Type to search

निकालाची चाहूल?

ब्लॉग

निकालाची चाहूल?

Share

मतदानाचे टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत तसतसे बदलत चाललेले वातावरण आणि प्रचारादरम्यान मोदींकडून मांडले जात असलेले मुद्दे पाहता त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही ठोस फॉर्म्युला नसल्याचे दिसते.

त्यामुळेच सत्ताबदलाची शक्यता फारच धूसर दिसते. जसजसे निवडणुकीचे टप्पे पूर्ण होत चालले आहेत तसतसा पंतप्रधान मोदी यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत चालल्याचे दिसत आहे. मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ हे धोरण स्वीकारले. परंतु त्यांच्या वाराणसी मतदारसंघात मोदींच्या तोलामोलाचा एकही सामायिक उमेदवार आखाड्यात उतरवण्यात विरोधी पक्षांना यश आले नाही.

काँग्रेसने प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवण्याची हवा निर्माण करून अखेर अजय राय यांना उमेदवारी दिली. या सर्व हालचालींवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, मोदींना थेट टक्कर देण्यास सक्षम उमेदवार कोणत्याही पक्षाकडे नाही. निवडणुकीचे टप्पे पूर्ण होत आहेत तसतशी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस विश्वासार्ह विरोधी पक्ष बनण्याचा प्रयत्नच करताना दिसत नाही, अशी स्थिती आहे. एवढेच नव्हे तर गेल्या गुरुवारी जेव्हा मोदींचा ‘रोड शो’ वाराणसीत झाला तेव्हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व वृत्तवाहिन्यांवर मोदीच दिसत राहिले. या बारा तासांमध्ये कोणताही ‘इव्हेंट’ करून माध्यमांना आकर्षित करणे विरोधी पक्षांना जमले नाही.

ज्या दिवशी मोदी मतदान करण्यासाठी गुजरातमध्ये गेले, तेव्हा त्यांची मतदान करण्याची वेळ साडेसातची निश्चित करण्यात आली होती. मोदी 8 वाजता पोहोचले, परंतु त्या वेेळेत विरोधी पक्षांचा एकही नेता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला नाही. तसे झाले असते तर किमान वृत्तवाहिन्यांवर तरी त्या नेत्याची छबी दिसू शकली असती. ‘मेगा रोड शो’ आणि प्रचंड सभांच्या माध्यमातून मोदी ज्याप्रमाणे मतदारांशी थेट संपर्क करीत आहेत त्यातून त्यांची न थकणारी छबी मतदारांना आकर्षित करीत आहे. ते आपल्या सरकारच्या कामकाजाच्या आधारे मते मागताना दिसत नाहीत तर मोदी यांचे नाव आणि मोदी यांचेच काम, हा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू दिसत आहे. त्यामुळेच ‘फिर एक बार,
मोदी सरकार’ असा नारा दिला जात आहे. या ठिकाणी ‘भाजप सरकार’ असा उल्लेख नाही. मोदींच्या भाषणात राष्ट्रवाद, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आणि लोकांना संमोहित करणार्‍या अन्य मुद्यांचे मिश्रण आढळते. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा राज्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा आहे, हे मोदी जाणतात. त्यामुळे हा मुद्दा पुढे करून राज्यांशी निगडीत विषयांची धार बोथट करण्यात ते यशस्वी होत आहेत. संकल्पना आणि दृष्टिकोन या विषयांवर निवडणुका लढवल्या जातात, हे जाणणार्‍या बड्या नेत्यांमध्ये मोदींचा समावेश होतो.

2014 मध्ये मोदींनी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने 25 राज्यांत 3 लाख किलोमीटरचा प्रवास केला होता. यावेळीही त्याच्याच जवळपास प्रवास त्यांनी केला आहे. 2014 च्या तुलनेत त्यांनी आपला प्रचार अधिक सुनियोजित आणि आक्रमक केला आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी ते ‘चॅलेंजर’ होते, तर यावेळी ते ‘इन्कम्बन्ट’ आहेत. ते संधीचा लाभ घेणारे चतुर नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळेच सर्व समस्यांसाठी ते आजही पूर्वीच्या सरकारांवर दोष टाकताना दिसतात आणि त्यांचे हे दोषारोपण मतदारांना आकर्षितही करते. लोकांशी थेट संवाद साधत बोलण्याची त्यांची पद्धत त्यांना लोकप्रिय करणारी ठरते. मोदी दुसर्‍यांदा जे सरकार बनवतील ते मजबूत असणार की मजबूर असणार एवढाच प्रश्न बाकी राहिला आहे. संभाव्य निकालांमध्येसुद्धा याच प्रश्नाचे उत्तर आता शोधले जात आहे. मनातून हरल्यास मैदानात जिंकता येत नाही आणि मैदानात हरल्यास मने जिंकता येत नाहीत, हे मोदींनी दाखवून दिले आहे. या दोन्ही मोर्चांवर त्यांची अस्त्रे वेगवेगळी आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. कुठे लष्कर, सीमा सुरक्षा, 370 वे कलम, 35-अ कलम, दहशतवाद हे मुद्दे असतात, तर कुठे आयुष्मान भारत, कौशल्य विकास, उज्ज्वला योजना हे मुद्दे बोलण्यात डोकावतात. चहावाला शब्दाप्रमाणेच चौकीदार या शब्दाचेही मतांत रूपांतर झाले. जातीय समीकरणेही फलदायी ठरली.

मोदींनी राजकारणाची तत्त्वप्रणालीच बदलून टाकली आहे. मोदी सरकारचा उदय हे तुष्टीकरणाच्या राजकारणाचे फलित आहे. मोदी सरकार सत्तेवर येणे ही भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालेल्या जनतेची प्रतिक्रिया होती यापेक्षा कितीतरी अधिक ती तुष्टीकरणाच्या राजकारणाची परिणती होती, त्यामुळेच मोदी सरकार दुसर्‍यांदा सत्तेवर येण्याच्या शक्यता अधिक आहेत. 2004 प्रमाणे सत्तापालट होण्यास सक्षम कारण दिसत नाही. 2009 मध्ये ज्याप्रमाणे डॉ. मनमोहन सिंग यांना ज्याप्रमाणे कोणताही गाजावाजा न करता एक अधिकचा कार्यकाळ मिळाला होता त्याचप्रमाणे 2019 मध्ये गाजावाजासह
मोदींना एक कार्यकाळ अधिक मिळण्याची शक्यता अधिक दिसते. विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर शंका घेण्यास सुरुवात केल्यामुळेही त्यांना निकालाची चाहूल लागली असावी, असे दिसते.

आणीबाणीनंतर ज्याप्रकारे विरोधकांची एकी झाली होती तशी एकी मोदींच्या विरोधात झालेली नाही. मोदीविरोधाचा फॉर्म्युला थेट कृतीत उतरवण्यासाठी कोणताही आश्वासक चेहरा विरोधकांकडे नाही. मोदींनी मांडलेले मुद्दे लोकांच्या मनात सुप्तावस्थेत असलेले मुद्दे आहेत आणि ते महत्त्वाचेही आहेत. त्यामुळेच त्यांना पराभूत करण्यासाठी नेमका कोणता फॉर्म्युला उपयोगात आणावा यासंबंधी विरोधकांमध्ये गोंधळ असून त्यामुळेच मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शक्यता अधिक आहेत, असे सध्याचे चित्र पाहताना दिसत आहे.
– योगेश मिश्र

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!