निळवंडे कालव्यांकरीता 500 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी

0

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा समाधी शताब्दीचा वर्षाचा जवळ आलेला कालावधी विचारात घेऊन प्रस्तावित करण्यात आलेल्या 3100 कोटी रूपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देऊन निधी उपलब्धतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा, राज्य सरकारने खास बाब म्हणून पायाभूत सुविधांकरिता निधी मंजूर करावा.निळवंडे धरण कालव्याकरिता 500 कोटी रूपयांच्या प्रस्तावालाही शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मंजुरी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, आ.सौ.स्नेहलता कोल्हे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, संस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, रविंद्र बिनवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीच्या प्रारंभी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समितीच्या बैठकीला उशिर झाला असल्याने या बैठकीत प्राधान्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या 3100 कोटी रूपयांच्या विकास आराखड्याला मंजूरी देवून निधी उपलब्धतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्याची केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होईपर्यंत राज्य सरकारने खास बाब म्हणून विकास कामातील पहील्या टप्प्याकरिता निधी द्यावा, शिर्डी संस्थाने देखील पायाभूत सुविधांच्या कामांना निधी देवून ही तातडीने सुरू करण्याची सूचना विखे पाटील यांनी बैठकीत केली. निळवंडे धरण कालव्याकरिता 500 कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. शताब्दी वर्षातील विकास कामांचा एक भाग म्हणून या निधीला तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

*