निराधार आकडेवारी?

0
गुन्हेगारी आटोक्यात आल्याचे पोलीस दलातर्फे वारंवार सांगितले जात असले तरी नाशिक शहराच्या विकासाबरोबरच गुन्हेगारीही प्रचंड वेगाने वाढत आहे. शहराला पडलेला गुन्हेगारीचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. आठवडेभरात नाशिकरोडला खुनाची तिसरी घटना घडली आहे. एकलहरे परिसरात एक महाविद्यालयीन युवतीची हत्या करून टाकलेले प्रेत जळालेल्या अवस्थेत मिळाले.

केवळ चेहरेपट्टीतील साम्यामुळे नाशिकमध्ये पाहुणा आलेल्या एका अल्पवयीन मुलाचा खून झाला. त्याचे मूळ टोळीयुद्धात असल्याचे सांगितले जाते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस दलाला यश आल्याचे वारंवार सांगितले जाते. मुंबईतील रस्त्यावरच्या गुन्हेगारीचा आलेख उतरणीला लागला असल्याची आकडेवारी थोड्या दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्याबद्दल पोलीस दलाने स्वत:ची पाठही थोपटून घेतली होती.

या कथनातील सत्यता मान्य करायची की जे घडतेय त्यावर विश्‍वास ठेवायचा, असा प्रश्‍न जनतेला पडला तर ते गैर कसे म्हणावे? केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी महानगरांतही परिस्थिती फारशी वेगळी नसावी. गुन्हेगारीची टक्केवारी कमी झाली की अधिक हे कोणत्या मोजपट्ट्या किंवा निकष लावून ठरवले जाते? खून, दरोडा यांसारखे मोठे गुन्हे तर सतत वाढत आहेत.

म्हणजे टक्केवारी केवळ किरकोळ गुन्ह्यांवरून मोजली जाते का? सर्व गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदवले तरी जातात का? जनतेला अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दहशतीचा सामना करावा लागतो, त्याचा विचार तरी होतो का? पोलिसांना बहादुरीचे प्रमाणपत्र मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून गुन्हेगारीची आकडेवारी मर्यादित ठेवण्याचे प्रयत्नही वाढत आहेत, अशी शंका जनतेला वाटू लागली तर ती अयोग्य म्हणता येईल का?

जनतेच्या मनातील शंका दूर करण्याची आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस दलाचीच नव्हे का? केवळ आकडेवारीचा खेळ करून विश्‍वासार्हता कशी वाढणार? जनतेला सुरक्षिततेचा अनुभव येऊ लागला तर या शंकांचे आपोआप निरसन होईल. पोलीस दलावर प्रचंड ताण असतो.

\पोलिसांना मानसिक ताणतणावांना व शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. पोलीसही माणसेच आहेत याविषयीची जनतेची जाण वाढीला लागली आहे. म्हणून पोलीस दलाविषयीची कृतज्ञता संधी मिळेल तेव्हा व्यक्त केली जाते. हे खरे असले तरी गुन्हेगारीचा आलेख केवळ आकड्यांची जादुगिरी करून कमी कसा होणार? कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक व जनतेला वाटणारी सुरक्षिततेची भावना यावरूनच ठरवले जाईल.

LEAVE A REPLY

*