Type to search

निवडणूक तारखांमागील कूटनीती

ब्लॉग

निवडणूक तारखांमागील कूटनीती

Share

निवडणुकांचा यावेळचा कार्यक्रम आगळावेगळा आहे याकडे कोणाचेच फारसे लक्ष गेले नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या कालखंडात निवडणुकीचे टप्पे का वाढवले गेले, असा प्रश्नही अपवाद वगळता कोणाला पडला नाही.

लोकसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जागावाटपावरून राज्यात सर्वच पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. आपली मुले आणि नातवंडे यांना आपला राजकीय वारसा देण्यासाठी पिढ्यान्पिढ्या राजकारणात गेलेल्या दिग्गजांची सुरू झालेली धडपडदेखील दिसून येत आहे. इतरांच्या घराणेशाहीला नावे ठेवता ठेवता अनेकांच्या घरातच निवडणुकांचे आखाडे तयार होताना दिसत आहेत. आजोबांशी असलेल्या पूर्ववैमनस्याचा विखार आता नातवापर्यंत झिरपताना दिसत आहे.

हे सारे घडत असताना निवडणुकांचा यावेळचा कार्यक्रम आगळावेगळा आहे, याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. ईव्हीएम नको असे म्हणणारे पक्ष यावेळीही ईव्हीएमसोबतच निवडणुकीला तयार झाले आहेत. निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅटची सोय केली आहे. तुमचे छायाचित्र यंत्रावर दिसणार आहे, गाफिल राहू नका. मत नक्की कुणाला दिल गेले आहे याची खात्री करून घ्या असे चाचण्या करून सांगण्या-पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये तुमचे नाव आहे का? याची आजच खात्री करून घ्या, असाही सल्ला दिला जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर यावेळच्या एकूण निवडणूक कार्यक्रमावर नजर टाकू या. पहिल्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18 मार्च 2019 आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 25 मार्च आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 26 मार्च तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान 11 एप्रिल रोजी होईल. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या 7 मतदारसंघांत मतदान होणार आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना 19 मार्च रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 26 मार्च आहे.

नामनिर्देशन पत्राची छाननी 27 मार्च तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 29 मार्च आहे. दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान 18 एप्रिल 2019 रोजी होईल. दुसर्‍या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 मतदारसंघांत मतदान होणार आहे. तिसर्‍या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना 28 मार्च रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 4 एप्रिल, नामनिर्देशन पत्रांची छाननी 5 एप्रिल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 एप्रिल आहे. तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान 23 एप्रिल रोजी होईल. तिसर्‍या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 मतदारसंघांत मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 2 एप्रिल, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा दिनांक 9 एप्रिल, नामनिर्देशन पत्रांची छाननी 10 एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 एप्रिल आहे.

चौथ्या टप्प्यासाठी मतदान 29 एप्रिल रोजी होईल. चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी या 17 मतदारसंघांत मतदान होणार आहे. सर्व चारही टप्प्यांमधील मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. 27 मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. लोकसभेसाठी महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातले हे चार दिवस महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय भवितव्यावरही प्रभाव टाकणार आहेत.

मतदानाच्या तारखा पाहिल्या की लक्षात येईल पहिल्या चार टप्प्यातच 543 पैकी 374 जागांवर मतदान होत आहे. तर पुढच्या तीन टप्प्यात फक्त 169 मतदारसंघांत मतदान होणार आहे. उन्हाळ्याचा विचार करता मे महिन्याच्या आधीच जास्तीत जास्त जागांवर मतदान होणे गरजेचे आहेच. पण त्याचबरोबर सुरुवातीच्या टप्प्यातल्या मतदानामध्ये बालाकोट एअर स्ट्राईकमुळे झालेल्या देशभक्तीच्या लाटेचा जास्तीत जास्त फायदा होण्याची शक्यता आहे, असा अर्थ माजी निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांच्या ट्विटवरून काढता येईल. याशिवाय भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एकमेव महत्त्वाचे प्रचारक आहेत.

