निवडणूक ‘फसवणूक’ ठरणार नाही ना?

0
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या टप्प्यात मतदारांनी बर्‍याच राज्यांत भरघोस मतदान केले. टक्केवारी ऐंशीपर्यंत पोहोचल्याने सार्‍याच पक्षांचे आणि उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. प्रचार सभांमधून विविध पक्षांचे नेते प्रतिस्पर्ध्यांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. विकासाचे मुद्दे हवेत विरून गेले आहेत. हमरीतुमरी सुरू आहे. जनहिताविषयी फारसे कोणी बोलत नाही. जागरुक राहायला हवे ना? येत्या पाच वर्षांत ‘निवडणूक’ करताना ती आपली आपण करून घेतलेली ‘फसवणूक’ तर होणार नाही ना? याची काळजी ‘करमणूक’प्रधान भाषणे ऐकताना आपण घेतली पाहिजे, नव्हे का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया पूर्ण होऊन प्रचार सुरू झाला आहे. देशात सध्या भाजपची लाट असल्याचे त्या पक्षाचे नेते सांगत आहेत, तर काँग्रेसला चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांच्या पक्षाकडून आणि सहकारी पक्षांकडून बोलले जात आहे. मात्र जनता कोणासोबत जाणार? ते 23 मे रोजी निकाल लागल्यावर स्पष्ट होणार आहे. ओपिनियन पोलमध्ये भाजपप्रणीत रालोआला 300 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आस आहे, तर त्याच वेळी सत्ता मिळवण्यासाठी या आघाडीला काही जागा कमी पडण्याची शक्यताही अन्य मतदानपूर्व चाचण्यांत व्यक्त केली जात आहे. एक्झिट पोलची आकडेवारी सर्व टप्प्यातील निवडणुका झाल्याशिवाय जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे ही आकडेवारी 19 मे रोजी सर्व मतदानाच्या फेर्‍या पूर्ण झाल्यावर बाहेर येणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी 23 तारखेला दुपारी 12 पर्यंत देशात कुणाची सत्ता येणार त्याचे पूर्वानुमान स्पष्ट होणार आहे.

असे असले तरी सध्या राज्यात दुष्काळाच्या समस्येने थैमान घातले आहे, त्याकडे सत्ताधारी आणि विरोधकांमधून फारसे कुणी काहीच बोलत नाही. पण राज्यात मेअखेरीस जलाशयातील 5-10 टक्के पाणीसाठाही शिल्लक राहील की नाही, अशी स्थिती आहे. पावसाचे पूर्वानुमान व्यक्त करताना तो सामान्य होण्याची आणि त्यात अल निनोच्या प्रभावाने खंड येण्याची भाकिते असल्याने जुलैपर्यंतदेखील पावसाची शक्यता नाही असे मानले तर स्थिती मोठी अवघड होणार आहे.

