Type to search

ब्लॉग

निरंतर प्रयत्न हाच उपाय!

Share

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. पण आपण त्याचे आणि निसर्गाचे मोल राखत नाही. जागतिक पर्यावरण रक्षणासाठी सुमारे 40 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अद्यापही कार्बनचे उत्सर्जन अपेक्षेनुसार कमी झालेले नाही. तथापि प्रयत्न सुरू ठेवणे हेच त्यावरचे उत्तर आहे.

पासून पार दक्षिणेकडे पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत सूर्य आग ओकतोय. चहुबाजूंनी गरम झळा, आटलेल्या नद्या-तलाव, तळ गाठलेल्या विहिरी, दिल्ली असो की चेन्नई, भोपाळ असो की नांदेड, औरंगाबाद लहान-मोठ्या अनेक शहरांमध्ये पाण्याचे टँकर्स आणि त्यातील हंडा, बादलीभर पाणी मिळवण्यासाठी आबालवृद्धांची झुंबड, लांबच लांब रांगा, अतिउष्म्याचे वाढते बळी….

हे चित्र केवळ हळहळ वाटण्यापुरते मर्यादित नाही. अत्यंत गंभीर बाब आहे ही. दर वर्षागणिक उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानातील वाढ ही आता वाळवंटे, उत्तर भारत, मध्य भारतापुरती राहिलेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेले भाविक आणि पर्यटकदेखील तेथील उन्हाळ्यामुळे हैराण आहेत. राजस्थानातील चुरूमध्ये 50.8 अंश तापमान तर श्रीनगरमध्येदेखील 30 डिग्री, दिल्ली, विदर्भात पारा गेले काही दिवस 44 ते 46 डिग्रीवर पोहोचलेला. हे सर्व काय सांगते?

अवकाळी पाऊस आणि पूर, कोरडा दुष्काळ, गारपीट अन् वितळते ग्लेशिअर्स / हिमनद्या ही परिस्थिती. अंटार्टिका प्रदेशात प्रचंड हिमनग वितळू लागले आहेत. उत्तर धु्रवावरील आर्क्टिक प्रदेशातही स्थिती अशीच आहे. हिमनग वितळू लागल्याने समुद्र, महासागरांच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ ही केवळ चिंतेची व दुर्लक्ष करण्याजोगी बाब राहिलेली नाही. कारण पाण्याच्या पातळीत होणार्‍या या वाढीचे गंभीर परिणाम फक्त स्थानिक नाहीत. भावी काळात ते आपल्या आणि अन्य देशांच्या सागरकिनार्‍यावर धडकणार आहेत. यात मुंबई, कोलकाता व अन्य किनारी शहरेही पाण्यात बुडण्याचा धोका आहे.
1989 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मालदिव या देशाचे तत्कालीन अध्यक्ष अब्दुल गयुम यांनी अत्यंत कळवळून सर्व देशांना आवाहन केले होते की, ‘जगातील वाढती उष्णता रोखण्यासाठी सर्व देशांनी कसोशीने प्रयत्न केले नाहीत तर आणि समुद्राच्या पाण्याची पातळी आणखी दोन इंचांनी जरी वाढली तर संपूर्ण मालदिव पाण्यात लुप्त होईल?’ मालदिव हा सुमारे दोन हजार बेटे मिळून बनलेला 765 कि.मी. लांबीचा देश आहे.

निसर्ग आणि मनुष्याचे जीवन परस्परांवर अवलंबून आहे. किंबहुना, आपले जीवन म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नाहीच. आपण जो उश्वास बाहेर टाकतो तो झाडांचा श्वास असतो अन् झाडांचा उश्वास हा आपला माणसाचा प्राणवायू असतो! थोडक्यात, झाडेच राहिली नाहीत तर आपण कसे राहणार, वाचणार?