ते कितीही ‘उत्साही’ असले तरी ते माणूसच असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात त्यांचा आवाज आणि शरीर थकेल, असा अंदाज आहे. मोदींचा आवेश अगदी भरात असतानाच ते महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. महाराष्ट्रातल्या चार टप्प्यांविषयी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रश्न केला आहे. ते म्हणतात, महाराष्ट्रासारख्या शांत आणि स्थिर राज्यात मतदानासाठी चार टप्पे हवेत कशाला? कधीच न संपणार्‍या सिनेमांसारख्या आपण निवडणूक खेचू लागलो आहोत. डिजिटल युगात खरेतर निवडणुकांची आवर्तने फटाफट आटोपायला हवीत. सरदेसाई यांचा प्रश्न तर्कसंगत आहे. नवतंत्रज्ञान आणि आधुनिक सोयीसुविधांच्या काळात टप्पे कमी होण्याऐवजी ते वाढतच चाललेत. दुसरे असे की, मराठवाडा तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्याला लागून असलेल्या भागात दरवर्षीच दुष्काळाचे सावट असते. यंदा तर सप्टेंबरपासूनच दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवायला लागल्या आहेत. नोटबंदीनंतर सुरू झालेली आर्थिक ओढाताण अजूनही थांबलेली नाही.

त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचा आक्रोश वारंवार व्यक्त झाला आहे. मेपर्यंत दुष्काळ जास्तच भीषण झाला असेल. पण महाराष्ट्रात मतदान त्याआधीच एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या असंतोषाचा फटका सत्ताधार्‍यांना कमीत कमी बसण्यासाठी या तारखा सोयीच्या आहेत का? तोवर बजेटच्या आश्वासनानुसार शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये भरण्यासाठी राज्यातली यंत्रणा जोरात कामाला लागलीच आहे. मे महिन्यात निवडणुका घोषित झाल्या की मुंबईत सुट्यांवरून आरडाओरड सुरू होते. शाळांचे रिझल्ट एप्रिल महिन्याच्या शेवटी लागतात. त्यानंतर मुंबईतले चाकरमानी गावी जातात. राजकीय पक्ष निवडणूक आयोगात तक्रारी करतात. कोकणात गावी जाणार्‍यांमध्ये प्रामुख्याने मूळ कोकणातले शिवसेनेचे मतदार असतात. पण आता मुंबई ठाण्यात 29 एप्रिललाच निवडणुका असल्यामुळे त्याची तितकी चर्चा होणार नाही. एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती हे सण येताहेत. आयोगाने सांगितल्याप्रमाणे मतदानाच्या तारखा त्याचा विचार करूनच ठरवल्या आहेत. आपल्या राज्यात मतदान संपले की वेगवेगळ्या पक्षांचे निवडणूक एक्स्पर्ट पदाधिकारी इतर राज्यांत नेमले जातात. प्रमोद महाजनांच्या काळात महाराष्ट्रातले पदाधिकारी देशभर जात.

आताही महाराष्ट्रातले संघाचे पदाधिकारी देशभर जातात. पण त्या तुलनेच गुजरातमधल्या अमित शहांच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते. विशेषतः मुंबई, मुंबईच्या शेजारची शहरे आणि खान्देशात गुजरातमधले भाजपचे कार्यकर्ते निवडणुकांमध्ये हजेरी लावतात. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या गुजरातीबहुल भागात त्यांची संख्या लक्षात येण्यासारखी असते. यंदा गुजरातमध्ये एकाच टप्प्यात 23 एप्रिलला निवडणुका होत असल्यामुळे मुंबईत प्रचारासाठी त्यांना पाच दिवस तरी मिळतील. शिवाय महाराष्ट्रातलेच सर्व पक्षांचे कार्यकर्तेही आपल्या भागातल्या निवडणुका झाल्या की दुसर्‍या ठिकाणी जातीलच. तारखांचा असा मेळ घालण्याचे आणखी महत्त्वाचे कारण सर्वच राजकीय पक्षांना बंडाळीची झळ पोहोचणार आहे. विशेषतः विदर्भात उमेदवार जाहीर होताच काँग्रेसमधे फाटाफूट होण्याची शक्यता आहे. पण विदर्भात निवडणुकांना एक महिनाही मिळणार नसल्यामुळे आता बंडखोरांना खूपच कमी वेळ मिळणार आहे.
किशोर आपटे, मो. 9869397255

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!