निमित्त पाण्याचे मात्र वाद पालिका निवडणुकीचा

0
नरेंद्र बागले,शहादा । दि.14 – टँकरवरून पाणी भरण्याच्या वादातून आजी माजी नगरसेवकांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यावसन खुनात झाल्याची घटना शहाद्यात घडली .
या घटनेत सद्दाम तेली या एमआयएमच्या तरूण नगरसेवकाचा खुन झाल्याची घटना शहरात कानोकान पोहाचताच त्यांच्या समर्थकांच्या भावनांचा उद्रेक होवून घटनेस कारणीभूत असलेल्या माजी नगरसेवकांच्या घरावर हल्लाबोल केला.
खेतियारोडवरील दुकानाची तोडफोड करून जाळून टाकण्यात आली. पोलीसांच्या वाहनांवरही दगडफेक होवून दोन वाहनांसहीत अन्य चार वाहनांचीही मोडतोड करण्यात आली.
शहरातील खेतीयारोडपासून संपूर्ण गरीब नवाज कॉलनी परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले असून नंदुरबार व धुळे येथून पोलीसांचा मोठा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
या घटनेचे निमित्त पाणी भरण्यावरुन असले तरी गेल्या सहा महिन्यांपुर्वी झालेल्या पालिका निवडणूकीपासून या दोन्ही गटात धुमश्चक्री सुरु होती.

शहरातील गरीब नवाज कॉलनीत टँकरवरून पाणी भरण्याच्या वादातून एमआयएमच्या नगरसेविका सैय्यद सायराबी लियाकत अली यांचा मुलगा सैय्यद मुजफर अली आणि माजी नगरसेवक शेख मेहमुद शेख अहेमद यांच्यात शाब्दीक चकमक झाली.

यातून मोठा वाद होत गेला. अर्थात या वादाला सहा महिन्यापुर्वी झालेल्या पालिका निवडणुकीचा टच होता. कारण, पालिका निवडणुकीत माजी नगरसेवक शेख मेहमूद शेख अहमेद (मुन्नाभाई) हे काँग्रेसकडून एमआएमएमचे सद्दाम तेली यांच्या विरोधात उभे होते.

त्यात सद्दाम तेली यांनी शेख यांचा पराभव केला होता. तेव्हापासून हा राजकीय वाद धुमसत होता. या वादाला पाण्याचे टँकर कारणीभूत ठरले. नगरसेविका पुत्र सैय्यद मुज्फर अली व शेख महेमुद यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

त्यात दोघे समर्थक एकमेकांवर भिडले. सैय्यद मुज्जफर त्याचा भाऊ व शेख मेहमुद गंभीर जखमी झाले. यातील सैय्यद मुजफर व त्याचा भावास गंभीर अवस्थेत सुश्रूत रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

ही माहिती मिळताच एमआयएमचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती सद्दाम तेली हे त्यांना पाहण्यासाठी गेले असता शेख समर्थकांनी रूग्णालयात त्यांच्यावर हल्ला करीत तलवारीने वार करून खून केला.

दरम्यान, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास व्हेंटीलेटरवर उपचारार्थ धुळे येथे रवाना केले. मात्र पोटात घाव बसल्याने तेली जागेवरच मयत झाले होते. या घटनेचे वृत्त कानोकान शहरात पसरले. विशेषतः म्हणजे मुस्लिम बहुल वसाहतीत या घटनेमुळे संताप व तणावाचे वातावरण पसरले.

आपल्या तरूण नगरसेवक सद्दाम तेली याचा खून झाल्यामुळे एमआयएम समर्थकांचा भावनांचा उद्रेक झाला. त्यांच्या संतापाचा बांध फुटला हजारो समर्थकांनी या घटनेस कारणीभूत असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख मेहमुद शेख अहेमद व माजी उपनगराध्यक्ष मुख्तार शेख यांच्या घरावर हल्लाबोल करीत तुफान दगडफेक केली.

शेख यांच्या दोन चार चाकी व दोन दुचाकी वाहनांची पुर्णतः तोडफोड करण्यात आली. समर्थकांच्या रोषाला पोलीसांनाही समोरे जावे लागले. त्यांच्या एक बोलेरो वाहनाची तोडफोड तर नंदुरबार मुख्यालयाची वज्र या अत्याधुनिक वाहनावरही दगडफेक करून नुकसान करण्यात आले.

पोलीसांवर दगडफेक ही करण्यात आल्याने मनोज धात्रक हे जखमी झाले. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत बालंबाल बचावले. तेली समर्थकांचा उद्रेक एवढयावरच न थांबता हजारोंच्या मॉबने शेख यांच्या खेतीया रोडवरील तीन दुकानांची तोडफोड करीत जाळून टाकण्यात आली.

या दुकानांना आग लावल्याने आगीचा आगडोंब प्रचंड उसळल्याने भितीचे वातावरण पसरले होते. ही घटना घडत असतांना पोलीस प्रशासनाला हतबल होवून नुसते बघण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.

आग विझविण्यासाठी अग्नीशमन वाहन आले असता त्यावरही दगडफेक झाल्याने त्यास माघारी फिरावे लागले. दरम्यान, खेतीयारोड परिसर गरीब नवाज कॉलनी परिसरात भिती व तणावाचे वातावरण व दंगल सदृष्य परिस्थितीमुळे शहाद्यासह धुळे पोलीस, नंदुरबार मुख्यालय पोलीस, सारंगखेडा पोलीस, म्हसावद पोलीस, सीआरपीएफचे जवान, शिघ्रकृतीदलाचे जवान, दंगल काबु पथक बंदोबस्तात तैनात केले आहेत.

घटनेत कारणीभूत माजी नगरसेवक शेख मेहमुद व मुख्तार शेख यांच्या घरावरील संभाव्य हल्ला पाहता त्यांच्या घराभोवती मोठा फौजफाटा तैनात केल्याने छावणीचे स्वरूप आले आहे.

मुस्लिम समाजातील या दोन गटात झालेल्या घटनेने गरीब नवाज कॉलनी व खेतीयारोड परिसरात दंगल सदृष्य परिस्थिती आहे.

दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांनी उशीरा घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती देत पोलीस अधिकार्‍यांना सुचना केल्या.

 

LEAVE A REPLY

*