निसर्गाच्या नियमानुसार ऋतुचक्र फिरतच असते. पण जरा बारकाईने पाहिले तर या ऋतुचक्रातील तिन्ही ऋतूंच्या अवधीमध्ये दरवर्षी बदल होत आहे, हेही ध्यानात आलेच असेल. मागच्या वर्षीपेक्षा यावेळचा उन्हाळा अधिक कडक आहे. उकाडा दरवर्षी वाढतोच आहे, असे आपण म्हणतो, त्याचा अनुभव आपण घेतो आहोत. पावसाळ्याचे ताळतंत्रही बदलले आहे. थंडीचा कडाका व मौसम कमी झाला आहे. का होत आहे हे सारे? कशामुळे? कोण याला जबाबदार? याचाही विचार आपण करायला नको? ऋतुचक्र निसर्गाचे असले तरी त्याचा चाल, गती, लहर, बदलण्यास मनुष्यदेखील कारणीभूत आहे.

ही बाब भारतापुरती मर्यादित नाही. संपूर्ण जगात हेच चालले आहे. झाडे, जंगल, वनांची अनियंत्रित, अनिर्बंध कत्तल, वणवे, मनुष्यनिर्मित व नैसर्गिकही कारखान्यांमधून हवेत उंच उडणारे धुराचे लोट, यामुळे जगाच्या एकूणच तापमानात होणारी वाढ पुन्हा माणसासमोर संकट बनून उभे ठाकले आहे. याचे परिणाम नाहक सृष्टीतील जीवजंतू, प्राणी, पशुपक्ष्यांनाही भोगावे लागत आहेत. त्यांच्या अनेक जाती-प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

औद्योगिक क्रांतीमुळे माणसाच्या जीवनात प्रचंड बदल घडले आहेत. विकासाचा ध्यास घेऊन डोळे बंद करून त्याचा सतत पिच्छा करताना मानवाने निसर्गाची प्रचंड हानी केली आहे. कितीही प्रयत्न केले तरी ही हानी भरून न निघण्यासारखी आहे. भूगर्भातून काढलेला कोळसा जाळून टाकल्यानंतर त्याची पुननिर्मिती होऊ शकत नाही. कारण कोळशासारखी खनिजे कोट्यवधी वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेली असतात. तीच कथा आर्क्टिक व अंटार्टिक बर्फाळ प्रदेशांची आणि हिमालय व अन्य पर्वतांवरील ग्लेशिअर्सची.आईसलँड या देशात मात्र हवामानातील बदल रोखण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून एक अनोखा प्रकल्प सुरू आहे. रिझविक या शहरात कार्बफिक्स नावाचा हा प्रकल्प, आसपासच्या ऊर्जा/वीजनिर्मिती केंद्रांमधून बाहेर पडणारे हरित वायू किंवा प्रदूषणाला खेचून घेतो व त्याचे मिनरल खनिजामध्ये रूपांतर करतो. येथे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडला खेचून प्रथम कार्बन डाय ऑक्साईड मिश्रीत पाण्यात बदलले जाते व हे पाणी नंतर जमिनीखाली 1 मैलपर्यंत नेले जाते तेथे अ‍ॅसाल्ट खडकांच्या संपर्कात येण्यामुळे त्याचे खनिजात रूपांतर होते.

कार्बनचे जेवढे अधिक उत्सर्जन, तेवढी तापमानात वाढ अधिक होते. ही वाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर गेल्या 40 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे. परंतु विकसित देश स्वत:चे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यास तयार नाहीत. उलट विकसनशील देशांनी हे उत्सर्जन कमी करावे, यासाठी सतत दबाव राखू पाहतात

2017 मध्ये पॅरिस येथे ‘क्लायमेंट चेंज’वरील जागतिक परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा, पवनऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जेच्या वापरावर अधिक भर द्यावा यासाठी पुढाकार घेतला. जो स्वागतार्ह ठरला. एवढेच नव्हे तर सौरऊर्जानिर्मिती करणार्‍या, करू इच्छिणार्‍या सुमारे शंभर देशांचा एक गटही स्थापन केला. वाढते जागतिक तापमान रोखण्याच्या दृष्टीने, 1988 मध्ये जलवायू परिवर्तनाबाबत एक समिती जागतिक पातळीवर स्थापन झाली. त्यानंतर ब्राझील, जपान, डेन्मार्क इत्यादी देशात या विषयावर बराच उहापोह झाला. 2009 ची कोपनहेगन परिषद खूप गाजली. परंतु कोपनहेगन करार यशस्वी झाला नाही.

निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. पण त्याचे मोल आपण जाणत नाही. निसर्गाचा आदर राखत नाही हेच खरे. पाण्याची आपली गरज भागवण्यासाठी नद्या, तलाव, विहिरी, एवढेच काय जमिनीखाली, खोलवरून पाण्याचा उपसा होतो. पाणीमाफिया वाढताहेत. पण असे कोठवर चालणार? आडातच राहिले नाही तर पोहर्‍यात येणार कुठून? पावसाचे पाणी वाया जाऊ न देता ते जमिनीत जितके अधिक झिरपेल तितका पाण्याचा साठा वाढेल. त्याकरिताही अधिकाधिक झाडे हवीतच. त्यांची मुळे जमिनीखाली माती-पाणी धरून ठेवतात आणि वर बाहेरच्या जीवसृष्टीला आपल्याला ‘प्राणवायू’ देतात. झाडे जगतील तर आपण जगणार. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…’ हे संत तुकारामांनी म्हटले ते उगाच नाही. सग्या सोयर्‍यांचे हे नाते जपणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. आपले कर्तव्यच आहे. जितके झाडे अधिक, तापमान, उष्मा कमी आणि सुसह्य, घराच्या आसपास झाडे असली तर तेथील तापमान, अन्य भागापेक्षा किमान दोन ते तीन अंशांनी कमी असते. याचा अनुभव अनेकांना असेलच. झाडे तोडण्यावर कायद्याने बंदी आहे. तरीही राजरोस वृक्षतोड सुरूच आहे. काही ठिकाणी विकासाच्या नावाखाली, तर काही ठिकाणी पैसा, व्यापारासाठी. धक्कादायक ताजी बाब म्हणजे महाराष्ट्रातच गेल्या काही महिन्यांमध्ये तळकोकणात संरक्षित व वनक्षेत्रातील सुमारे 1600 एकर जमिनीवरील झाडे गायब झाल्याचे सॅटलाईटने टिपलेल्या छायाचित्रावरून उघडकीला आले आहे.

पर्यावरणाचे जतन, संरक्षण व त्याचे महत्त्व लहानपणापासून अंगी बाणवण्यासाठी आता शालेय पातळीवरून जागरुकता निर्माण करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न स्तुत्यच आहे. अनेक ठिकाणी शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषयही आहे.

प्राचीन भारतात पर्यावरण हा जागरुकता दाखवण्याचा विषय नव्हता. तर दैनंदिन आचरणाचा तो भाग होता.

‘अश्वथ्थमेकं, पिंचुमंदमेकं
न्यग्रोधमेकं, दशचिंचिणीकम्.
कपिथ्थ-बिल्वामल कित्रयम् च।
पंचाम्र रोपी नरकं न पश्यते॥’
असे म्हणत.

भावार्थ : जो माणूस एक पिंपळ, एक निंब (कडुनिंब), एक वड, दहा चिंच, वृक्ष, 3 कवठ, 3 बेल, 3 आवळा व पाच आंब्याची झाडे लावतो, त्याला नर्क कधी पाहावा लागत नाही.

जागतिक पर्यावरण रक्षणासाठी सुमारे 40 वर्षांच्या प्रयत्नांनंतर अद्यापही कार्बनचे उत्सर्जन अपेक्षेनुसार कमी झालेले नाही. पण प्रयत्न सुरू ठेवावेच लागतील. यातून 2 अंश तापमान कमी करण्यात जरी सर्व देश यशस्वी झाले तरी खूप काम झाले, असे म्हणता येईल.
सुरेखा टाकसाळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!