निर्विवाद बहुमतामुळे नाशिकला मंत्रिपदाची लॉटरी ? ; भाजपांतर्गत हालचाली सुरू ; चार आमदारांमध्ये पुन्हा चुरस

0

नाशिक : नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर यशाचे शिल्पकार म्हणून स्थानिक आमदारांना मंत्रिपदावर स्थान मिळणार का? या अनुषंगाने हालचालींना प्रारंभ झाला आहे. त्या माध्यमातून पक्षांतर्गत गटबाजीची बीजे रोवली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

महापालिका निवडणुकीत 122 पैकी 66 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. नाशिक महापालिकेच्या 25 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोणा एका पक्षाला बहुमत मिळाले. त्यातच भाजपला अनपेक्षितरीत्या मिळालेल्या या यशामुळे भाजप नेते भारावले. मुख्यमंत्र्यांनी निवडणूकपूर्व सभेत नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नाशिककरांनी महापालिकेत कमळ फुलवले.

त्यामुळे या यशाची बक्षिसी म्हणून शहराला ‘लाल दिवा’ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. जास्त नगरसेवक निवडून आणणार्‍याला मंत्रिपद दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने नाशिकच्या पदरी काय पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून भाजपचे चार आमदार निवडून गेले आहेत.

शहरातील तीनही आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे नाशिकला पहिल्याच टप्प्यात मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना समितीचा राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन नाशिकची तहान भागवण्यात आली. आ. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर या तिघांपैकी एकाची तरी वर्णी लागेल अशी चर्चा नंतरच्या काळात सुरू झाली.

परंतु स्थानिक तीनही आमदारांमध्ये फारसे सख्य नसल्याने एकमेकांची पदे रोखण्याचा प्रयत्न केला गेल्याची पक्षांतर्गत गोटात चर्चा आहे. महापालिका निवडणुकीत आ. सानप यांचा वरचष्मा राहिल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत झालेल्या पक्षविरोधी कारवाईचा अहवाल शहराध्यक्ष आ. सानप यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे या अहवालावरही मंंत्रिपदाची बरीचशी गणिते अवलंबून आहेत.

श्रेयाचे फळ काय? : महापालिकेत भाजपने इतिहास घडवला. त्याचे फळ काय मिळणार? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्या अनुषंगाने पक्षांतर्गत बैठका चालू झाल्या आहेत. काहींनी तर मुंबई वार्‍याही सुरू केल्या आहेत. अर्थात त्यामध्ये महापालिकेत प्रमुख पदांच्या वाटपाबाबतच्या चर्चेचाही समावेश आहे. महापौर, उपमहापौर यांसह स्थायी समिती अध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवकपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*