नाशिक महापौर पदाच्या निवडणुकीसाठी मातोश्रीवरुन आदेश

निवडणूक पार्श्‍वभूमीवर भाजप-सेनेत दरी कायम

0

नाशिक | दि.५ प्रतिनिधी- भाजपाने मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी महापौर पदासह सर्वच समिती सभापती पदाची निवडणूक न लढविता शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने सर्व तर्क वितर्कांना विराम मिळाला आहे. मात्र नाशिक महापौर पदाची निवडणुक लढविण्याचा निर्णय हा मातोश्रीवरुन घेतला जाणार आहे. तरीही महापौर निवडणुक लढविण्याची तयारी स्थानिक पदाधिकार्‍यांनी करुन ठेवल्याने नाशिकमधील भाजपा व सेनेतील दरी कायम असल्याचे समोर आले आहे.

गेली काही दिवस मुंबई महापौर पदावरुन थेट सरकार कोसळणार व मध्यावती निवडणुका होणार या सर्व अटकळींना मुख्यमंत्र्यांनी पुर्ण विराम दिला. भाजपाने मुंबईत सेनेला मतदारांनी कौल दिला असल्याचे मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतून समोर आले आहे. भाजपाकडुन महापौर, उपमहापौर यासह सर्वच समित्यांची निवडणूक न लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

या मुंबईतील भाजपाच्या निर्णयानंतर याचे पडसाद नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकला भाजपाने ६६ जागा जिंकत पूर्ण बहुमत मिळविले आहे. तर शिवसेनेला ३५ जागा मिळाल्या आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसेना, अपक्ष व रिपाइं यांचे संख्याबळ तोडके आहे. नाशिकला महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती व इतर समित्यांत भाजपाचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट आहे.

यात महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार का ? का तटस्थ राहणार ? यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच मुंबईत भाजपाने जी भूमिका घेतली, तशीच भूमिका सेना नाशिकमध्ये घेत परतफेड करणार का ? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहे. यामुळे आता येत्या १४ मार्च अगोदर शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे नाशिकरांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपात यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर सेना व भाजपात मोठी दरी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतल्या भूमिकेनंतर अजुनही सेनेकडुन वाद मिटला अशी प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. यामुळे सेना भाजपात असलेली अंतर्गत खदखद कायम आहे.

मुंबईप्रमाणेच सेना व भाजपातील संबंध नाशिकमध्येही आहे. भाजपाने बहुमतांचा केलेला चमत्कार अजुनही सेनेच्या पदाधिकार्‍यांनी अर्ंतमनातून स्विकारलेला नाही. नाशिकमध्ये दुसर्‍यांदा युती तोडण्याचे काम भाजपानेच केल्याचा राग सेनेत कायम आहे. या एकुण पार्श्‍वभूमीवर महापौर पदाची निवडणुक लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेणार असले तरी ही निवडणुक लढण्याची तयारी करुन ठेवण्याच्या हालचाली अंतर्गत सुरू झाल्या आहे.

मात्र पक्षप्रमुखांचा आदेशाची वाट पाहण्याचे काम सेनेकडुन केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यावरुन नाशिकमधील सेना व भाजपातील दरी कायम असल्याचे समोर आले आहे.

निर्णय पक्षप्रमुखांचाच
मुंबई महापौर निवडणुकीत भाजपाने जी काही भूमिका घेतली. तशी भूमिका भाजपासाठी नाशिकमध्ये घ्यायची का ? यासंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहे. यासंदर्भात पक्षाकडुन आलेल्या आदेशानुसार काम केले जाणार आहे. मात्र त्यांनी लढ म्हटले तर आम्ही लढणार आहे. आणि चमत्कार करणार, अशी माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

LEAVE A REPLY

*