नुसती हवा…पेट्रोल कुठंय भावा…!

0

वाहनधारकांची डोळेझाक फसवणुकीला कारणीभूत

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुसती हवाय..पेट्रोल कुठंय भावा, असे नगरी संवादाने सुरू असलेली भांडणं पेट्रोल पंपावर होत आहेत. डिजीटल काट्याचे जाणकार असलेला ग्राहक शहरातील एका पेट्रोल पंपावर विचारत होता. चोरी पकडल्याने तो सेल्समन घाबरला. पण त्याने उलट उत्तरे देऊन वेळ मारून नेली.

राज्यात अनेेक ठिकाणी पेट्रोल पंपावर मापात पाप होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरसह राज्यात अनेक जिल्ह्यात प्रशासनाने धाडसत्र राबवत पंपांची तपासणी सुरू केली आहे. पंपांवर छापे टाकले. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे समोर आल्यानंतर ते मशीनच सील करण्यात आले आहे. अंतिम तपासणीनंतरच त्या पंपावर फसवणूक होत होती अथवा नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, छाप्यानंतर पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत.
पंपावर फसवणूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही व्हायच्या. मात्र, या तक्रारींकडे म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नव्हते. एखादा वाहनधारक अशी तक्रार करायचा. पंपावरील कर्मचार्‍यांसोबत वाद घालायचा; पण त्याची दखलच कोणी घेतच नसल्याने या फसवणुकीला तोंड फुटत नव्हते. पण नुकतीच पंप चालकांची ही काटामारी समोर आणल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. पंपावर फसवणूक कशी होते, हे प्रत्येकजण आता चवीने सांगतोय. तसेच अनेकजण आपबितीही कथन करतायत.
वाहनधारकांचा निष्काळजीपणा अनेकवेळा त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरतो. चारचाकी वाहन घेऊन पंपावर गेल्यानंतर अनेक चालक आत बसूनच इंधन टाकीची चावी कर्मचार्‍यांच्या हातावर टेकवतात. ठराविक रकमेचे इंधन भरण्याचे फर्मान सोडून ते सीटवर बसून राहतात. काही वेळानंतर कर्मचारी चावी चालकाच्या हातात टेकवून पैसे घेतो. मात्र, इंधन किती टाकलं, हे विचारण्याची तसदीही चालकांकडून घेतली जात नाही. सध्या काही वाहनांच्या इंधन टाकीला ऑटो लॉक सिस्टीम आली आहे. चालकाच्या सिटखाली असलेले बटन ओढल्यानंतर आपोआप इंधन टाकीचे झाकण निघते.अनेकवेळा चालक हेच बटण ओढून सिटवर सुस्तावतात. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता दुपटीने वाढते. दुचाकीस्वार पंपावर गेल्यानंतर शंभरच्या पटीत पेट्रोल भरतात. मात्र, हा आकडा अनेकवेळा फसवणुकीचे कारण ठरतो. काही पंपावर मशीनमध्ये करण्यात छेडछाडीमुळे अशा लमसमम रकमेच्या पेट्रोल वितरणात काटामारी होण्याची शक्यता असते. तसेच दुचाकीस्वार बोलण्यात अथवा इतर कामात व्यस्त असल्यासही फसवणुकीची शक्यता वाढते.

कशी टाळता येईल फसवणूक
चारचाकी वाहनातून स्वत: उतरून पंपाचे रिडींग तपासावे. पंपाचे रिडींग शून्य असतानाच कर्मचार्‍याला इंधन टाकायला सांगावे.
डिजिटल मशीन असलेल्या पंपावर इंधन भरावे. कंपनी संचालित असेल तर उत्तम. तिथे पेट्रोलची किंमत सेट केल्यावर पेट्रोलचा फ्लो सुरू होण्याआधी कर्मचारी एक टोकन स्वाईप करतात. त्यामुळे फसवणूक होत नाही.
पाईप एकदा टाकीत घालून नोझल दाबला की कर्मचार्‍याला त्याचा हात काढून घ्यायला सांगावा. स्वत: पाईप पकडावी.
शंभर, दोनशे असे राऊंड फिगरफ इंधन टाकण्यापेक्षा ऑड किमतीचे इंधन भरावे. त्यासाठी सुटे पैसे स्वत:जवळ ठेवावेत.
स्कूटर आणि महिला वापरत असलेल्या स्कूटरेट गाड्यांची टाकी सिटखाली असते. अनेकदा डिकीत काही सामानसुद्धा असते. डिकी उघडणे, गाडी स्टँडला लावणे यात मशीनवरच्या आकड्यांकडे दुर्लक्ष करू नये.
इंधन कमी भरल्याचा संशय आल्यास टाकी उघडून कर्मचार्‍याला तपासणी करून दाखवायला सांगू शकता. तसे करणे त्यांना बंधनकारक आहे.

वारंवार नोजल दाबण्याची ट्रीक
पेट्रोल पंपावरील कर्मचारी इंधन भरत असताना वारंवार नोजल दाबतात. जेवढा वेळ हातातला खटका दाबला जातो. तेवढा वेळ पेट्रोल पडत नाही. आकडे मात्र पळत राहतता. परिणामी पेट्रोल कमी येते. स्वीच ऑन केल्यानंतर नोजलसारखं दाबणं म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याचं जाणकारांचं म्हणणे आहे. काही पंपावर लॉकच नाही.

मीटरमध्ये 200 रुपयाचं इंधन फीड केलं असेल तर एकदा नोजलचा स्वीच दाबल्यानंतर 200 रुपयांचं इंधन झाल्यानंतर स्वीच आपोआप बंद होईल. स्वीच फक्त मीटर ऑन करण्यासाठी असतो. फीड केलेली व्हॅल्यू संपल्यानंतर मीटर थांबतं. पेट्रोल टाकताना जर नोजलचं स्वीच बंद केलं. तर मीटर चालू राहतं. मात्र, पेट्रोल बाहेर येत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन कर्मचारी पेट्रोल टाकताना मध्येमध्ये स्वीच बंद करतात. ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जातं, असं काहीजणांचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

*