तंत्रज्ञान म्हटले जाते. नॅनो तंत्रज्ञानामधे पदार्थांचा आकार बदलून त्यातील गुणधर्म देखील बदलवीले जातात. या तंत्रज्ञानामुळे येत्या दहा वर्षात चांगले बदल घडून येणार आहे.

पाण्यावर चालणारी वाहने, आजारावरील योग्य निदान व औषधोपचार, हवेतील प्रदुषण, जलप्रदुषण यावरील उपाय.  केसाच्या जाडीच्या शंभर नॅनो मीटर छोटे रोबोट तयार करून ते शरीरात सोडले जातील. त्यामुळे शरीरातील आजारांचा शोध घेवून त्या पेशीवर उपचार करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.

यामुळे माणुस अमर होणार आहेत. नॅनो तंत्रज्ञान जगासाठी संजीवनी असुन विद्यार्थ्यांना या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.

नियोजनबध्द परिश्रमाने तुम्ही निश्चीत यश गाठु शकता. दर्जेदार शास्त्रज्ञ असण्यासाठी चारित्र्यसंपन्न माणुस असणे गरजेचे आहे.

अमळनेरात नॅनो टेक्नॉलॉजीची प्रयोगशाळा

अमळनेर येथील प्रताप कॉलेज मध्ये तीन हजार स्के.फुट नॅनो टेक्नॉलॉजीचे संशोधन करण्यासाठी प्रयोग शाळा आहे. या प्रयोग शाळेत अत्याआधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत यंत्र सामुग्री आहे. या प्रयोग शाळेची माहिती त्यांनी पीपीटीद्वारे विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर दाखवली. तसेच प्रयोग शाळा बघण्यासाठी अथवा मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी सदैव उपस्थित असतात.

का प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वृत्ती बाळगा

आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी घडत असतात. या गोष्टी अशाच का घडतात याबाबत का चे प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वृत्ती बाळगा यामुळे आपल्या नाविण्यपुर्ण माहिती मिळवण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.

अशाच छोट्या छोट्या शोधामधून संशोधनाचा पाया रचला जातो. यातुनच मोठे संशोधन घडत असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले.

गावातही संशोधन होवू शकते

सर्वांचा गैरसमज आहे की, संशोधन हे मेट्रोसीटीत होते. मात्र याला अपवाद म्हणुन अमळनेर येथील नॅनो तंत्रज्ञानावरील लॅब आहे. संशोधन कुठेही होऊ शकते. यासाठी वातावरणाची गरज नसुन मनाची तयारी असली पाहिजे. तेव्हाच सकारात्मक संशोधन घडू शकते.

येत्या दहा वर्षात भारत देश जगाचे नेतृत्व करणार असल्याचे प्रतिपादन संगीता बियाणी यांनी अध्यक्षीय भाषणात केले. सूत्रसंचलन आर.के.तायडे यांनी तर आभार एस.आर.पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*