Type to search

ब्लॉग

निवडणूक? छे! सत्तेचे प्रयोग!

Share

महाराष्ट्र देशी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा ठेवणीतील त्याच त्या आश्वासनांचा, वचनांचा नव्याने गजर केला जात आहे. राज्याचे आणि राज्यातील जनतेचे मूळ प्रश्न प्रचाराच्या आणि घोषणांच्या कोलाहलात मागे पडले आहेत. प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते सत्ता मिळवण्यासाठी वीराप्रमाणे झुंजत आहेत. राज्यात होणारी ही निवडणूक नसून ‘सत्तेचे प्रयोग’च नव्हेत का?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा माहोल आहे. प्रचारासाठी नेतेमंडळी मैदानात आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी ते किती तत्परतेने समाधान शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत हे सांगण्याची त्यांच्यात चुरस लागली आहे. खरेतर प्रचाराचे मुद्दे जुनेच आहेत. ग्रामीण भागात विकासाची आश्वासने काय तर झटक्यात शेतकरी कर्जमाफी, रोजगार आणि पायाभूत सेवासुविधा देऊ! शहरी भागातही जवळपास तेच आहे. लोकांना आता ते तोंडपाठ झाले आहे. हे सारे सांगत फिरणारे दोन्ही बाजूचे लोक सत्तेत होते त्यांचा त्या-त्यावेळचा अनुभव लोकांना आला आहे. तरीसुद्धा सर्वात जास्त गर्दी कोणाच्या सभेत आहे, असा भाबडा सवाल विचारला जातो.

सध्या नेत्यांची डझनावारी फौज घेऊन प्रचारात भाजप आघाडीवर आहे. त्यांच्याकडे ‘नरेंद्रास्त्र’ आहे जे गर्दी खेचणारे नेते आहेत. तसे पूर्वी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे होते. सध्या त्यांचा नातू उमेदवार म्हणून मैदानात उतरला आहे. तसे पाहिले तर ठाकरे घराण्याच्या थोरल्या आणि धाकल्या पातीने या मैदानात स्वतंत्रपणे नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या पिढीला आता बस्तान बसवण्यासाठी त्यांना लोकांची साथ हवी आहे. राष्ट्रवादीतदेखील पवार कुटुंबाचे हेच सुरू आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर मुलगा सुजातसाठी राजकारणाचा परिघ तयार करताना दिसत आहेत. भाजपत दाखल झालेल्या छत्रपतींपासून बड्या राजकीय घराण्यांतही हेच सुरू आहे. आठवले, जानकर, मेटे, शेंडगे असे बिनबुडाचे नेतेसुद्धा तेच करीत आहेत. ‘माझे सत्तेचे प्रयोग!’ असे प्रत्येक राजकीय नेत्याच्या घरातील आत्मचरित्राचे नाव ठेवावे लागेल का? सामान्य मतदार, राज्याची जनता, बळीराजा यात कुठे आहेत? खोट्या विकासाची आश्वासने किंवा अस्मितेची राष्ट्रभावनेची आवाहने आणि आव्हानांची भाषा ऐकवली जात आहे. करमणूक म्हणून पंधरा दिवस याकडे पाहावे लागेल असे काहींना वाटेल;

पण खरेच या सार्‍या नेतेबाजी आणि पक्षबाजीतून राज्याचे खरे प्रश्न सुटले आहेत का? सुटणार आहेत का? मतदार राजा याचा विचार कधी करणार आहे? त्यांना पर्याय दिले आहेत. त्यापैकी कुणी लायक वाटत नसेल तर ते ‘नोटा’ला मतदान करू शकतात, असे एक अधिकारी मित्र म्हणाले; पण त्याने या राज्याचे प्रश्न सुटणार आहेत थोडेच? ही निवडणूक मतदारांच्या सहनशीलतेची परीक्षा म्हणूनच घेतली जात नाही का? पुन्हा पाच वर्षे जे काही ‘पदरी पडेल ते पवित्र झाले’ म्हणत त्यांना ‘वाट लागताना जी वाट पाहत बसावे’ लागत आहे ते वेगळेच! आपल्या लोकशाहीची अडी अवस्था का झाली? लोकांना अजूनही दहा रुपयांत जेवण देणारे, मतदानाच्या आदल्या रात्रीच्या पाच-पंचवीसच्या कमाईचे आणि खोट्या सभेत दिल्या अरोळ्या, हाळ्या आणि टाळ्यांचे आकर्षण खरेच राहिले आहे त्यामुळेच ना? आम्हीच आमचे भाग्यविधाते आहोत हे मतदारांना जेव्हा समजेल तेव्हा त्यांना प्रश्नांची उत्तरे मिळतील.