‘जलयुक्त शिवार’च्या कामांचा गाजावाजा आणि छायाचित्रे काढून प्रचार करणारे त्यामुळे निवडणुकीत या कामाचे श्रेय घेताना दिसत नाहीत. कारण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. भर उन्हात सभा घेणार्‍या आणि लाखो लोकांच्या झुंडी जमवण्याचा दावा करणार्‍या नेत्यांना रोजगार हमी, चारा छावण्या, बेरोजगारांना काम किंवा पिण्याचे पाणी यावर बोलायची सोय राहिलेली नाही. लोकांच्या खर्‍या प्रश्नापासून कोसो दूर राहून देशप्रेम आणि व्यक्तिकेंद्रित प्रचारावर सारा भर देण्यात येत आहे. विधानसभेतील चर्चा आणि भाषणात तुमच्या पाच वर्षांविरुद्ध आमच्या पाच वर्षांत काय झाले? ते उच्च तालास्वरात सांगणार्‍या मुख्यमंत्र्यांसह सारे भाजपचे नेते आता जे काही वाईट आहे ते काँग्रेसच्या काळात झाले आहे, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. लोकांसमोर गेल्यावर तेथील प्रश्नांची चर्चा करताना सत्ताधारी आणि विरोधी बाजूचे नेतेही अभावानेच प्रश्न मांडताना दिसत आहेत. जणू पाच वर्षांनी येणारे निवडणुकांचे पीक काढण्याचा हा धंदा असावा, असे खोटेनाटे बोल बोलून वेळ मारून न्यायची व ‘तुझा गळा माझा गळा’ असे राजकारण करत राहायचे हेच युतीच्या मागील साडेचार-पाच वर्षांत दिसले. त्यापूर्वीच्या आघाडीच्या मित्रपक्षांत पाहिले आहे. समान कार्यक्रम एकच जनता मूर्ख बनवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे येऊन शेतकर्‍यांचे नेते शरद पवार यांच्या घरातील कौटुंबिक भांडणावर तोंडसुख घेतले. जेथे उमेदवार काँग्रेसचा आहे आणि भाजपच्या स्थानिक उमेदवाराने निवडणुकीसाठी 30 कोटी खर्च करावे लागत असल्याचे स्टिंग तारे तोडले आहेत तेथे ‘ना खाऊंगा’ या घोषणेबद्दल मोदीजी बोलत नाहीत. ते पवारांच्या घरातल्या भाऊबंदकी, दादागिरी, ताईगिरीकडे बोट दाखवतात! मात्र वर्ध्यात किती शेतकरी आत्महत्या झाल्या यावर त्यांच्या सरकारच्या काळात काय प्रभावी उपाययोजना केल्या ते पुराव्यानिशी सांगू शकले नाहीत. शेतीमालाला दुप्पट हमीभाव दिला असे सांगून स्वत:चे कौतुक करून घेताना खरेच तसे झाले आहे का? शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेनुसार खरेच लाभार्थी शेतकरी आहेत का? याचा दृश्य परिणाम एकाही जिल्ह्यात दिसत नाही. कुठल्याही गावात शेतकर्‍यांनी भाजप नेत्यांचे उत्स्फूर्त स्वागत केल्याचे पाहायला का मिळाले नाही? गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबवल्या हे ‘होय मी लाभार्थी’ हे जाहिरातीमधून यापूर्वी सांगण्यात आले होते;

पण आता प्रत्यक्षात मात्र लोकांच्या दारी प्रचाराला जाताना त्यातील किती लाभार्थी स्वत:हून ‘होय आम्ही लाभार्थी’ म्हणून पुढे आले आहेत? हा प्रश्न आम्हाला जाणवत आहे; पण नेत्यांना नाही. कारण त्याचे उत्तर देणे सोयीचे नाही. वर्धा येथील सभेत पवार कुटुंबाची चिंता करताना देशाचे प्रमुख राज्यातल्या शेतकरी, बेरोजगारांच्या घरातील चुलींची चिंता करताना दिसले नाहीत. त्यानंतर झालेल्या सर्व सभांमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर ‘तलवार’ चालवण्याचे काम केले आहे. शरद पवार यांनीदेखील मग मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत म्हणायची कसर सोडली नाही. अगदी दोन महिन्यांपर्यंत आमच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ येथून ज्या प्रकारे ‘चौकीदार चोर आहे’ म्हणण्यापर्यंत मजल गेली आणि एकदम आता अफजलखान वाटणार्‍यांच्या गळाभेटी झाल्या. मोदी विष्णूचा अकरावा अवतार आहेत, असा साक्षात्कार झाला तसे काही निवडणुकांनंतर पवार आणि मोदी यांच्यात होणार तर नाही ना? कारण पप्पू-फेकू किंवा जमानतदार-चौकीदार या जोड्या जुळवण्याच्या किंवा गांधी विरुद्ध मोदी असा सामना आहे, असे दाखवण्याचा जो प्रचार झाला तो यावेळी बुमरँगही ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर वेगळ्या प्रतिमा ज्या प्रवाहात येण्याची शक्यता आहे त्यांच्याशी मोदी आणि त्या-त्या नेत्यांनी आपली तुलना करीत प्रचारी धुरळा उडवायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचे मनसुबे तर नाहीत ना? म्हणजे बंगालमध्ये ममता यांनी मोदींना आणि मोदी यांनी ममता यांना दुषणे देत टीका करायची,

