नियोजनाच्या अभावामुळे काकडी विमानतळाचे काम दर्जाहीन

0

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेनी केली विमानतळाची पहाणी

 

राहाता (वार्ताहर)- शिर्डी विमानतळाचे कामकाजात सुरूवातीपासूनच नियोजनाच्या अभावामुळेच विमानतळ पुर्ण होण्यास विलंब झाला. इमारतीचा दर्जाही राखता न आल्याची नाराजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. जुनमध्ये या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे त्यांनी सांगीतले.

 
शिर्डी विमानतळाची पाहणी गुरूवारी ना. विखे यांनी केली. यावेळी एअरपोर्ट डायरेक्टर धिरज भोसले, विमानतळ कार्यकारी अधिकारी कौस्तुभ ससाने, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, तहसिलदार माणिक आहेर आदी उपस्थित होते.

 

विमानतळाची पाहणी केल्यानंतर ना. विखे म्हणाले या कामात मोठ्या प्रमाणावर त्रृटी असुन जगभरातून येणार्‍या साई भक्तांच्या सोईसाठी हे विमानतळ उभारले आहे. मात्र शिर्डीच्या नावलौकीकाला साजेशे काम झाले नाही.

हे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी करत असून ते एअरपोर्ट अ‍ॅथॉरीटीशी करार करून केले असते तर कामाचा अधिक दर्जा पहावयास मिळाला असता. सध्याचे काम तात्पुरत्या स्वरूपाचे केले, अद्याप अनेक कामे बाकी आहेत. शिर्डीत पुढील काळात विमानाने प्रवास करणार्‍या भक्तांची गर्दी पाहता हे अपुरे असून सुविधांचा अभाव आहे.

 

सुरूवातीला साडेतीन कि. मी. अंतराची धावपट्टी असताना अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे ती अवघी अडीच कि.मी.ची तयार करण्यात आली. त्यामुळे या विमानतळावर मोठी विमाने उतरू शकत नाही. तातडीने धावपट्टी व विमानतळ मुख्य इमारतीचे काम हाती घ्यावे लागेल असेही त्यांनी सांगितले.

 

 

काकडी ग्रामस्थांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देणार
या विमानतळासाठी शेतकर्‍यांच्या जमीनी गेल्या त्यावेळी सरकारने त्यांना जी आश्‍वासने दिली त्यापैकी काही प्रश्‍न सुटले तर काही प्रलंबीत आहे. तरूणांच्या नोकरीचा प्रश्‍नही बाकी आहे. लवकरच या प्रश्‍नी संयुक्त बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविले जातील असेही यावेळी सांगितले.

 

जून महिन्यात शिर्डी विमानतळाचे उद्घाटन होईल
शिर्डी विमानतळाचे जुन महिन्यात उद्घाटन होईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असुन पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्याचे आयोजन आहे. आता आणखी विलंब न करता हे विमानतळ सुरू करावे असे त्यांनी यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

*