यावेळी निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात फिरत आहेत. दोन महिन्यांत ते 80 व्या वर्षात पदार्पण करतील; पण आजही उत्साही आहेत. म्हणूनच ‘आम्ही आता थकलो’ असे जे उद्गार सुशीलकुमार शिंदे यांनी काढले ते पवारांना रुचले नाहीत. मी थकलो-बिकलो नाही, असे म्हणत त्यांनी शिंदे यांचे वक्तव्य लगेच खोडून काढले. शिंदे थकले असतील, हा भाव आहेच आणि त्याचा इशारा व्यक्तीपेक्षा काँग्रेसकडे अधिक आहे. तसे पाहता शिंदे पवारांपेक्षा लहान! म्हणजे गेल्या महिन्यातच त्यांचे 79 वे वर्ष सुरू झाले; पण या वयामुळे त्यांनी थकल्याची गोष्ट केली असेल असे वाटत नाही. त्यांच्या मनात थकवा असावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा प्रभाव कमी झाल्याने पक्ष थकल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे दोघांनाही एकत्र येणे भाग आहे, असे भाव शिंदेंच्या बोलण्यात होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत आणि अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची जी वाताहत झाली त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला असेल. पक्षाची आणि आघाडीची लागोपाठ झालेली पडझड पाहून त्यांनी थकवा बोलूनही दाखवला. काँग्रेसची स्थिती तशीच आहे. महाराष्ट्रातील 48 पैकी एकमेव खासदार त्यांना शिवसेनेकडून उधार (धानोरकर) घ्यावा लागला आणि त्यांच्याच पत्नीला विधानसभेचे तिकीटही द्यावे लागले. एवढी या पक्षाची दुर्गती झाली आहे. परंतु राष्ट्रवादीचे इतके वाईट हाल नाहीत. त्यांचे चार खासदार निवडून आले. (त्यातील एक उदयनराजे भोसले आता भाजपत गेले) विधानसभेत काँग्रेसपेक्षा जास्त जागा यावेळी निवडून आणण्याचा पवारांचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे. ते स्वत: पक्षाध्यक्ष आणि वयाने सर्वात ज्येष्ठ नेते असूनही इतर कोणाहीपेक्षा जास्त उत्साहाने महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरत आहेत. आघाडीत बाजी मारण्याची व्यूहरचना पवारांनी केली असल्याचे स्पष्टपणे जाणवते. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात गुन्हा नोंदवण्यात येताच पवारांनी अनपेक्षित पलटवार केला.

स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात बोलावले नसतानाही हजर होण्याचे जाहीर केले. एका झटक्यात पवार चर्चेत आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला संजीवनी मिळण्याची स्थिती निर्माण झाली. ईडीची पंचाईत झाली. शेवटी कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून ईडीला हा प्रसंग टाळावा लागला. या घटनेमुळे पवारांची बरीच राजकीय कमाई झाली. सायंकाळी अजित पवारांनी गृहकलह चव्हाट्यावर आणला नसता तर पवारांना मोठा लाभ झाला असता. त्या लाभाची टक्केवारी अजितदादांच्या राजीनाम्याने कमी केली, हे खरे असले तरी आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याची शक्ती पवारांमध्ये आहे, हे त्यांनी नव्या तरुणांना दाखवून दिले आहे. वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावर पवारांनी राष्ट्रवादीची सूत्रे हाती घट्ट धरून ठेवली आहेत. दीर्घकाळाचे विश्वासू सहकारी एकामागून एक पक्ष सोडून जात असतानाही तो टिकवण्यासाठी ते शेलारमामांच्या ज्या ईर्षेने धडपडत आहेत ते तरुण नेत्यांनाही लाजवणारे आहे. म्हणूनच त्यांनी शिंद्यांना फटकारले. काँग्रेस थकली असेल; पण राष्ट्रवादी नाही, असेही त्यांनी सुनावले. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपत गेल्यापासून या पदावर राष्ट्रवादीचा डोळा असणे अगदीच अशक्य नाही. ते मिळवण्यासाठी पवार आतापासूनच कामाला लागल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तिकडे पवार तर इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 9 प्रचार सभा घेत आहेत. नरेंद्रांप्रमाणेच देवेंद्रदेखील रोज किमान सहा-सात सभा घेत आहेत. कर्जत-जामखेड आणि कोपरगाव येथे महायुतीचे उमेदवार राज्याचे मंत्री राम शिंदे आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.

हे सारे निवडणुकीचे ढोल वाजत असताना वास्तव किती विदारक आहे ते दोन दिवसांतील खड्ड्यांचा दुसरा बळी गेल्याने समोर आले आहे. वाडा-भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात, खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने 60 वर्षीय पादचार्‍याला उडवले, कुडूस येथील घटना, वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू, रामप्रसाद गोस्वामी असे मृताचे नाव आहे. तो मुसारणे येथील एका कंपनीत रक्षक म्हणून कार्यरत होता. तो मूळचा बिहार येथील असून वाडा तालुक्यतील कुडूस येथे राहत होता. डॉक्टर स्नेहाच्या अपघाती मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशी रामप्रसादचा मृत्यू झाला. या बळींची जबाबदारी तरी कोण घेणार? शेतकरी ‘बळीराजा’ आहेच. त्याला वार्‍यावर सोडून राजकारण सुरू आहे. सामान्य मतदार राजा, आता तरी फसव्या नार्‍यांना बळी पडू नकोस, असे मतदारांना सांगावेसे वाटते.
– किशोर आपटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!