उत्तर प्रदेशात बसप आणि सप नेत्यांना फोकस करायचे, दक्षिणेत चंद्राबाबू, स्टालीन यांना लक्ष्य करायचे किंवा बिहारमध्ये तेजस्वी आणि लालूंच्या नावे बोटे मोडायची, काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल, प्रियंका आणि सोनिया यांना टीकेच्या चित्रातही आणायचे नाही म्हणजे अनुल्लेखाने मारायचे! जेणेकरून काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा मोदी विरुद्ध गांधी असा सामना होताना लाट नसल्याने आणि नव्याने तयार होत नसल्याने लोकांचा कल कोणत्याही एका बाजूला जाणार नाही. म्हणजे यावेळी तो मोदींविरोधी असल्याने दुसर्‍या बाजूला आपसूक त्याचा फायदा मिळणार नाही, हे राजकारण आहे. एकमेकांना जहरी टीकेचा विषय बनवायचे आणि लोकांचे लक्ष बाकीच्या पप्पू-टप्पू नेत्यांवरून हटवायचे, अशी ही रणनीती तर नसावी? असे आता जाणकार चारत आहेत.

कारण कितीही देशप्रेमाचा आव आणला तरी दोन-चार दिवसांपेक्षा जास्त तो चालताना दिसत नाही. अगदी पाकिस्तानच्या पंतप्रधानानेदेखील आमच्या निवडणुकांच्या प्रचारात दखल देऊन एका व्यक्तीला जबाबदारी दिली तरच वाटाघाटी होतील, असे म्हणावे म्हणजे आता यांनी प्रचारासाठी काय बाकी ठेवले आहे? असा प्रश्न पडतो. आमच्या देशातील जनता कुणाला जबाबदारी देणार यावर लक्ष शत्रू राष्ट्र ठेवणार हे नक्कीच, मात्र त्यांनी कुणाला आम्ही काय करावे? हे भाष्य करावे म्हणजे अति झाले नाही का? पण यावेळच्या प्रचारासाठी अशा गैरलागू गोष्टीच जास्त आहेत. गेल्या पाच वर्षांत जो प्रचंड विकास केला त्यावर तर कुणीच काही बोलायला तयार नाही.

मुंबईत ‘मेक इन इंडिया’ ‘मेक इन महाराष्ट्र’ केले होते आठवते का? मग सार्‍या रेल्वेस्थानकांवर चिनी बनावटीच्या सरकत्या जिन्यांची कंत्राटे कशी देण्यात आली? किंवा ज्या मेट्रोचा गाजावाजा होत आहे तिचे सुटे भाग चीन जपानमधून आयात का होणार आहेत? अथवा जपान सरकारच्या फायद्याची बुलेट ट्रेन तिच्या सुट्या भागांसह आपल्याकडे आणली तर मुंबईतून रोज कोण लोक अहमदाबादला जाणार आहेत? असे प्रश्न लोकांनी विचारू नयेत म्हणून ही लुटूपुटूची भांडणे व वाद निवडणुकीच्या प्रचारात घातली जात आहे. ‘आम्ही आंबेचे गोंधळी’ म्हणत भोपे जसे वातावरण भारून टाकतात तसे हे लोकशाहीच्या नावाने चांगभले करून घेणारे करीत आहेत का? कुणातरी नेत्याचा पक्ष एकही जागा लढत नाही. त्याच्या पक्षाचा कुणी उमेदवारच नाही म्हणे! ज्याला निवडून येण्याची ‘उमेद’च नाही तो ‘वार’ लावून दुसर्‍यांच्या मंडपात जाऊन ‘यांना पाडा’ सांगत फिरतो आहे. जागरुक राहायला हवे ना? येत्या पाच वर्षांत ‘निवडणूक’ करताना ती आपली आपण करून घेतलेली ‘फसवणूक’ तर होणार नाही ना? याची काळजी ‘करमणूक’प्रधान भाषणे ऐकताना आपण घेतली पाहिजे, नव्हे का?
– किशोर आपटे

LEAVE A REPLY

*