निर्धार सफल व्हावा!

0
ब्रह्मगिरीवरून उगम पावून नाशिकची भूमी समृद्ध करणार्‍या गोदावरी नदीला ‘दक्षिणेची गंगा’ संबोधले जाते. पौराणिक इतिहासात गोदावरीचे महत्त्व नोंदवले गेले आहे. तथापि सर्व बाबतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या गोदावरीला आजच्या आधुनिक युगात मात्र बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे.

पावसाळ्यात खळाळणारे गोदापात्र एरवी अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त बनते. गोदावरीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. ते कमी व्हावे म्हणून गोदाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी न्यायालयाकडेसुद्धा धाव घेतली. न्यायसंस्थेने यासंदर्भात राज्य सरकार आणि नाशिक मनपाला वेळोवेळी निर्देशही दिले. तरीसुद्धा गोदावरीचे ओंगळ स्वरुप अजून बदललेले नाही.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गाजलेला गोदास्वच्छतेचा मुद्दा सिंहस्थातील पुण्यप्रवाहासोबतच वाहून गेला. गंगापूर धरणाचे पाणी सोडून नदीपात्र स्वच्छतेची औपचारिकता पूर्ण केली गेली. मनापासून प्रामाणिक प्रयत्न अजून झालेले नाहीत. अशा स्थितीत नाशिक मनपाने गोदावरी स्वच्छतेचा संकल्प सोडला आहे.

या उपक्रमाच्या नियोजनाबाबत मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींची नुकतीच एक बैठक घेतली. येत्या पर्यावरणदिनाचे औचित्य साधून गोदावरी स्वच्छतेचा निर्धार यावेळी सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात महापालिकेला दोन हजार स्वयंसेवकांची साथ मिळवण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. मनपा आयुक्तांचा हा प्रयत्न व संकल्प अतिशय चांगला, स्वागतार्ह आणि गोदाप्रेमींना दिलासा देणारा आहे. तथापि ज्या तीव्र इच्छेने हा निर्णय घेतला गेला तितक्याच प्रखरतेने तो राबवला जाणार का? केवळ एक दिवसापुरता हा उपक्रम नाही.

तो वर्षभर राबवला जाणार आहे, असे सांगण्यात आले. कदाचित वर्ष तरी पुरे ठरेल का? तथापि खुद्द मनपा आयुक्तांनीच तसे स्पष्ट केल्याने त्याबाबत आशा बाळगायला हरकत नसावी. मनपाचा निर्धार कितीही चांगला असला तरी हा उत्साह वर्षभर टिकून राहणे आणि गोदावरीचे स्वच्छ-सुंदर रुप नाशिककरांना पाहायला व अनुभवायला मिळणे हे सोपे नाही.

‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ या समर्थवचनाचे स्मरण करून प्रयत्न केल्यास गोदावरी स्वच्छतेचा उपक्रम यशस्वी होणे फारसे अवघड नाही. तथापि अनेक चांगले उपक्रम आरंभशूरपणानेच गाजतात. सुरुवात मोठ्या झोकात केली जाते. मोठमोठ्या गर्जना आणि वल्गना केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र त्या ठिसूळच ठरतात. कार्यकर्त्यांचा उत्साह चार-आठ दिवसांत मावळतो. नाशिक मनपाच्या नियोजित गोदावरी स्वच्छता मोहिमेबाबत तसे घडू नये, अशी आशा करूया!

LEAVE A REPLY

*