नाशिक जिल्ह्यात 87 टक्के शिधापत्रिका आधार लिंक

0

नाशिक : रेशन दुकानांवर केंद्र व राज्य शासनाद्वारे शिधापत्रिकाधारकाच्या नावे जीवनावश्यक विविध स्वरुपाचे अन्नधान्य, रॉकेल, गहू, तांदूळ, साखर आदी स्वस्तात दिले जाते. आतापर्यंत दुकानदारांच्या नोंदीवर भरवसा ठेऊन हजारो टन अन्नधान्याचा पुरवठा दरमहा शिधापत्रिकाधारकांना होत असल्याचे ग्राह्य धरले जाते आहे.

पण काही सोडले तर बहुतांशी शिधापत्रिकाधारक या वस्तूंपासून अद्यापही वंचित आहेत. याकरिता रेशनकार्डदेखील आधारकार्डाशी लिंक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील रेशनकार्ड आधार लिंक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 87 टक्के रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक करण्यात आले आहेत.

दोन टप्प्यांमध्ये कामाचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण शिधापत्रिकांची संगणकीय नोंद केली जात आहे. भारत सरकारचा खाद्यनिगम विभाग ते तालुका स्तरावर होणार्‍या धान्य वाहतुकीचे संगणकीकरण, पुरवठा विभागाची विविध कार्यालये व पातळ्यांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे.

तर दुसर्‍या टप्पयात एफपीएस ऑटोमेशनचे काम होणार आहे. यामध्ये प्रत्येक शिधावाटप दुकानावर बायोमेट्रिक यंत्र बसवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे 2600 रेशनधान्य दुकाने कार्यरत आहेत. त्यावरील सुमारे 37 लाख 64 हजार 965 कार्डधारकांपैकी 87 टक्के ग्राहकांच्या शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक करण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी बोगस रेशनकार्डाचा प्रश्न गंभीर आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यापासून रहिवास पुरावा म्हणूनदेखील रेशनकार्डचा वापर केला जातो. यामुळे गेल्या काही वर्षांत बोगस रेशनकार्ड काढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्य शासनाच्या वतीने गेल्या दोन-तीन वर्षांत बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी अनेक मोहीम घेण्यात आल्या.

या मोहिमेत लाखो बोगस रेशनकार्ड रद्ददेखील करण्यात आली. परंतु यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाने आता रेशनकार्ड आधार लिंक केल्याने बोगस लाभार्थ्यांना आळा बसून दुबार रेशनकार्ड काढणार्‍या लोकांचे प्रमाणदेखील कमी होईल, असा विश्वास पुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

*